Glenn Maxwell Carnage : एकदिवसीय क्रिकेटमधील अविस्मरणीय खेळीनंतर खुद्द मॅक्सवेलची प्रतिक्रिया काय होती? 

ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २०१ धावा करत ऑस्ट्रेलियाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचं उपान्त्य फेरीतील स्थानही पक्कं झालं. या खेळीनंतर खुद्द मॅक्सवेलला एका गोष्टीची खंत वाटते. 

107
Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी
Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलची रोहित शर्माच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

ऋजुता लुकतुके

नशीबही शूरवीरांनाच साथ देतं असं म्हणतात. अफगाणिस्तानविरुद्ध मंगळवारी ते ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell Carnage) बाजूने होतं. ९१ वर ७ बाद अशी ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था असताना आणि २९१ धावांचा डोंगर सर करायचा असताना, आणि स्वत: वेदनेनं तळमळत असताना मॅक्सवेलने १२८ चेंडूंत २०१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला विजयम मिळवून दिला.

ही खेळी साकारत असताना मॅक्सवेलला ३७ धावांवर एकदा आणि मग अर्धशतक झाल्यावर अफगाण क्षेत्ररक्षकांनी जीवदान दिलं. तर एकदा त्याचं पायचीतचं अपील तिसऱ्या पंचांनी फेटाळून लावलं. अशी तीन जीवदानं मिळाल्यावर मॅक्सवेलने मागे वळून पाहिलं नाही. आणि १० षटकार तसंच २१ चौकार ठोकत त्याने नाबाद २०१ धावा केल्या.

विजयानंतर सामनावीराचा पुरस्कार अर्थातच त्यालाच मिळाला. संघ जिंकला आणि यात निर्णयाक भूमिका त्याने बजावली, या गोष्टीचं मॅक्सवेलला कौतुक होतंच. पण, एका गोष्टीची खंतही त्याने बोलून दाखवली.

(हेही वाचा- Sachin Tendulkar on Maxwell : ‘मी अशी खेळी कधी पाहिलेली नाही.’ या शब्दांत सचिनने केलं मॅक्सवेलचं कौतुक)

‘अगदी निर्दोष खेळी असती तर जास्त चांगलं वाटलं असतं. पण, मला काही संधी मिळाल्या. आणि त्याचं मी चीज केलं, ही गोष्टही महत्त्वाची आहे,’ असं मॅक्सवेल सामन्यानंतर बोलताना म्हणाला. संघ उपान्त्य फेरीत पोहोचल्याचं समाधानही त्याच्या चेहऱ्यावर होतं.

‘दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरी झाल्यावर आम्हाला अनेकांनी मोडीत काढलं होतं. पण, दोनच सामन्यांनी आमची गाडी पुन्हा रुळावर आणली आहे. आजच्या विजयानंतर संघाचा हुरुप आणखी वाढला आहे,’ असं मॅक्सवेल म्हणाला. भारतातील उन्हात खेळण्याविषयीची चिंताही त्याने बोलून दाखवली.

‘क्षेत्ररक्षण करताना खूपच ऊन जाणवत होतं. चटके बसत होते. शरीरात पाणी कमी झाल्यामुळेच पायात गोळे आले आणि नस खेचली गेली. हा सगळा अनुभव विचित्र होता. कारण, आम्ही नेहमीच उन्हात सराव टाळला होता,’ असं मॅक्सवेल म्हणाला.

ऑस्ट्रेलियन संघाचा अजून एक सामना बाकी आहे. आणि त्यांचे आतापर्यंत ८ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत. गुणतालिकेत सध्या ते तिसऱ्या स्थानावर आहेत. उपान्त्य फेरीत त्यांचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होण्याची दाट शक्यता आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.