पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ब्लॉक सुरु झाला आहे. या ब्लॉक साठी सोमवार, ३० ऑक्टोबर पासून तब्ब्ल ३१६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवसापासून या ब्लॉकचा खऱ्या अर्थानं फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. सोमवार ते शुक्रवार दररोज अप आणि डाऊन मिळून ३१६ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. सकाळपासूनच स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. २० ते २५ मिनिटे उशिराने धावणाऱ्या गाड्या, गाड्या पकडण्यासाठी प्रवाशांनी केलेली झुंबड, धक्काबुकी गोंधळ असेच काहीसे चित्र पश्चिम रेल्वे स्थानकांवर पाहावयास मिळाले. रेल्वे च्या नियोजनशून्य कारभाराचा फटका प्रवाशांना चांगलाच सहन करावा लागत आहे. (Western Railway Megablock )
पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत या ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. २७ आणि २८ तारखेला प्रत्येकी २५६ फेऱ्या रद्द झाल्या. तर रविवारी ११६ अप आणि ११४ डाऊन अशा एकूण २३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. शुक्रवारी झालेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी धक्काबुक्कीच्या घटना घडल्या.
रेल्वेने कसलेही नियोजन न करता, तीनशे लोकल रद्द केल्या. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी. अपुरी बेस्ट व्यवस्था. रिक्षा-टॅक्सी चालकाकडून होणारी लूट आणि स्टेशनवर प्रचंड गर्दीत होणारी रेटारेटी. यामुळे प्रवाशांचा संयम सुटू शकतो. अपुरे पोलिस बळ असताना, पोलिस विभागाला विश्वासात न घेता, पश्चिम रेल्वेने खार-गोरेगाव दरम्यान हाती घेतलेल्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची भीती पोलिसांना वाटत आहे. पोलिस अधिकारी मोकळेपणाने यावर बोलायला तयार नाहीत.ब्लॉकच्या घोषणेपूर्वीच त्याचा परिणाम लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अचूक नियोजन करण्याची गरज होती.
(हेही वाचा : Rohit Sharma Record : रोहित शर्माच्या १८,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण )
अतिरिक्त मनुष्यबळ, गर्दीचे व्यवस्थापन, तसेच सुरक्षेचा आधीच विचार व्हायला हवा होता, यावर सुरक्षा यंत्रणांनी बोट ठेवले आहे. मुंबईतील सर्व वाहतूक यंत्रणांशी आधीच चर्चा करणे, रात्रीच्या वेळी काम, लांब पल्ल्याच्या गाड्यांचे फेरनियोजन, मेट्रोला फेऱ्या वाढविणे किंवा मध्य रेल्वेची मदत घेत हार्बरच्या फेऱ्या वाढविल्या असत्या, तर ही परिस्थिती आली नसती, पण पश्चिम रेल्वेने त्याचे व्यवस्थापन नीट न केल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीला ३०० पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे. मात्र, सकाळी आणि सायंकाळी पोलिसांची दमछाक होत आहे. प्रवाशांच्या संतापाला सामोरे जावे लागत आहे.पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी सुरु असलेल्या कामामुळे दररोज शेकडो लोकल फेऱ्या रद्द होत आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या स्थानकात अशा प्रकारे प्रवाशांची गर्दी आणि कोंडी होत आहे.महत्त्वाच्या स्थानकांवर लक्षरेल्वे स्थानकांतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र संयम संपत चाललेल्या प्रवाशांकडून कुठे धक्काबुक्की, तर कुठे अंगावर धावून येण्याच्या घटना घडत आहेत.
या स्थानकांवर विशेष लक्ष
अंधेरी, बोरीवली, मालाड, दादर, कांदिवलीसह महत्त्वाच्या गर्दीच्या स्थानकांवर पोलिसांचे विशेष लक्ष आहे. गर्दीवर सीसीटीव्हीद्वारेही वॉच ठेवला जात आहे. त्याचप्रमाणे स्थानकात गाडी आल्यावर गोंधळ, रेटारेटी, चेंगराचेंगरी होणार नाही, याचीही काळजी पोलिस घेत आहेत.गरज नसल्यास गर्दीची वेळ टाळालोकलच्या फेऱ्या रद्द झाल्याने त्याचा भार अपरिहार्यपणे अन्य लोकलवर येतो. गर्दी टाळण्यासाठी आम्ही नियोजन करत आहोत, पण गर्दीच्या तुलनेने पोलिसबळ कमी पडते. तरीही भविष्यात होणाऱ्या सुधारणांच्या दृष्टीने रेल्वे, तसेच पोलिसांना सहकार्य करा. नागरिकांनी गरज नसल्यास गर्दीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे.
४ आणि ५ नोव्हेंबरला जम्बो मेगाब्लॉक
चार आणि पाच तारखेला म्हणजेच शनिवार आणि रविवार जोडून २४ तासांचा एक जम्बो मेगाब्लॉक देखील घेण्यात येईल. त्यामुळे पाच तारखेपर्यंत पश्चिम रेल्वे वरील प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. यासंदर्भात पश्चिम रेल्वेकडून माहिती देण्यात आलीये. दरम्यान, ब्लॉकच्या काळात रेल्वेचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच या कालावधीमध्ये होणाऱ्या प्रवाश्यांच्या गैरसोयीसाठी रेल्वेकडून दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आलीये. दरम्यान मेल एक्सप्रेस प्रमाणे लोकल सेवांवर देखील या ब्लॉकचा परिणाम होणार असल्यामुळे चाकमान्यांना देखील मोठ्या त्रासाला समोरे जावे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही पहा –