जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील उपोषणाला बसलेले आहेत. (Manoj Jarange) गेले ५ दिवस त्यांनी पाणी, औषधे काहीच घेतलेले नव्हते त्यांनी पाणी तरी प्यावे अशी विनंती त्यांना राज्यभरातून करण्यात येत होती. त्यांनी २९ ऑक्टोबर रोजी रात्री पाण्याचा एक घोट घेतला आहे. ‘आता पाणी पितोय पुन्हा पिणार नाही’, असा इशारा यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. (Manoj Jarange)
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत चालली असून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात अन्य जिल्ह्यातही मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. नेत्यांना गावबंदी केली जात आहे. अनेक ठिकाणी नेत्यांचा ताफा अडवण्यात आला आहे. काही ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले, तर काही ठिकाणी मंत्री, खासदार, आमदारांच्या गाड्या अडवल्या जात आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. एसटीवर अनेक जिल्ह्यांत दगडफेक सुरू आहे. एकंदरीत राज्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. (Manoj Jarange)
चंद्रशेखर बावनकुळे यांना विरोध
राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची संकल्प यात्रा सुरू आहे. ही यात्रा डोंबिवलीत आली होती. यावेळी काही मराठा आंदोलकांनी बावनकुळे यांच्या कार्यक्रमात अडथळे आणले. ‘मराठा आरक्षण कधी देणार ?’ असा प्रश्न विचारत बावनकुळे यांना उत्तर देण्यास भाग पाडण्यात आले. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणाही देण्यात आल्या. बावनकुळे यांनी सर्व आंदोलकांना स्टेजवर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली.
विखे पाटील यांच्या समोर घोषणाबाजी
नगरमध्ये मराठा आंदोलकांनी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणकर्त्यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. विखे पाटील यांचा ताफा येताच आंदोलकांनी ‘परत जा, परत जा, विखे पाटील परत जा’, अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी ७-८ जणांना ताब्यात घेतले.
संजय राऊत यांची बाईक रॅली रद्द
ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज पुणे जिल्ह्यातील दौंड येथे आले होते. ते थांबलेल्या हॉटेलला आंदोलकांनी घेराव घातला. ‘संजय राऊत चले जाव’च्या घोषणा देण्यात आल्या. तसेच संजय राऊत हे दौंडमधून गेले नाही, तर त्यांना बाहेर पडू देणार नाही, अशा इशारा दिला. तासभर आंदोलकांची घोषणाबाजी सुरू होती. मराठा समाज आक्रमक झाल्याने राऊत यांनी त्यांची बाईक रॅली रद्द केली.
संजय मांडलिक राजेश पाटील यांची गाडी अडवली
कोल्हापूरच्या आजरा येथे शिंदे गटाचे खासदार संजय मांडलिक आणि अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांची गाडी अडवण्यात आली आहे. संतप्त आंदोलकाने गाडी समोर झोपत ‘एक मराठा लाख मराठा’ची घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना बाजूला केले.
नगरमध्ये फोटोलाही विरोध
अहमदनगर शहरातील एन आर लॉन्स येथे प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मेळाव्याला मंत्री दीपक केसरकर, गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार होते. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी अहमदनगरचा दौरा रद्द केला आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी मराठा आंदोलक घुसले. त्यांनी स्टेजवरील दीपक केसरकर, गिरीश महाजन यांचे फोटो असलेला फलक हटवण्याची मागणी केली.
Join Our WhatsApp Community