ऋजुता लुकतुके
तुम्ही कमी तिकीट दर असलेल्या इकॉनॉमी क्लासच्या विमानातून प्रवास करत असाल आणि अचानक विमानात तुमचा सहप्रवासी विराट कोहली (Virat Kohli in Indigo Flight) असल्याचं तुम्हाला कळलं तर? मंगळवारी कोलकाता ते बंगळुरू असा विमान प्रवास करणाऱ्या लोकांना याचा प्रत्यय आला.
विमान टेकऑफसाठी सज्ज असल्याची घोषणा झाली. आणि इतक्यात काळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा टी-शर्ट घालून विराट कोहली विमानात अवतरला. एका महिलेशेजारी आपल्या ठरलेल्या सीटवर तो विराजमान झाला. हे सगळं इतकं सहज होतं. कसलाही गाजावाजा नाही, की उद्घोषणा नाही. सहप्रवाशांनीही विराटचा खाजगीपणा जपला. आणि त्याला गराडा घातला नाही.
काही जणांनी फोटो मात्र काढले. असाच एक प्रवासी धीरजने विराट कोहलीचा विमानात येऊन सीटवर बसतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे विराटचा हा इकॉनॉमी प्रवास कळला.
Virat this morning. Indigo Flight to Bangalore. #ViratKohli𓃵 #viratbirthday pic.twitter.com/cwSBRGcRIu
— Dheeraj (@dheeruutweets) November 6, 2023
या व्हीडिओत विराट (Virat Kohli in Indigo Flight) येऊन पहिल्याच रांगेत बसतो. त्याने जीन्स, काळ्या-पांढऱ्या पट्ट्याचा टी-शर्ट आणि चेहऱ्यावर मास्क लावला आहे. त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेशी तो एक-दोन वाक्य बोलतोही. ही महिलाही लगेच आपला फोन काढताना दिसते. म्हणजे तिनेही सेल्फीसाठी त्याला विनंती केलेली दिसतेय. विराटला पाहताच आजूबाजूच्या लोकांचेही कॅमेरे ऑन झालेले दिसत आहेत.
भारताचा रविवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेबरोबर सामना होता. आणि विराटचा तो ३५वा वाढदिवसही होता. विराटने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी १०१ धावांची शतकी खेळी केली. आणि भारतीय विजयात मोठा वाटा उचलला. त्याचबरोबर विराटने सचिनच्या ४९ एकदिवसीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरीही केली. रविवारच्या शतकानंतर विराटने या विश्वचषक स्पर्धेत १०८ धावांच्या सरासरीने ५३४ धावा केल्या आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community