- नित्यानंद भिसे
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना २२ जून २०२२ रोजी घडली. या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सरकारचा पाय उतार होऊन मुख्यमंत्री पदाची शपथ शिवसेनेतूनच बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. हा बदल घडला त्या मागे बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी त्यांनी शिवसेनेतून ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार फोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडले. आपल्या समर्थनार्थ ५० आमदारांची फौज घेऊन त्यांनी भाजपाला पाठिंबा देत सरकार स्थापन केले. तेव्हापासून महाविकास आघाडी सरकारचे निर्मितीकार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा तीळपापड झाला. तेव्हापासून राऊत हाताची बोटे मोडून अमुकच दिवशी शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार कोसळेल अशी भाकिते करत राहिले; परंतु या सरकारने एक वर्षाचा कालखंड पूर्ण केला तरीही उबाठाच्या पोपटाची भविष्यवाणी खरी होताना दिसत नाही.
जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडून शिवसेना पक्षावरच दावा ठोकला. तेव्हा निवडणूक आयोगानेही शिंदे यांनाच शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्ह दिले. उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेनेचे नेतृत्व निघाले. त्यांचा एक गट बनला आणि त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे नाव मिळाले, पक्षाचे चिन्ह मशाल आले. शिवसेनेची इतकी वाताहत झाल्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांची अस्वस्थता कमालीची वाढली. ज्यांनी शिवसेनेला भाजपापासून दूर करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत शिवसेनेचे नाते जोडले ते संजय राऊत (Sanjay Raut) नंतर टार्गेटवर आले, तरीही संजय राऊत यांचा शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील सूर वाढतच राहिला. त्यांनी तेव्हपासून शिंदे-फडणवीस सरकार पडणार अशा ६ वेळा भविष्यवाण्या केल्या, मात्र सरकार काय पडलेच नाही. उलट सरकारने वर्षपूर्ती करून पुढेही सरकार सुरूच राहिले आहे. २२ नोव्हेंबर २०२२ या दिवशी संजय राऊत यांनी पहिली भविष्यवाणी केली, तेव्हापासून ६ वेळा भविष्यवाण्या केल्या, शेवटची भविष्यवाणी त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी करत ‘बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार ३१ डिसेंबरनंतर राज्यात राहणार नाही’, अशी नवी भविष्यवाणी केली.
(हेही वाचा Kartiki Ekadashi : विठ्ठल महापूजेला मराठा आरक्षणाच्या वादाची किनार; दोन्ही उप मुख्यमंत्र्यांची कोंडी)
संजय राऊतांनी केव्हा केलेल्या भविष्यवाणी?
- २२ नोव्हेंबर २०२२ – सरकार दोन महिन्यांत १०० टक्के पडणार माझ्याकडे पक्की माहिती आहे.
- २२ डिसेंबर २०२२ – शिंदे – फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही.
- २३ एप्रिल २०२३ – पुढील २० दिवसांत सरकारचा डेथ वॉरंट.
- १६ जून २०२३ – फेव्हिकॉल का जोड वगैरे काही नाही २ महिन्यांत सरकार पडणार.
- १३ ऑक्टोबर २०२३ – ७२ तासांत सरकार पडणार.
- ३ नोव्हेंबर २०२३ – बेकायदेशीर घटनाबाह्य सरकार ३१ डिसेंबरनंतर राज्यात राहणार नाही.