उध्दव ठाकरे यांना सध्याच्या राज्यातील ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेची नीटशी कल्पना नाही. त्यामुळे पूर्वीच्या काळातील राजे जसे वेषांतर करुन राज्याची स्थिती पाहायचे, तसेच मुख्यमंत्र्यांनीही पीपीई किट्स घालून राज्याची पाहणी केल्यास त्यांनाही राज्यातील भीषण आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था पाहायला मिळेल, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी राज्याची स्थिती समजावून घ्यावी
पंढरपूर येथे प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांतदादा बोलत होते. मुंबईची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे. आम्हाला या लॉकडाऊनमध्ये कुठेही राजकारण करायचे नाही. आम्ही या लॉकडाऊनमध्ये सरकारला पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. पण आता मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा केल्यास त्यांनाही राज्यातील भीषण स्थिती समजू शकेल, त्यामुळे त्यांनी राज्यात फिरावे व राज्यातील विदारक स्थिती समजावून घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः या विदेशी व्हॅक्सिन लवकरच येणार भारतात… काय आहे त्यांची किंमत? किती आहेत प्रभावी? वाचा…)
मुख्यमंत्री हे फक्त पक्ष प्रमुख
सध्याचे मुख्यमंत्री फक्त एका पक्षाचेच प्रमुख होऊ शकतात. शरद पवार साहेबांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना मुख्यमंत्री बनवले व स्वत: सरकारच्या बाहेर राहिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ब-याच गोष्टी माहीत नाहीत. कदाचित म्हणूनच त्यांनी ऑक्सिजन हे विमानाने आणण्याबाबत काल भाष्य केले. पण महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था सरकारला करावी लागेल. ऑक्सिजन असो वा रेमडेसिवीर इंजेक्शन किंवा व्हेंटिलेटर असू दे, जोपर्यंत मुख्यमंत्री स्वत: बाहेर फिरत नाहीत, तोपर्यंत नेमके काय सुरू आहे, हे मुख्यमंत्र्यांना कळणार नाही.
पॅकेजचा सावळा गोंधळ
गेली १८ ते १९ महिने या राज्यामध्ये केवळ राजकारणच सुरु आहे. समाजकारण हा विषयच नाही. गेले काही महिने आम्ही सातत्याने मागणी केल्यानंतर काल सरकारने पॅकेज जाहीर केले. पण ते जाहीर करताना मोफत धान्य वाटपाची केलेली घोषणा अतिशय फसवी आहे. सध्या एका कुटुंबाला ३५ किलो धान्य १०५ रुपयांमध्ये मिळत आहे. ते १०५ रुपयांचे धान्य मोफत देणार व त्याच्या बदल्यात सरकार १०५ रुपये भरणार हा सगळा सावळा गोंधळ सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
(हेही वाचाः फेरीवाल्यांची थट्टा करणारी सरकारी मदत! मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजनंतर नाराजी)
लसींचा तुटवडा नाही, काळा बाजार
राज्यात लसींचा तुटवडा नाही. फक्त लसींच्या विषयावरुन राजकारण सुरू आहे. लस काळा बाजार करुन विकण्यात आली. त्यामुळे लसीबाबत एकदा श्वेतपत्रिका जाहीर करावी. केंद्राकडून किती लसी आल्या, ४५ वय वर्षांवरील किती जणांना लसी दिल्या, ६० वर्षे वयाची माणसे किती, कोविड योध्दे किती. हे सगळे राज्यातील जनतेला समजले पाहीजे. लसीसाठी जे पात्र नाहीत अशा सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी व पदाधिका-यांना लस देण्यात आल्याचा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.
Join Our WhatsApp Community