मध्य रेल्वेच्या उपनगरी मुख्य मार्गावरील स्थानकांच्या फलाटावरील खाद्यापदार्थांचे स्टॉल हटविण्याची मोहीम रेल्वेच्या वतीने घेण्यात आले आहे. हे स्टॉल हटविल्याने एका जागी जवळपास ५० ते ७० प्रवाशांना उभारण्यासाठी जागा होत आहे.सध्या अशाच प्रकारची कारवाई ठाणे स्थानकात झाली असल्याचे पाहावयास मिळाले आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४-५ वरील दोन स्टॉल हटवले आहेत. (Central Railway)
फलाटांवरील स्टॉल आणि स्टॉलजवळील ग्राहकांमुळे प्रवाशांची गैरसोयीचे होते. बहुतांश वेळा फलाटांवरील स्टॉलमुळे अनेकदा प्रवाशांच्या इच्छित उपनगरी गाड्या सुटतात. काही वेळा स्टॉलमुळे प्रवासी धडपडून खाली पडले आहेत. तसेच गर्दीच्यावेळी स्टॉलमुळे प्रवाशांना उभे राहण्यास जागा नसल्याने धक्काबुक्की होते. त्याचे पर्यवसन वादात आणि हाणामारीत होते.
मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानक सर्वाधिक गर्दीच्या स्थानकापैकी एक आहे. मुख्य मार्ग आणि ट्रान्सहार्बरवरील उपनगरी गाड्या लांबपल्ल्यांच्या गाड्या ये-जा करतात. तसेच ठाणे स्थानकातून रोज पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे गर्दीची कोंडी फोडण्यासाठी सर्वात आधी ठाणे स्थानकातील स्टॉल हटवून इतरत्र स्थलांतरित केले आहेत. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४-५ वरील दोन स्टॉल हटवले आहेत. यापैकी एक स्टॉल फलाट क्रमांक ९-१० वर आणि एक स्टॉल १० अ वर स्थलांतरित केला आहे. दोन स्टॉल हटवल्याने फलाटावर एकाच वेळी सुमारे १०० ते १४० प्रवासी उभे राहू शकतील इतकी जागा उपलब्ध झाली आहे.
मध्य रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांतील फलाटांवरील जागा अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापली आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील काही स्थानकांत गर्दुल्ले, मद्यापींनी फलाटाच्या टोकांना अड्डे वसवले आहेत. काही वेळेला काही गर्दुल्ले आणि मद्यापी फलाटांवरील आसनांच्या शेजारी येऊन बसलेले असतात. त्यांना हटविण्याचा प्रयत्न करूनही ते प्रवाशांना दाद देत नाहीत. कधी-कधी सुरक्षा दलाच्या जवानांनाही बधत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेल्वे सुरक्षा दलाने वारंवार कारवाई करूनही गर्दुल्ले हटत नसल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेवरील ठाण्यावरील स्टॉल हटविण्यात आले आहेत. तर आता घाटकोपर, दादर येथील स्टॉलची पाहणी करून ते हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे फलाटावर प्रवाशांना उभे राहण्यास अतिरिक्त जागा उपलब्ध होईल.अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community