-
ऋजुता लुकतुके
काही प्रमाणात महेंद्र सिंग धोनी ही भारतीय क्रिकेटमधील जीवंत दंतकथा आहे. त्याच्याविषयीचे किस्से आणि प्रसंग कधी संपणारे नाहीत. आता खुद्द धोनीने त्याच्या मनातली एक गोष्ट जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. ती आहे निवृत्तीविषयीची. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय भावनाशील आणि त्याचवेळी अत्यंत खाजगी असू शकतो. माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने पहिल्यांदा आपल्या निवृत्तीच्या निर्णयाविषयी थेट आणि असं भावनाशील वक्तव्य केलं आहे. (MS Dhoni Retirement)
धोनीने निवृत्ती जाहीर केलेला दिवस होता १५ ऑगस्ट २०२०. पण, ‘मनाने आपण न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यातील पराभवाच्या दिवशीच निवृत्त झालेले होतो,’ असं त्याने बंगळुरूमध्ये एका जाहीर मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे. धोनी सांगतोय तो सामना आहे २०१९ च्या विश्वचषकातील उपान्त्य फेरीचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना. (MS Dhoni Retirement)
या सामन्यात भारताचा १९ धावांनी पराभव झाला. विजयासाठी २३४ धावांचं आव्हान भारताला पेललं नाही आणि संघ २१५ धावांवर बाद झाला. रोहितने तोपर्यंत स्पर्धेत ६ शतकं केली होती. पण, तो आणि विराट, राहुल हे पहिले तीन फलंदाज प्रत्येकी १ धाव करून बाद झाले आणि तिथून पुढे घडी बिघडत गेली. निम्मा संघ ७५ धावांत गारद झालेला असताना रवी जडेजा आणि खुद्द धोनीने डाव सावरण्याची शिकस्त केली. जडेजाने ७७ धावा केल्या. पण, तरीही दोघांचे प्रयत्न अपुरे ठरले. (MS Dhoni Retirement)
आणि अवाक्यात असलेला भारताचा विजय शेवटी हुकलाच. या पराभवाचं खूप मोठं शल्य महेंद्रसिंग धोनीने बाळगलं होतं. तसा तो कधीच आपल्या भावना व्यक्त करायचा नाही. कप्तान म्हणून तो धोरणी होता. पण, आता इतक्या वर्षांनंतर या सामन्या नंतरची मनस्थिती त्याने उलगडून सांगितली. (MS Dhoni Retirement)
‘अटीतटीचा सामना तुम्ही गमावता, तेव्हा भावनांवर नियंत्रण ठेवणंही कठीण जातं. असे पराभव जिव्हारी लागतात. त्याच दिवशी मी मनात पुढील योजना आखलेली होती. मला माहीत होतं, माझा भारतासाठी हा शेवटचा सामना होता. त्या सामन्यानंतर १३ महिन्यांनी मी निवृत्ती जाहीर केली. पण, मनाने मी त्या सामन्यानंतरच निवृत्त झालो होतो,’ असं म्हणताना धोणी आताही भावूक झाला होता. (MS Dhoni Retirement)
(हेही वाचा – Diamond Cluster In Navi Mumbai : देशातील सर्वात मोठे डायमंड क्लस्टर नवी मुंबईत; २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक)
मूळातच निवृत्तीचा निर्णय व्यावसायिक खेळाडूसाठी कठीणच असतो हे त्याने मान्य केलं. ‘१२-१५ वर्षं तुम्ही एकच गोष्ट केलेली असते. ती म्हणजे क्रिकेट खेळणं आणि त्यासाठीचं दडपण वागवणं आणि अचानक निवृत्तीनंतर मोठा खड्डा तयार होतो,’ असं धोनी या निर्णयाविषयी बोलताना म्हणाला. (MS Dhoni Retirement)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून २०२० साली निवृत्त झालेला धोनी आयपीएलमध्ये मात्र अजूनही खेळतोय. चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचं त्याने नेतृत्वही केलं आहे आणि यात २०२३ च्या हंगामात सीएसकेला विक्रमी सहावं विजेतेपद मिळवून दिलं आहे. निवृत्ती नंतरही लोकांनी चांगला क्रिकेटपटू म्हणून नाही तर चांगला व्यक्ती म्हणून आपल्याला आठवावं असंही त्याने नम्रपणे नमूद केलं. (MS Dhoni Retirement)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community