अरब देशातील कतार (Qatar) येथे गुरुवारी, (२६ ऑक्टोबर) रोजी भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली कतारमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आली होती. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित झालो आहोत. त्यामुळे सविस्तर निर्णयाची प्रतिक्षा आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर पथकाच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत.” आम्ही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष ठेवून आहोत. सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर सहाय्य करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली आहे. यासंदर्भात जो निर्णय घेतला जाईल तो कतारच्या अधिकाऱ्यांकडे मांडणार आहोत.
(हेही वाचा – Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरच्या मच्छल सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवादी ठार)
कॅप्टन नवतेज सिंह गिल, कॅप्टन विरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदु तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि सेलर रागेश अशी शिक्षा झालेल्या भारतीय नौदलातील माजी नौसैनिकांची नावे आहेत. या सर्वांना हेरगिरीच्या आरोपाखाली चौकशीसाठी त्यांच्या स्थानिक निवासस्थानातून अटक करण्यात आली. अहवालानुसार, या 8 भारतीयांचे जामीन अर्ज अनेक वेळा फेटाळण्यात आले आहेत. कतारच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या कोठडीत वाढ केली होती. गुरुवारी कतारच्या न्यायालयाने 8 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावली.
अधिकृत भारतीय सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, भारतीय एजन्सी आता हे प्रकरण शक्य तितक्या उच्च पातळीवर नेतील, मात्र कतार सरकारने या मुद्द्यावर कोणतीही उदारता दाखवलेली नाही. सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था गोवल्याचा संशय आहे.
इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप…
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ८ अधिकाऱ्यांनी भारतीय नौदलात वेगवेगळ्यांवर पदांवर काम केले आहे. त्यांच्यावर इस्त्रायलसोबत हेरगिरी करण्याचा आरोप करण्यात आला आहे. या आठ जणांमध्ये नामवंत अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी एकेकाळी मोठ्या भारतीय युद्धनौकांचे नेतृत्व केले होते. सध्या दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी ते कार्यरत होते. ही खासगी कंपनी असून ती कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि संबंधित सेवा पुरवते.