Dust Control Centers : मुंबईत पाच ठिकाणी उभारण्यात येणारे धूळ नियंत्रण केंद्र अधांतरीच ;आठ महिन्यांनंतरही कोणतीही कार्यवाही नाही

200
Dust Control Centers : मुंबईत पाच ठिकाणी उभारण्यात येणारे धूळ नियंत्रण केंद्र अधांतरीच ;आठ महिन्यांनंतरही कोणतीही कार्यवाही नाही
Dust Control Centers : मुंबईत पाच ठिकाणी उभारण्यात येणारे धूळ नियंत्रण केंद्र अधांतरीच ;आठ महिन्यांनंतरही कोणतीही कार्यवाही नाही

सचिन धानजी

काही वर्षांपासून मुंबईतील हवा दुषित होत चालली आहे आणि त्याचे दुष्परिणाम नागरीकांच्या आरोग्यावर होत असल्याने वाहतूक कोंडी होणा-या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र  (Dust Control Centers) आणि धूळ नियंत्रण प्रणाली  बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील एप्रिल महिन्यात कंत्राटदाराला कार्यादेश दिल्यानंतर आठ महिन्यांत ही यंत्रणा बसवणे आवश्यक असतानाही अद्यापही ही यंत्रणा बसवली गेलेली नसून महापालिका प्रशासन वाढत्या प्रदुषणाबाबत किती गंभीर आहे हे यामाध्यमातून समोर आले. महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील देखभाल विभाग व पर्यावरण विभाग यांच्या समन्वयातील अभावामुळे ही यंत्रणा बसवण्यात विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्यावतीने ३० धुळ प्रतिबंधक यंत्रे खरेदी करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असून कार्यादेश दिल्यानंतर पुढील १८०दिवसांमध्येही ही यंत्रे प्राप्त होतील असा अंदाज आहे. त्यामुळे भाडेतत्वावर २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी एक याप्रमाणे धूळ प्रतिबंधक यंत्रे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा-Manilal H. Patel : महान गुजराती साहित्यिक)

परंतु एका बाजुला या यंत्रे खरेदीची प्रक्रिया राबवली जात असली तरी  एप्रिल २०२३ रोजी मुंबईत वाहतूक कोंडी होणा-या पाच ठिकाणी खुल्या हवेतील धूळ शमन केंद्र (Outdoor Dust Mitigation Unit) आणि धूळ नियंत्रण प्रणाली (Dust Monitoring System) ही यंत्रणा खरेदी करून त्यांच्या पुढील तीन वर्षांच्या देखभालीच्या कामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला. यासाठी तब्बल दहा कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली असून आठ महिन्यांच्या कालावधीत ही यंत्रणा बसवणे आवश्यक होते. परंतु नोव्हेंबर महिना सुरु झाला आणि प्रदुषणाचा विषय अधिक तापला गेलेला असतानाही या मंजुर कामाकडे प्रशासनाचे लक्ष दिसून येत नाही.

मुंबईतील एलबीएस जंक्शन, छेडा नगर, बीकेसी कलानगर जंक्शन, दहिसर चेकनाका आणि हाजीअली येथील पाच ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार होती, परंतु हाजी अली येथे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने यंत्रणा बसवलेली असल्याने ही जागा बदलून जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील ट्रॉमा केअर रुग्णालय येथील चौकात ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा निश्चित होऊनही ही यंत्रणा अदयापही बसवण्यात आलेली नाही.

याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, ज्या पाच जागा निश्चित केल्या आहेत, ज्या जागांबाबत संबंधित विभागीय कार्यालयाच्या देखभाल विभागाच्या एनओसीची गरज आहे. पण विभागीय कार्यालयाकडून ही परवानगी न मिळाल्याने ही यंत्रणा बसवण्यात विलंब होत असल्याचे पर्यावरण विभागाचे म्हणणे आहे. यासाठी लागणारी यंत्रणा तयार असून केवळ जागेच्या एनओसीअभावीच हे काम पूर्ण होऊ शकले नाही असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

या यंत्रांचा काय आहे उपयोग

मागील दशकापासून मुंबईत वाहन वापरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर ब-याच ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या उत्सर्जनामुळे धुळीचे कण हवेत पसरुन शुध्द हवेची पातळी दिसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे वाहनात उपस्थित असलेल्या नागरीकांना व रस्त्यावर चालणा-या नागरीकांना दुषित हवेत श्वसन करुन दीर्घ आजारांना सामोरे जावे लागत आहे. मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशात अत्यंत मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर सध्या खालावला आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषणासाठी धूळ हा देखील एक घटक कारणीभूत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकूण सात सदस्यांची समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या अहवाल नुसार पाच ठिकाणी धूळ शमन आणि धूळ नियंत्रण प्रणाली बसवण्याची शिफारस करण्यात आली होती.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=805y8EmcjYM&t=7s

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.