Ind vs Eng : स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ विरुद्ध विजयासाठी धडपडणारा इंग्लिश संघ यात बाजी कोण मारणार?

भारतीय संघ आणि इंग्लिश संघ रविवारी लखनौमध्ये आमने सामने येतील तेव्हा कागदावर तुल्यबळ असणारे हे संघ मैदानात मात्र वेगळ्याच विवंचनेत असतील.

130
Ind vs Eng : स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ विरुद्ध विजयासाठी धडपडणारा इंग्लिश संघ यात बाजी कोण मारणार?
Ind vs Eng : स्पर्धेतील अपराजित भारतीय संघ विरुद्ध विजयासाठी धडपडणारा इंग्लिश संघ यात बाजी कोण मारणार?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ आणि इंग्लिश संघ रविवारी लखनौमध्ये आमने सामने येतील तेव्हा कागदावर तुल्यबळ असणारे हे संघ मैदानात मात्र वेगळ्याच विवंचनेत असतील. भारतीय संघ अपराजित आणि त्यामुळे विजयाच्या उन्मादात आहे. तर इंग्लिश संघ चार पराभवांनंतर विजयासाठी धडपडतोय. (Ind vs Eng)

विश्वचषक स्पर्धेतील हा २९ वा सामना असेल. खरंतर स्पर्धेच्या या टप्प्यावर स्पर्धेतील चुरस शीगेला पोहोचलेली असते. गुणतालिकेच्या पहिल्या चारात राहण्यासाठी संघ धडपडत असतात. एरवी हे वर्णन बरोबर आहे. पण, रविवारी जे दोन संघ एकमेकांना भिडणार आहेत, त्यासाठी अप्रस्तुत आहे. (Ind vs Eng)

कारण, इथं भारत वि इंग्लंड असा मुकाबला रंगणार आहे आणि भारतीय संघ आहे गुणतालिकेत वरुन दुसऱ्या स्थानावर, तर इंग्लिश संघ खालून दुसऱ्या स्थानावर. भारत अपराजित आहे. तर इंग्लिश संघ गतविजेता असला तरी सध्या विजयासाठी धडपडतोय. आणि आणखी एका पराभवानंतर तो स्पर्धेतून बाद ठरणार आहे. (Ind vs Eng)

हीच नामुष्की टाळण्यासाठी जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जो रुट या कसलेल्या खेळाडूंचा संघ रविवारी भारताविरुद्ध मैदानात उतरेल. संघाला स्पर्धेतली आणखी पडझड थांबवायची असेल आणि विजयाचा मार्ग कुठे दिसतो का, हे पडताळून पाहायचं असेल. एरवी, या स्पर्धेत बांगलादेशचा अपवाद वगळला तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि अगदी अफगाणिस्ताननेही त्यांची धुलाईच केलीय. (Ind vs Eng)

जो रुटच्या इंग्लिश संघाने हातात होतं ते सगळं करून पाहिलंय. संघातील १५ च्या पंधरा खेळाडूंना त्यांनी संधी देऊन बघितली. फॉर्मच्या कारणावरून त्यांनी अगदी उपकप्तानालाही डगआऊटमध्ये बसवलं. धाडसी खेळ केला. पण, यातून साध्य काहीच झालं नाही. उलट पराभवाचं अंतर वाढतच गेलं. श्रीलंकेविरुद्ध फलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवरही त्यांना दीडशेच धावा करता आल्या. (Ind vs Eng)

त्यामुळे लखनौमध्ये इंग्लिश खेळाडूंकडून नेमकी कसली अपेक्षा करायची हे आता सांगणं कठीणच आहे. आताच्या परिस्थितीत फक्त इंग्लिश खेळाडूच त्यांच्या पराभवाची नेमकी कारणं कदाचित सांगू शकतील आणि तेच संघाला यातून बाहेर काढू शकतील. बाकी त्यांच्या गोटात नेमकं काय बिनसलंय हे कुणालाच कळेनासं झालंय. (Ind vs Eng)

उलट भारतीय संघ ५ सामन्यांत ५ विजय मिळवून अगदी सुशेगात आहे. त्यांनी दोनदा ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सारख्या प्रतिस्पर्ध्यांना दोनशेच्या आत रोखलं. आणि नंतर त्यांच्या आघाडीच्या फळीने दमदार सुरुवात करून (ऑस्ट्रेलियाचा अपवाद वगळता) संघाला ४० षटकांतच विजयपथावर पण नेलं असा भारतीय संघाचा धडाका आहे. (Ind vs Eng)

संघासाठी आत्मविश्वास वाढवणारी गोष्ट ठरतेय ती शुभमन आणि रोहितची सलामीची जोडी. दोघंही पॉवरप्लेमध्ये धडाकेबाज सुरुवात करून देतायत आणि त्या जोरावर पुढची फळी कामगिरी फत्ते करतेय. ही गोष्ट इंग्लंड विरुद्धही जमून आली तर इंग्लंडला भारताविरुद्धचा मुकाबलाही सोपा जाणार नाही. (Ind vs Eng)

भारतीय संघात पहिल्या दोन सामन्यांत शुभमन नव्हता. तर आताच्या दोन सामन्यांत हार्दिक नव्हता. पण, त्यामुळे संघाला कोणताही फरक पडलेला नाही. कच्चा दुवा सांगायचाच झाला तर श्रेयस अय्यर अजून खात्रीलायक खेळत नाहीए आणि कुलदीप यादवला शेवटच्या सामन्यात मार पडलाय. बाकी भारतीय संघाचा जम बसलेला नाही. रविवारच्या सामन्याची खेळपट्टी, तिथलं वातावरण आणि संभाव्य संघ याविषयी आता जाणून घेऊया. (Ind vs Eng)

एकाना स्टेडिअमची खेळपट्टी

दोन वर्षांपूर्वी इथल्या स्टेडिअमचं नुतनीकरण करण्यात आलं. तेव्हाच खेळपट्टीही नवीन बसवण्यात आली. बाहेरून लाल माती आणून ती इथं बसवण्यात आली होती. दिसायला लाल दिसणारी ही खेळपट्टी फारसं गवत टिकवूही देत नाही. एरवी फलंदाजांना मदत करणारी ही खेळपट्टी हळू हळू भेगा मोठ्या झाल्यावर फलंदाजीसाठी थोडी अवघड बनते. चेंडूही थांबून बॅटवर येतो. त्यामुळे हा सामना खूप मोठ्या धावसंख्येचा होणार नाही हे नक्की. (Ind vs Eng)

हवामानाचा अंदाज

लखनौमध्ये रविवारी ३२ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाची शक्यता शून्य टक्के आहे. आणि आर्द्रता ४० टक्के. त्यामुळे हवामानही थकवणारंच असेल. (Ind vs Eng)

हेड-टू-हेड

भारत आणि इंग्लिश संघादरम्यान एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत झालेले सामने पाहिले तर इंग्लंड थोडं सरस आहे. म्हणजे एकूण ८ सामन्यांपैकी त्यांनी ४ जिंकलेत. तर भारताने ३. २०११ च्या विश्वचषकातील तो ऐतिहासिक सामना टाय झाला होता. (Ind vs Eng)

आताच्या स्पर्धेत मात्र भारतीय संघ अपराजित आहे. तर इंग्लिश संघ पाच पैकी फक्त एक सामना जिंकलाय आणि शेवटच्या तीन सामन्यांत त्यांनी पराभवाची हॅट-ट्रीक केलीय. (Ind vs Eng)

(हेही वाचा – Chemical Engineer In Drug Case : केमिकल इंजिनियर अमली पदार्थांच्या विळख्यात)

संभाव्य संघ

भारतीय संघात कुठलाही बदल होण्याची शक्यता कमी आहे. मोहम्मद शामी चांगली कामगिरी करतोय. तर सुर्यकुमार यादवही २ धावांवर दुर्दैवीरित्या धावचित झाला होता. फक्त एकाना स्टेडिअमची खेळपट्टी फिरकीला साथ देते हे राहून अश्विनला खेळवण्याचा मोह कदाचित रोहीत आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला होऊ शकतो. (Ind vs Eng)

तर इंग्लिश संघाने आतापर्यत त्यांच्याकडे असलेले सगळे पर्याय तपासून पाहिले आहेत. पण, कुठलाही बाण रामबाण ठरला नाही. पण, सध्याचा फॉर्म पाहता जो रुट, बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनाच संघात महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे आणि मालनला कामगिरीत सातत्य दाखवून द्यावं लागणार आहे. आदिल रशिदची फिरकी निर्णायक भूमिका बजावणार आहे. रविवारी दुपारी दोन वाजता हा सामना सुरू होणार आहे. (Ind vs Eng)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.