आता कोरोना लस उत्पादन करणारी हाफकिन इन्स्टिट्यूट आहे तरी काय? वाचा… 

मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला आता कोवॅक्सिन आणि कोव्हीशील्ड या भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लशी उत्पादन करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे.

160

पटकी, विषमज्वर, क्षयरोग, धनुर्वात, घटसर्प, अलर्क रोग (रेबीझ), प्लेग आदी आजारांवर यशस्वी लस बनवणाऱ्या मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटला आता कोवॅक्स आणि कोव्हीशील्ड या भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधात्मक लस उत्पादन करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे आता हाफकिन इन्स्टिट्यूटकरता स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवे आव्हान समोर आले आहे. इन्स्टिट्यूट आता एका बाजूला कोरोनासंबंधीच्या प्रचलित लसींचे उत्पादन करू शकते आणि त्यासोबत कोरोनावरील प्रतिबंधात्मक नव्या औषधाकरता संशोधनही करू शकते. हाफकिन ही विविध रोगांवर लशी निर्माण करणारी व प्रशिक्षण देणारी भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था आहे. तिला महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त होते. ही संस्था कौन्सिलद्वारा काम पाहते. तसेच तिला संशोधन सल्लागार समिती आणि शैक्षणिक सल्लागार समिती यांद्वारा मार्गदर्शन मिळते.

हाफकिन इन्स्टिट्यूटची वाटचाल!

  • ही संस्था भारतातील सर्वांत जुन्या संशोधन संस्थांपैकी एक आहे.
  • साथीच्या रोगाचा सर्वांगीण अभ्यास करणे, त्यांवर प्रतिबंधात्मक उपाय शोधणे, प्रतिबंधक लस निर्माण करण्याच्या शक्यता तपासणे, अशी संस्थेचा प्रमुख उद्दीष्टे आहेत.
  • १८९९–१९०४ या कालखंडात संस्थेमध्ये प्रामुख्याने प्लेगच्या लशीचे उत्पादन केले गेले आणि ही लस संपूर्ण देशभर पुरविण्यात आली.
  • १९व्या शतकात संस्थेने मुंबईत झालेल्या जैव-वैद्यकीय संशोधनात मोठा हातभार लावला आहे.
  • २०व्या शतकाच्या पूर्वार्धात संस्थेने आपले क्षेत्र विस्तारित करत सामान्यपणे होणाऱ्या पटकी, विषमज्वर, क्षयरोग, धनुर्वात, घटसर्प, अलर्क रोग (रेबीझ) आदी संसर्गजन्य रोगांवर लक्ष केंद्रित केले.
  • त्यानंतर संस्थेने अलर्क रोगाविरोधी आणि सर्पदंश (विष) विरोधी लस तयार केली. ही संस्था या लशींची भारतातील सर्वांत मोठी उत्पादक बनली.
  • त्याप्रमाणेच संस्थेने तेथे तोंडातून देता येणारी पोलिओ लसनिर्मिती देखील सुरू केली आणि नवजात अर्भकांचे घटसर्प, डांग्या खोकला व धनुर्वात यांपासून संरक्षण करण्यासाठी त्रिगुणी लशीचे उत्पादनही सुरू केले.
  • हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये २०१४ सालापासून एड्समुळे रुग्णात होणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर संशोधन सुरू आहे.
  •  एचआयव्ही विरोधात कार्य करू शकणाऱ्या काही जैवकणांवर देखील ही संस्था संशोधन करीत आहे.

(हेही वाचा : मोदींनी नेमके कोणत्या ठाकरेंचे ऐकलं?)

हाफकिनचा इतिहास! 

वॉल्डेमार मॉर्डीकाय वुल्फ हाफकिन या रशियन शास्त्रज्ञांनी १८ जुलै १८९२ रोजी पटकी (कॉलरा) या रोगाची प्रतिबंधक लस तयार केली. या लशीची परिणामकारकता तपासण्यासाठी ते रशियाहून मार्च १८९३ मध्ये पटकीची साथ सुरू असलेल्या कोलकाता येथे आले. त्यांच्या लशीचा उपयोग जवळपास ४०,००० रुग्णांना झाला. त्यांच्या या कामगिरीमुळे १८९६ मध्ये मुंबईत उद्भवलेल्या प्लेगच्या साथीवर लस शोधण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना बोलाविले. सुरुवातीला त्यांनी आपले संशोधन ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एक खोली असलेल्या लहान प्रयोगशाळेत सुरू केले. अल्पावधीतच (तीन महिन्यांत) त्यांना लस शोधून काढण्यात यश मिळाले. नंतर त्यांना कामासाठी प्रयोगशाळा अपुरी पडू लागली, त्यामुळे विविध जागेत स्थलांतर करीत शेवटी १० ऑगस्ट १८९९ मध्ये ‘गव्हर्न्मेंट हाउस’ या इमारतीत हाफकिन यांची ‘प्लेग रिसर्च लॅबोरेटरी’ स्थिरावली. १९०६ मध्ये या प्रयोगशाळेचे नाव बदलून ‘बाँबे बॅक्टेरिऑलॉजिकल लॅबोरेटरी’ असे ठेवण्यात आले. हाफकिन यांच्या सेवानिवृत्तीनंतर १० वर्षांनी म्हणजे १९२५ मध्ये त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या प्रयोगशाळेचे नाव ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ असे करण्यात आले. १९७५ मध्ये या संस्थेचे विभाजन करून ते लशी व इतर उत्पादने यांची निर्मिती करणारा ‘हाफकिन जीव-औषधी निर्माण महामंडळ’ हा स्वतंत्र व स्वायत्त विभाग आणि ‘हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था’ हा संशोधन विभाग, असे करण्यात आले. हाफकिन इन्स्टिट्युटच्या सध्याच्या इमारतीचे बांधकाम १६७३ मध्ये पोर्तुगीजांनी फ्रान्सिस्कन मठासाठी केले होते. १७१९ मध्ये गव्हर्नर कून यांनी ती वास्तू ताब्यात घेतली. १७५० पासून तिचा वापर गव्हर्नरचे उन्हाळ्यातील निवासस्थान म्हणून केला जाई. १८९९ मध्ये ती वास्तू हाफकिन यांच्या ताब्यात देण्यात आली.

संस्थेची रचना!

हाफकिन इन्स्टिट्यूटची संरचना अत्याधुनिक साधनांनी सुसज्ज अशी आहे. लशींच्या औषधांच्या चाचण्यांसाठी प्राण्यांची जरूरी असल्याने संस्थेत प्राण्यांसाठी मोठी प्रयोगशाळा आहे. त्यात ससे, उंदीर, गिनीपिग इ. प्राणी असून त्यांच्यासाठी प्रजनन सुविधा देखील आहे. सर्पविषाची निकड भागावी म्हणून संस्थेने सर्पगृह बांधून त्यात भारतातील सर्व जातींचे विषारी साप पाळले आहेत. तसेच प्रतिरक्तद्रवाच्या उत्पादनासाठी घोड्यांचा उपयोग होत असल्याने घोडेही पाळले आहेत.

या संस्थांकडून मिळाली मान्यता 

आयएसओ ९००१ : २००८, भारत सरकारद्वारा शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन संस्था (SIRO) आणि विज्ञान व तंत्रविद्या विभाग (DST) याचे संशोधन आणि विकास केंद्र, जागतिक आरोग्य संघटना (WHO), भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (ICMR) आणि समाकलित रोग निरीक्षण कार्यक्रम (IDSP) यांच्याकडून मानव आणि पक्षी यांतील इन्फ्ल्यूएंझा संनिरीक्षक म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच स्वाइन फ्ल्यूसाठी भारत शासनाची अधिकृत प्रयोगशाळा, जागतिक आरोग्य संघटनेचे अलर्क रोगासंबंधी संदर्भ केंद्र, राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्राचे (NCDC) प्लेग निरीक्षण केंद्र, अन्न व औषधी प्रशासनाचे (FDA) औषध चाचणी केंद्र यांसारख्या अनेक जबाबदाऱ्या ही संस्था पार पाडते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.