Jamnalal Bajaj सामाजिक कल्याणाचे व्रत घेतलेला उद्योगपती

187
आपल्या डोळ्यांसमोर उद्योगपती म्हटलं की सुटबुट घालणारे, उच्च जीवनशैली जगणारे लोक येतात. मात्र भारतात एक असा उद्योगपती होऊन गेला, ज्याने आपले सबंध जीवन लोक कल्याण, दलित व महिला सक्षमीकरणासाठी अर्पण केले. या महान उद्योगपतीचे नाव आहे जमनालाल बजाज (Jamnalal Bajaj). जमनालाल बजाज यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८८९ रोजी राजस्थानमधील जयपूर राज्यातील सीकर येथील “काशी का बस” येथे एका गरीब मारवाडी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कनिराम गरीब शेतकरी होते आणि आई बिरदीबाई गृहिणी होत्या.
मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की जमनालाल एवढे श्रीमंत उद्योगपती कसे झाले. तर जाणून घेऊया त्यांची ही कहाणी. एके दिवशी जमनालाल त्यांच्या घराबाहेर खेळत होते. वाटेने जात असताना वर्धा येथील सेठ बच्छराज यांनी जमनालाल यांना पाहिले. ते त्या लहान मुलावर इतके मोहित झाले की त्यांनी जमनालालला दत्तक घेण्याचे ठरवले. त्यावेळी जमनालाल ५ वर्षांचे होते व चौथीत शिकत होते. यानंतर सेठ बच्छराज (बजाज) आणि त्यांची पत्नी सादिबाई बच्छराज (बजाज) यांनी जमनालाल (Jamnalal Bajaj)  यांना त्यांचा नातू म्हणून दत्तक घेतले. हे श्रीमंत राजस्थानी व्यापारी जोडपं.. पण महाराष्ट्रातील वर्धा येथे स्थायिक झाले होते. ब्रिटीश राजवटीत सेठ बच्छराज हे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यापारी होते.
जमनालाल यांचा विवाह वयाच्या १३ व्या वर्षी ९ वर्षांच्या जानकीशी झाला. जमनालाल वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी व्यवसायात उतरले. १९२० च्या दशकात त्यांनी साखर कारखान्यापासून सुरुवात केली. जमनालाल यांनी एकामागून एक अनेक कंपन्या स्थापन केल्या, ज्या नंतर बजाज ग्रुप म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आज बजाज समूह भारतातील आघाडीचे व्यावसायिक म्हणून प्रचलित आहेत.
उद्योगाबरोबर त्यांनी त्याग, समर्पण, समाजसेवा आणि देशप्रेम ही तत्वे अंगिकारली. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांनी १९०६ मध्ये स्वदेशी आंदोलनात भाग घेतला आणि विदेशी कपड्यांची होळी केली. याची सुरुवात त्यांनी आपल्या कुटुंबापासून केली. १९२० मध्ये काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात असहकाराचा ठराव मंजूर झाल्यावर त्यांनी रायबहादूर या पदवीचा त्याग केला. १९२० मध्ये ते काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष झाले. त्यांना लोक महात्मा गांधींचा पाचवा मुलगा म्हणू लागले. १९२१ मध्ये त्यांनी वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली. ते विनोबा भावेंना गुरु मानत होते.
१९२३ मध्ये राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यात आली तेव्हा जमनालाल यांनी नागपुरातील ध्वज मिरवणुकीचे नेतृत्व केले. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. बजाज यांनी पूर्वास्पृश्य उद्धाराचे काम हाती घेतले. आपले कौटुंबिक मंदिर आणि विहीर त्यांसाठी खुली केली. त्यांनी सीकरमध्ये हरिजन शाळा देखील उघडली. त्यांनी मारवाडी शिक्षा मंडळ, गो-सेवा, ग्रामोद्योग, महिला व हरिजन सेवा, गांधी सेवा संघ, राष्ट्रभाषा, सत्याग्रह आश्रम, ग्रामसेवा या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. जमनालाल बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून आजही बजाज समूह समाजसेवेचे व्रत चालवत आहे. त्यांच्या स्मरणार्थ अनेक समाजसेवकांना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.