राज्यात सध्या कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनामुळे मृतांची संख्या देखील वाढत आहे. एकीकडे वाढती रुग्ण संख्या आणि दुसरीकडे वाढते मृत्यू यामुळे ठाकरे सरकारने ब्रेक द चेनची घोषणा केली आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी कोरोनाने मृत झालेल्यांची आकडेवारी लपवण्याचे प्रकार देखील समोर येऊ लागले आहेत. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या विरार-वसईमध्ये देखील असे प्रकार समोर आले आहेत. शहरात मागील १३ दिवसांत २०१ जणांचा मृत्यू झाला असून, पालिकेने केवळ २३ मृत्यू दाखवले आहेत. तर जानेवारी ते १३ एप्रिलपर्यंत २९५ मृत्यू झाले असताना पालिकेने केवळ ५२ दाखवले आहेत. त्यामुळे पालिकेने आतापर्यंत २४३ कोरोना मृत्यू लपवले का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कॉरोना मृतांची नोंद, ठाकरे सरकारची लपवाछपवी
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 15, 2021
1 ते 13 एप्रिल काळात वसई विरार शहरात २०१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाले. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत
ठाणे महापालिका क्षेत्रात 57 कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे, परंतू स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार 309 झाले असल्याची नोंद आहे pic.twitter.com/k1gbDku0So
अशी झाली माहिती उघड!
सोमवार, १२ एप्रिल रोजी शहरात कोरोनामुळे ११ मृत्यू झाले होते. त्यात एका खासगी रुग्णालयातील ७ रुग्णांचा समावेश होता. मात्र पालिकेने केवळ २ रुग्ण दगावल्याची नोंद दैनंदिन अहवालात केली होती. त्यामुळे पालिका कोरोना रुग्णांचे मृत्यू लपवत असल्याचा संशय येऊ लागला. शहरात मान्यता असलेले १० खासगी कोरोना रुग्णालये आहेत, तर पालिकेचे २ कोरोना केंद्रे आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पालिकेकडे सोपविण्यात येतो. सोबत कोरोना झाल्याचे प्रमाणपत्र असते. कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहांची विल्हेवाट पालिकेच्या ८ स्मशानभूमीमध्ये करण्यात येते. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. किती मृतदेहांवर अंत्यसंसस्कार झाले त्यांची अधिकृत आकडेवारी पालिकेकडे आहे. ही यादी तपासली असता पालिकेने सव्वा तीन महिन्यांत २४३ कोरोनाबाधीत रुग्णांचे मृत्यू लपविल्याचे उघड झाले आहे.
खासगी रुग्णालयात जे रुग्ण मृत पावतात त्यांची नोंद दैनंदिन अहवालात केली जात नव्हती. दैनंदिन अहवालात केवळ पालिका रुग्णालयातील मृतांचे आकडे असतात. मात्र यापुढे खासगी रुग्णालयातील मृतांचे आकडे देण्यात येतील.
– गंगाथरण डी. आयुक्त, वसई-विरार शहर महापालिका.
याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी शासनाकडून जे आकडे येतात तेच मृतांचे आकडे देत आहोत असे सांगत सारवा-सारव केली आहे. वसई-विरार शहरात दररोज सरासरी ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. पालिकेतर्फे दररोज कोरोनाचा दैनंदिन अहवाल सादर केला जातो. त्यात शहरातील कोरोना मृत्यूचे आकडे केवळ १ आणि ० असेच असायचे. शहरात कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होत असताना पालिका मृत्यूचा आकडा कमी दाखवत होती. याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मागील तीन महिन्यांची आकडेवारी
———————————————————————-
प्रत्यक्ष मृत्यू पालिकेचे आकडे तफावत
————————————————————————
जानेवारी २९ ९ २०
फेब्रुवारी १६ ५ ११
मार्च ४९ १५ ३४
एप्रिल २०१ २३ १७८
(१३ एप्रिलपर्यंत)
——————————————————————–
एकूण २९५ ५२ २४३
———————————————————————-