स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेला राष्ट्रवाद आणि सामाजिक समतेचा विचार अंगिकारून या देशात अनेक पावले उचलली जात आहेत. सावरकरांनी जो राष्ट्रवादाचा विचार मांडला, तो वैचारिक मार्ग अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे २०१४पासून देशात खऱ्या अर्थाने सावरकर युग सुरू झाल्याची भावना आमदार अतुल भातखळकर यांनी व्यक्त केली.
‘न्यूज डंका’च्या (News Danka) ‘मोदी-३’ या दसरा-दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ‘न्यूज डंका’चे सल्लागार संपादक या नात्याने आमदार भातखळकर बलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी, ‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी व्यासपीठावर उपस्थित होते.
अतुल भातखळकर म्हणाले, ‘मोदी-३’ हा विषय एका दृष्टीने अंगावर रोमांच उभा करणारा आहे. मोदींचे व्यक्तिगत, सामाजिक जीवन एका वाक्यात सांगायचे झाल्यास, ‘विजयादशमीला १९२५ सालापासून या देशातील लक्षावधी कार्यकर्त्यांनी जो अनन्वित त्याग-सेवा-अत्याचार सहन केला, त्या त्यागाला आलेले हे एक सुंदर फळ आहे’. या देशातील गरीबाला जर कोणाचा आधार वाटत असेल, तर तो फक्त नरेंद्र मोदी यांचाच आहे. परंतु, काही माध्यमे जाणीवपूर्वक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यांना एलओसी आणि एलएसी यातला फरक कळत नाहीत, ते अग्रलेख लिहीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघांपासून सुरुवात झालेला मोदींचा प्रवास, राष्ट्रवादाच्या वाटेवरून मार्गस्थ होत एका देदिप्यमान उंचीवर येऊन पोहोचला आहे. हा एक राष्ट्रयज्ञ आहे. या राष्ट्रवादाच्या यज्ञात ‘न्यूज डंका’च्या माध्यमातून आमची एक समिधा अर्पण केलेली आहे. ती गोड मानून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
(हेही वाचा Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही; जरांगे यांचा एल्गार)
‘मोदी-३’ का?
१२ जानेवारी २०२१ रोजी ‘न्यूज डंका’ची (News Danka) सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत तीन दसरा-दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आले. पहिल्या वर्षी ‘सुशासनपर्व’, दुसऱ्या वर्षी ‘अमृतकाल’ आणि आता ‘मोदी-३’ या अंकाचे प्रकाशन करीत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनावेत, असे भारतवासीयांचे स्वप्न आहे. मोदी देशाची सेवा करीत आहेत, त्यामुळेच देशवासीय निरपेक्ष भावनेने त्यांच्या पाठीशी उभे आहोत. ‘न्यूज डंका’च्या माध्यमातून आम्ही हीच भूमिका घेऊन पुढे जात आहोत. ‘मोदी-३’ हा अंक त्याचे प्रतिबिंब आहे, अशी माहिती ‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांनी दिली.
तटस्थ पत्रकार नपूंसक – सुशील कुलकर्णी
- स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या या पवित्र वास्तूत उभा राहून बोलताना मला प्रचंड अभिमान वाटतो. कारण माणूस इकडे आला की खरे बोलतो. या वास्तूत आल्यावर एक मुख्यमंत्री म्हणाले होते, या देशाचे आद्यक्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर होते. पुढे जाऊन त्यांची भूमिका बदलली; पण इकडे ते खरे बोलले हे महत्त्वाचे, असा टोला ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी लगावला.
- तटस्थ पत्रकारिता म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. माझ्या मते तटस्थ पत्रकारिता म्हणजे हिंदुत्वाला शिव्या घालणे, नरेंद्र मोदींचा दुष्प्रचार करणे, उजव्या विचारसरणीच्या लोकांना दुषणे देत राहणे, मुस्लिमांचे लांगुलचालन करणे. तटस्थ पत्रकार काँग्रेसचे खासदार होऊ शकतात, तरीही ते स्वतःला तटस्थ म्हणवतात. त्यामुळे असले पत्रकार मला हल्ली नपूंसकासारखे वाटतात.
- त्यामुळे ‘न्यूज डंका’ सारख्या माध्यमांचा उगम व्हावा, ती निरंतर चालवित म्हणून आता सर्वसामान्य लोक स्वतःहून पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, असे सुशील कुलकर्णी म्हणाले.
जरांगे दोन वर्षे उपोषणाला बसले तरी आरक्षण अशक्य – भाऊ तोरसेकर
- राज्यात सध्या आरक्षणाचा विषय तीव्र झालेला आहे. परंतु, जरांगे यांनी आणखी दोन वर्षे उपोषण केले, तरी महाराष्ट्र सरकार काहीही करू शकणार नाही. कारण हा विषय त्यांच्या अखत्यारित येत नाही, केंद्राच्या अखत्यारित येतो. हरियाणामध्ये जाट समाजाने आंदोलन केले, राजस्थानात गुज्जर, गुजरातमध्ये पटेलांचे आंदोलन झाले. पण, त्याचे पुढे काय झाले, याचा विचार कोणीच करीत नाही, असे परखड मत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी व्यक्त केले.
- निर्भय बनो नावाची चळवळ सुरू करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. याचा अर्थ निर्भय बनायला सांगणारे घाबरलेले आहेत, हे कबूल करायला हवेत. ते मोदी नावाला घाबरत आहेत. आता गांधी नेहरूंची एक्सपायरी डेट संपली आहे. त्यामुळे काळानुसार बदलले पाहिजे. १९९१ पासून २०२४ पर्यंत शरद पवार पंतप्रधान होतच आहेत. पण, पवारांचे सर्वाधिक नुकसान असल्या चमच्या पत्रकारांनी केले, असा टोलाही तोरसेकर यांनी लगावला.
- याआधी खेड्यांचा केंद्र सरकारशी संबंध फक्त लष्करातील नोकरी, पेन्शन आणि पोस्ट खात्यापुरता मर्यादित होता. परंतु, २०१४ नंतर खेडी थेट केंद्राशी थेट जोडली गेली आहेत. त्यामुळे विरोधकांना मोदींना टक्कर द्यायची असेल, तर त्यांना आधी मोदी समजून घ्यावे लागतील, असेही भाऊ तोरसेकर म्हणाले.