ऋजुता लुकतुके
एकदिवसीय विश्वचषक (ICC ODI Ranking) स्पर्धेत भारतीय संघाची विजयी घोडदौ़ड सुरूच आहे. आणि त्याचवेळी आयसीसीच्या क्रमवारीत फलंदाजी आणि गोलंदाजी तसंच संघ म्हणूनही भारतीय खेळाडूच अव्वल ठरलेत. फलंदाजीच्या क्रमवारीत शुभमन गिलने पाकच्या बाबर आझमची दोन वर्षांची सद्दी मोडून काढत हा मान मिळवला. भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. तर गोलंदाजीत महम्मद सिराजने शाहीन आफ्रिदीला मागे टाकून अव्वल क्रमांक पटकावलाय.
विश्वचषक स्पर्धेपूर्वी सिराजने यावर्षी २१ बळी मिळवले होते. त्यात विश्वचषकातील ८ सामन्यांत १० बळींची भर पडलीय. आणि त्याच्या जोरावर सिराजने अव्वल क्रमांकही पटकावला.
No. 1⃣ Batter in the latest ICC Men’s ODI Rankings for Batters 🔝
No. 1⃣ Bowler in the latest ICC Men’s ODI Rankings for Bowlers 🔝
Congratulations to Shubman Gill & Mohd. Siraj 👏 👏#TeamIndia pic.twitter.com/OeQcf9y6Qq
— BCCI (@BCCI) November 8, 2023
२०२३ मध्ये महम्मद सिराजने २२ सामन्यांमध्ये ४० बळी टिपले आहेत ते १८.९५ च्या प्रभावी सरासरीने. यात २१ धावांमध्ये ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. या विश्वचषकात त्याने आतापर्यंत १० गडी बाद केले आहेत.
महम्मद सिराजचा अव्वल क्रमांकापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. हैद्राबादच्या तौलाचौकी भागातला गरीब सिराज १६ व्या वर्षीपर्यंत स्लिपर घालून तेज गोलंदाजी करत होता. वडील रिक्षाचालक आणि आई शबाना बेगम घरकाम करणारी.
(हेही वाचा- Diwali 2023 : दिवाळीचा पहिला दिवस वसूबारस, काय आहे या दिवसाचे महत्व जाणून घ्या)
आजूबाजूच्या गल्लीत जमेल तितक्या वेगाने चेंडू टाकायचा इतकंच सिराजला माहीत होतं. इतक्यात काकांच्या क्लबकडून खेळताना त्याने एकदा सामन्यात ९ बळी मिळवले. आणि क्लब स्तरावरील सामन्यात सामनावीर किताब मिळाल्याबद्दल त्याला ५०० रुपये बक्षीस म्हणून मिळाले. इतकी मोठी रक्कम एकरकमी बघण्याची सिराजची ती पहिली वेळ होती.
क्रिकेट काय मिळवून देऊ शकतं याचा अंदाज त्याला आला. कारण, घरची गरिबी सलत होतीच. त्याने क्रिकेटवर जास्त मेहनत घ्यायची ठरवली. १५ किलोमीटर लांब राजीव गांधी स्टेडिअमवर जायला त्याने सुरुवात केली. आणि मेहनत, लीन वृत्ती यांच्या जोरावर भारतीय संघाचे दरवाजेही ठोठावले. ज्या मुलाला बक्षिसाचे ५०० रुपये खूप वाटत होते, त्याला २०१७ च्या आयपीएल लिलावात २.७ कोटी रुपये मिळाले.
ऑस्ट्रेलियात गब्बावर ६ बळी मिळवण्याची किमया त्याने नुकतीच केली होती. त्यानंतर कोव्हिडचा काळ सोडला तर सिराज वेगाने गोलंदाजी करतोय. वेग हाच त्याचा खास गुण आहे. आणि २०२३ मध्ये सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्याने अव्वल क्रमांक मिळवलाय. त्याचा साथीदार जसप्रीत बुमरा चौथ्या, कुलदीप यादव सातव्या तर महम्मद शामी दहाव्या क्रमांकावर आहेत.