महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) (DRI) १८० कोटी रुपयांच्या अमली पदार्थ जप्ती प्रकरणी नालासोपारा येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा या ड्रग्स रॅकेटमधील मुख्य सदस्य असल्याची माहिती डीआरआय ने दिली आहे.
वजुलकमार शकील अहमद उर्फ पप्पू (४६) असे अटक करण्यात आलेल्या ड्रग्स रॅकेटच्या मुख्य सदस्याचे नाव आहे. वजुलकुमार उर्फ पप्पू हा गुजरात वापीमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन तयार करणाऱ्या रॅकेटचा प्रमुख सदस्य आहे.त्याला अटक करण्यात आल्यानंतर गुजरात येथे नेण्यात आले आहे.
मुंबई, अहमदाबाद , सुरत आणि वापी येथील डीआरआय च्या पथकांनी रविवारी वापी येथील गुजरात औद्योगिक वसाहत (जीआयडीसी) मधील मेसर्स प्राइम पॉलिमर इंडस्ट्रीजच्या कारखान्याच्या परिसरात शोध मोहीम राबवली होती, दरम्यान ही फर्म मेफेड्रोनच्या बेकायदेशीर उत्पादनात सहभागी असल्याचे आढळून आले.या दरम्यान दोन ड्रम आणि एक फिल्टरेशन ट्यूब सापडले आणि त्यामध्ये द्रव स्वरूपात १२१ किलोपेक्षा जास्त संशयित मेफेड्रोन सापडले.(हेही वाचा-Supreme Court: पत्रकारांची उपकरणे जप्त करणे गंभीर, सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे सुचवण्यासाठी १ महिन्याचा कालावधी)
फोरेन्सिक लॅबच्या अधिकार्यांनी सदर सामग्री मेफेड्रोन असल्याची पुष्टी केल्यानंतर डीआरआय (DRI) अधिकार्यांनी या कारखान्याचे मालक राजू सिंग याला अटक केली. त्याच्या चौकशीदरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांना रॅकेटमध्ये सामील असलेल्या आणखी संशयितांची माहिती मिळाली आणि त्यानंतर, प्राइम पॉलिमर इंडस्ट्रीजचे कर्मचारी केयूर पटेल (३१ ) आणि एक कुंदन यादव (३०) यांना गुजरातमधून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत वजुलकमार शकील अहमद उर्फ पप्पूचे नावही प्रमुख आरोपी म्हणून समोर आले.
यानंतर डीआरआयच्या पथकाने मुंबईत येऊन नालासोपारा येथील रहिवासी पप्पूला अटक केली.डीआरआयच्या तपासात असे समोर आले आहे की नदीम नावाच्या एका प्रमुख संशयिताने सुमारे चार महिन्यांपूर्वी पप्पूला त्याच्यासाठी मेफेड्रोन तयार करू शकेल अशा व्यक्तीचा शोध घेण्यास सांगितले होते. त्यानंतर पप्पूने या कामासाठी राजू सिंगची नदीमशी ओळख करून दिली होती.
केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या केयुर पटेलच्या मदतीने मीफेड्रोन तयार करणार असल्याचे राजूने नदीमला सांगितले होते. सर्व आरोपींना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे, असे डीआरआयने सांगितले.