दादर (पश्चिम) येथील वीर सावरकर मार्गावरील मरीन झू अर्थात सागरी प्राणिसंग्रहालयाच्या आवारात अनधिकृतरित्या बांधकामांवर अखेर महापालिकेने कारवाई केली. या ठिकाणी उभारलेली एकूण ६ तात्पुरती बांधकामे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाने सोमवारी हटवली आहे. (Dadar Marine Zoo)
दादर सागरी प्राणिसंग्रहालयाच्या आवारात अनधिकृतपणे, आवश्यक त्या कोणत्याही परवानगी प्राप्त न करता तात्पुरती बांधकामे करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेच्या जी-उत्तर विभागाने या प्राणिसंग्रहालयाला ७ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५५ नुसार नोटिस देऊन १५ दिवसांच्या आत ही बांधकामे हटवण्याची सूचना केली होती. मात्र त्याचे पालन न झाल्याने आज महानगरपालिकेने स्वतः कारवाई करत ही बांधकामे काढून टाकली. (Dadar Marine Zoo)
(हेही वाचा – Malran Safari : माळरानाच्या संवर्धानासाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अनोखा प्रयोग, वनविभागाने घेतला पुढाकार)
या सहा तात्पुरत्या बांधकामांमध्ये बांबू, ताडपत्री तसेच पत्रे वापरुन तयार केलेले शेड तसेच एक विटांचे बांधकाम आदींचा समावेश आहे. उपआयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक सहायक अभियंता, तीन कनिष्ठ अभियंता, चार मुकादम, चाळीस कामगार आदींच्या पथकाने भाग घेत ही बांधकामे जमीनदोस्त केली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) पोलीस ठाणे यांच्यावतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (Dadar Marine Zoo)
Join Our WhatsApp Community