दिवाळीच्या सुरुवातीला येणारा पहिला सण म्हणजे वसुबारस (Vasubaras). आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस साजरी केली जाते. वसुबारला गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीच्या मुर्तीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात.
वसुबारस (Vasubaras) च्या दिवशी घरातील स्त्रिया उपवास धरतात. प्रेमाचे आणि वात्सल्याचे प्रतिक म्हणून या वसुबारस सणाकडे पाहिले जाते. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूगाचे सेवन करीत नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन संध्याकाळी उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून वसुबारस साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे.
(हेही वाचा Mumbai Pune Express way : सहा तासांचा ब्लॉक, जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग)
वसुबारस व्रत महत्व आणि पूजा विधी
पुराणानुसार गाईच्या प्रत्येक अंगात देवी-देवतांच्या स्थानाचे सविस्तर वर्णन केले आहे. पद्मपुराणानुसार चारही वेद गाईच्या मुखात वास करतात. गाईच्या शिंगांमध्ये भगवान शंकर आणि भगवान विष्णू नेहमी वास करतात. गाईच्या पोटात कार्तिकेय, मस्तकात ब्रह्मा, कपाळात रुद्र, शिंगाच्या टोकावर इंद्र, दोन्ही कानात अश्विनीकुमार, डोळ्यात सूर्य आणि चंद्र, दातांमध्ये गरुड, जिभेत सरस्वती, सर्व गुद्द्वारात सर्व तीर्थक्षेत्रे, मूत्र स्थानात गंगाजी, रोम कूपांमध्ये ऋषी गण, पाठीमागे यमराज, दक्षिण पार्श्वमध्ये वरुण आणि कुबेर, वाम पार्श्वमध्ये पराक्रमी यक्ष, मुखात गंधर्व, नासिकेच्या अग्रभागी नाग, खुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा स्थित आहे. या पवित्र दिवशी गाईला आणि वासराला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. जेवणात प्रामुख्याने उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात. वसुबारसच्या दिवशी गाईचे दूध, किंवा दुधाने तयार पदार्थ तसेच गहू आणि तांदूळ खाण्यास मनाई आहे. या दिवशी जो कोणी उपवास/व्रतस्थ असेल त्यांनी थंड बाजरीची भाकरी खावी. तसेच अंकुर फुटलेले धान्य जसे की मूग, हरभरा इत्यादींचा स्वीकार करून त्यापासून बनवलेला प्रसाद अर्पण करावा.
Join Our WhatsApp Community