काश्मीरमधील कुपवाडा येथे भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. (Shivaji Maharaj Statue at LOC) हा पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, ऊर्जादायी ठरेल. छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा ध्वज शत्रूच्या छातीवर फडकवण्यासाठी नेहमीच जवानांना प्रेरणा देईल. त्यांचे मनोबल उंचावत राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कुपवाडा येथे व्यक्त केला. ते पुतळा अनावरणाच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यामध्ये उपस्थित होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष समोरच्या पर्वंतरांगापलीकडे असलेल्या पाकिस्तानमध्ये हा जयघोष पोहोचला पाहिजे’, असे आवाहन या वेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
‘आम्ही पुणेकर’ संस्था आणि ४१ राष्ट्रीय रायफल मराठा बटालियन यांच्या माध्यमातून कुपवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्याचे अनावरण ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. या वेळी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, ‘महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळा’चे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, ‘आम्ही पुणेकर’ संस्थेचे विश्वस्त अभयसिंह शिरोळे, हेमंत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. (Shivaji Maharaj Statue at LOC)
(हेही वाचा – Sunil Tatkare : २००९ मध्ये शिवसेनेसोबत लोकसभा निवडणूक लढवणार होतो?; सुनिल तटकरेंचा गौप्यस्फोट!)
महाराजांची नजर पाकिस्तानवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ”अश्वारुढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पाकिस्तानच्या दिशेने बघत आहेत. त्यांच्या हातात तलवार आहे. महाराज येथे असल्याने शत्रू येथे पाऊल ठेवण्यास धजावणार नाही. हा पुतळा पाहून दहशतवादीही काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याची हिंमत करणार नाहीत.”
‘कुपवाडा येथे असलेले हे स्मारक जम्मू-काश्मीरला भेट देणाऱ्या देशातील लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनेल. हे स्मारक महाराष्ट्र आणि काश्मीरमधील संबंध अधिक दृढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल’, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. (Shivaji Maharaj Statue at LOC)
मराठा बटालियनचे कौतुक
ज्या ठिकाणी हा पुतळा बसवला आहे, त्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मोठा खड्डा पडला होता. तेव्हा जवानांनी सुमारे १८०० ट्रक माती भरून त्या ठिकाणी पुतळ्यासाठी भक्कम पाया बनवला. याचा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी मराठा बटालियनच्या जवानांचे कौतुक केले. सातारा येथील मेजर संतोष महाडीक यांना अभिवादन करत त्यांच्या बलिदानाची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
कुपवाडा येथे शिवाजी महाराज पर्व – मनोज सिन्हा
आज कुपवाडा येथे नव्या परंपरेला सुरूवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी कुपवाडा येथे ७ नोव्हेंबरला शिवाजी महाराज पर्व साजरे करण्यात यावे, असे आवाहन नायब राज्यपाल श्री. सिन्हा यांनी जवानांना केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शुरविरांना दिलेला ‘स्वत:वर विश्वास ठेवा, मी नेहमी तुमच्या सोबत असेन’ हा संदेश मराठीतून वाचत नायब राज्यपाल सिन्हा यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा दिला. (Shivaji Maharaj Statue at LOC)
जवानांसोबत दिवाळी
या ठिकाणी मराठा बटालियन असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेत मुख्यमंत्र्यांनी जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही रात्रं-दिवस सीमेवर प्राणपणाने बाजी लावून देशाचे रक्षण करता. त्यामुळे आम्ही सर्व सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी जवानांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. (Shivaji Maharaj Statue at LOC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community