राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना १५ एप्रिल रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ११ एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
१२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
डॉ. बलसरा यांनी शस्त्रक्रिया केली!
शरद पवार यांना ३० मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांना ७ दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यामुळे शरद पवार यांना पुढील शस्त्रक्रियेसाठी रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली.
Join Our WhatsApp Community