दादरमधील सर्वांत मोठी घाऊक मंडई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईच्या खासगी विकासकाच्या माध्यमातून होणाऱ्या पुनर्विकासाचा प्रस्ताव रद्द केल्यानंतर महापालिकेकडून या मंडईच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मंडईच्या स्वच्छतेसह सांडपाणी, लादीकरण तसेच छपराची दुरुस्ती कामे तातडीने हाती घेणे आवश्यक असतानाही महापालिकेच्या बाजार विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने कोळी भगिनींसह गाळेधारकही हैराण झाले आहेत.
दादर पश्चिम येथील रानडे मार्ग आणि डिसिल्वा मार्गावर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई असून या मंडईत प्रत्येक भाजी विक्रेत्यांच्या बाकडे उंच केले असले तरी खालील बाजुस मोकळे असल्याने त्याठिकाणी उंदर, घुशींचा वावर असतो. तसेच मासळी बाजारातील स्वच्छता योग्य प्रकारे नसल्याने कोळी महिलांकडून कायमच नाराजी व्यक्त केली जाते. तर मटण विक्रेत्यांच्या गल्लीमध्ये तर अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे तिथे नाकाला रुमाल लावल्याशिवाय जाता येत नाही. (Savarkar Mandai Dadar)
(हेही वाचा – Maratha Reservation : सरकारला एखादा बळी घ्यायचा असेल, तर घेऊ द्या; मनोज जरांगे भूमिकेवर ठाम)
या मंडईतील कोळी भगिनींच्या म्हणण्यानुसार, या मार्केटमधील स्वच्छता योग्यप्रकारे केली जात नाही. मासळीचा कचरा हा तसाच पडलेला असतो. हा मासळी बाजार दुपार व्यवसाय बंद झाल्यानंतर स्वच्छ व्हायला हवा, तसा होत नाही, काही ठिकाणी मासळीचा कचरा पडलेला राहतो, तसेच नाळीतील पाणीही कधी कधी तुंबून राहते. तर गाळेधारकांच्या म्हणण्यानुसार या मार्केटची दुरुस्ती करून आवश्यक त्या सेवा मात्र दिल्या जात नाही.
या मार्केटचा पुनर्विकास होणार होता, परंतु हा विकास जर महापालिका करणार असेल तर त्यांनी करावा परंतु त्याआधी या मार्केटच्या दुरुस्तीची कामे तसेच इतर सेवाही उपलब्ध करून द्यायला हव्यात. या मार्केटचे बाजार निरिक्षक यांच्याकडे चार ते पाच मार्केटचा भार आहे, त्यामुळे ते प्रयत्न करत असले तरी त्यांच्या विभागाकडून त्यांना सहकार्य मिळत नसल्याची खंतही गाळेधारकांनी व्यक्त केली आहे. (Savarkar Mandai Dadar)
काही गाळेधारकांच्या म्हणण्यानुसार, या मंडईच्या स्वच्छतेसाठी पूर्वी ८ कामगार होते, जे या मंडईची स्वच्छता राखत होते. पुढे या स्वच्छतेची जबाबदारी कोळी महिलांवर टाकली, ज्यामुळे त्यांना दुसरीकडे पाठवण्यात आले. परंतु कोळी महिलांवरील जबाबदारी काढून टाकण्यात आल्यानंतर कोणीही या मार्केटच्या स्वच्छतेसाठी उपलब्ध नाही. सध्या टॉयलेटची देखभाल करणाऱ्या संस्थेच्या एका महिलेकडून या मंडईची साफसफाई राखली जाते. पण ही स्वच्छता मेहेरबानी खात्यावर केली जात असून बाजार निरिक्षकांच्या शब्दाखातर ही संस्था ही सेवा देत असली तरी यासाठी कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी कामगारांची गरज असल्याचे कोळी भगिनींसह गाळेधारकांचे म्हणणे आहे. (Savarkar Mandai Dadar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community