Maratha Reservation : मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, पाणी प्यावे.मात्र आंदोलकांनीही शांततेचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले

132
Maratha Reservation : मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
Maratha Reservation : मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती भोसले, गायकवाड आणि शिंदे यांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असून ही समिती मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आणि मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्यासंदर्भात मार्गदर्शन करेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (३० ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत दिली. त्याचवेळी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी सरकारला दिलेला अहवाल मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीतही स्वीकारण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Maratha Reservation)

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत झालेल्या विविध निर्णयाचीही माहिती दिली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाममंत्री दादाजी भुसे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी यावेळी उपस्थित होते. (Maratha Reservation)

मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले की, मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीचा अहवाल आजच न्या. शिंदे यांनी सरकारला सादर केला असून त्यांनी सुचविलेल्या विविध मुद्द्यांवर आज सखोल चर्चा झाली. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Eknath Shinde : पलावावासियांना मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट)

न्या. शिंदे समितीने आत्तापर्यंत एक कोटी ७३ लाख ७० हजार ६५९ नोंदी तपासल्या असून ११ हजार ५३० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यातल्या जुन्या नोंदी तपासताना उर्दू आणि मोडी भाषेतील कागदपत्रांचे मराठी भाषांतर करून घेण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेण्यास संमती दिल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेचे काम सुद्धा अधिक गतीने सुरूच आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी स्थापन केलेल्या वरिष्ठ वकिलांच्या टास्क फोर्सची बैठकसुद्धा लवकरच घेण्यात येईल. मात्र तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळताना जी निरीक्षणे नोंदविली तिचाही अभ्यास मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती निरगुडे करतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (Maratha Reservation)

मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत त्याकडे आम्ही सर्वच अतिशय गांभीर्याने पाहत आहोत.सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे यासाठी सर्व बाजूंचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल. मात्र हे आरक्षण देत असताना इतर घटकांवर अन्याय होणार नाही. यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही, असे पुन्हा घडू नये यासाठी काळजी पूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे. मराठा समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, पाणी प्यावे.मात्र आंदोलकांनीही शांततेचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी शेवटी केले. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.