शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी (Arun Gawli) उर्फ डॅडी आणि अन्य आरोपींना चार आठवड्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तुरुंग प्रशासनाला दिले आहे. नवरात्र पाठोपाठ दिवाळी देखील अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी घरीच साजरी करणार आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत असलेल्या सर्व आरोपींना चार आठवड्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला शुक्रवारी किंवा त्यापूर्वी आरोपींना सोडण्याचे निर्देश दिले असून त्यांना रविवारी त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत दिवाळी साजरी करण्याची परवानगी दिली आहे.
ऑगस्ट २०१२ मध्ये जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुंड आणि इतरांनी दाखल केलेल्या अपिलावर न्यायालयाने सुनावणी केली. मुंबई उच्च न्यायालयाने २०१९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती, त्यानंतर या प्रकरणात २०२० मध्ये अपील दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात लवकर सुटकेसाठी याचिकाही दाखल केली होती.
(हेही वाचा-Weather Update: येत्या ४ दिवसांत पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट)
जामसंडेकर यांची मार्च २००७ मध्ये त्यांच्या घाटकोपर येथील असल्फा राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. २१ मे २००८ रोजी गवळीला अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून तो कोठडीत होता.
जामसंडेकर यांच्या हत्येचे कंत्राट आरोपी साहेबराव भिंताडे आणि बाळा सुर्वे यांनी दिल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला होता, जे जामसांडेकर यांचे बांधकाम व्यवसाय आणि स्थानिक राजकारणात प्रतिस्पर्धी होते. साकी नाका येथील भूखंडावर भिंताडे आणि सुर्वे यांचा डोळा असल्याचा दावाही करण्यात आला होता, मात्र जामसंडेकर यांनी सहकार्य करण्यास नकार दिला होता. हत्येसाठी गवळीला ३० लाख रुपये दिले होते.
याव्यतिरिक्त, गवळीवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा खटला अद्याप विशेष मकोका न्यायालयात प्रलंबित आहे. सर्व आरोपींनी दाखल केलेल्या अपीलवर फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणार आहे, तर तुरुंगातून लवकर सुटण्याच्या त्याच्या याचिकेवर डिसेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
Join Our WhatsApp Community