माळरानाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी वन विभागाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये माळरानावरील वन्य प्राण्यांचे जीवन, पक्षी यांच्या जीवनाचे दर्शन घडायला मदत होईल. राज्यात पहिल्यांदाच असा प्रयोग पुणे जिल्ह्यात प्रयोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे.
कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस यासारखे वन्य प्राणी, पक्षी आणि इतर वन्यप्राण्यांचे दर्शन माळरानावर घडते. माळरानाविषयीची माहिती नागरिकांमध्ये योग्यरीत्या पोहोचावी, तेथील परिसंस्था कशी असते, हे समजावे याकरिता पुणे वन विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्रात पहिल्या ग्रासलॅंड सफारीचे (Malran Safari) आयोजन करण्यात आले आहे. याकरिता www.grasslandsafari.org या संकेतस्थळांचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict : हमासला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलला सापडलं नवं हत्यार, कोणतं? वाचा सविस्तर… )
वन्यप्राण्यांची प्रकाशचित्रे…खास आकर्षण !
माळरान म्हणजे गवताळ कुरण. येथे कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस आदी प्राण्यांचा आधिवास असतो. येथेही विविध प्रकारची जैवविविधता असते. हा अधिवास सध्या धोक्यात आला आहे. त्याचे रक्षण होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल. बारामती, दौंड, इंदापूर, सासवड, जेजुरी या भागातील वनक्षेत्रात गवताळ कुरणे आहेत. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी आणि बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या दोन ठिकाणी या ग्रासलॅंड सफारी सुरू केल्या आहेत. यामध्ये वन्यजीव छायाचित्रकारांना वन्यप्राण्यांची प्रकाशचित्रेही काढता येणार आहेत. या सफारीमुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.