मुंबईमध्ये लॉट ११ अंतर्गत सुमारे २२ हजार शौचालयांची बांधणी केली जात आहे. यामध्ये बहुतांशी सर्व शौचालये ही एक मजली तथा मजली स्वरुपाचीच आहेत. पण झोपडपट्टी तथा चाळींमध्ये बांधल्या जाणाऱ्या तळ अधिक एक मजल्याच्या शौचालयांच्या बांधकामाला आता स्थानिकांचा विरोध होऊ लागला असून, काही भागांमध्ये चक्क एक मजली बांधण्यात येणारी शौचालये आता सिंगल स्वरुपातच बांधण्यात येत आहेत. स्थानिक रहिवाशांच्या विरेाधामुळे नगरसेवकांनीही आता एक मजली शौचालयांचा हट्ट सोडून, प्रशासनाला बैठ्या स्वरुपातच शौचालये बांधण्यास भाग पाडायला सुरुवात केली आहे.
शौचालयांची कामे धिम्या गतीने
संपूर्ण मुंबईत वस्ती स्वच्छता कार्यक्रमाअंतर्गत एकूण २२ हजार ७७४ शौचालयांकरता निविदा काढून, त्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये ८ हजार ६३७ ही नवीन शौचकुपे आणि १४ हजार १३७ जुन्या शौचकुपांच्या जागी पुनर्बांधकाम करण्यात येणार आहे. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी २० हजार ३०१ शौचकुपांचे बांधकाम पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्यापैकी ४ हजार ५९६ शौचकुपे बांधून तयार झाली आहेत, तर उर्वरित १५ हजार ७०५ शौचकुपांचे बांधकाम चालू असल्याचा दावा प्रशासनाने केला होता. ३१ मार्च २०२१ पर्यंत यामध्ये फारसा बदल झालेला नाही. अनेक शौचालयांची कामे धिम्या गतीने सुरू आहेत.
(हेही वाचाः कंत्राटदार शिर्केने अनधिकृत बांधलेली कलीना येथील ‘मैत्री’ इमारत झाली अधिकृत!)
एक मजली शौचालयांचा त्रास
ही कामे सुरू असली तरी अनेक ठिकाणी तळ अधिक एक मजल्याच्या शौचालयांना स्थानिकांचा विरेाध होऊ लागला आहे. गोवंडीतील प्रभाग क्रमांक १३६ मध्ये महापालिकेच्यावतीने अशाप्रकारे २८ तळ अधिक एक मजल्याच्या शौचालयांची कामे प्रस्तावित होती. पण लोकांनी याला विरोध दर्शवताच स्थानिक नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या स्तरापर्यंत पाठपुरावा केला. एक मजली शौचालयांची कामे रद्द करुन, त्याठिकाणी बैठ्या स्वरुपाचीच शौचालये बांधण्यास भाग पाडले. त्यानुसार सध्या ५ शौचालयांची कामे सुरू आहेत. याबाबत प्रभाग १३६च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी, आपल्या विभागात एकूण २८ एक मजली शौचालयांचे बांधकाम होते. पण स्थानिकांना एक मजली शौचालयांचा वापर करताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यातच वयोवृध्द, अपंग तसेच आजारी व्यक्ती यांना पहिल्या मजल्यापर्यंत शौचालयांमध्ये जाणे कठीण होते.
जलद गतीने कामे पूर्ण होतात
आपण शौचालयांची सुविधा रहिवाशांना उपलब्ध करुन देतो, पण जर त्यांचाच विरोध असेल तर ही एक मजली शौचालये बांधून उपयोग काय, असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे माझ्या विभागात शौचालये नाही बांधली तरी चालतील, अशीच भूमिका मी घेतली आणि प्रशासनाने त्यानुसार निर्णय घेत माझ्या विभागात तळ मजल्याचेच शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. फक्त तळ मजल्याचे बांधकाम होत असल्याने अधिक गतीने हे काम होत आहे, तसेच लोकांच्या वापरात येत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ५ शौचालयांची बांधकामे पूर्ण होऊन उर्वरित कामे सुरू होत आहेत, असे सिद्दीकी यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः आधीच वेतनाची बोंब आता लसही मिळेना! राज्यात ‘लालपरी’ दुर्लक्षित)
कंत्राटदाराची निवड
काही दिवसांपूर्वीच लॉट ११ व्यतिरिक्त धारावीमधील प्रभाग क्रमांक १८५ मध्ये दोन व प्रभाग क्रमांक १८६ मध्ये चार अशाप्रकारे सहा आरसीसी तळमजला, तळमजला अधिक एक या प्रकारच्या शौचालयांचे नियोजन, संकल्पचित्रे व बांधकाम करण्यासाठी, तसेच त्या शौचालयांची मलकुंडे साफ करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी तनिष एंटरप्रायझेस या कंपनीला विविध करांसह ६ कोटी ३० लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या शौचालयांची उभारणी पुढील १२ महिन्यांमध्ये करण्यात येत आहे. मात्र, यापूर्वी लॉट ११ अंतर्गत दिलेल्या कंत्राट कामांपैकी अनेक नगरसेवकांच्या विभागात ही आरडाओरड असून, त्यामुळेच अनेक ठिकाणी शौचालयांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत.
Join Our WhatsApp Community