-
वंदना बर्वे
राजस्थानमधील भाजप आणि कॉंग्रेसच्या बंडखोरांनी आपआपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या नाकी नउ आणले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बंडखोर निवडणुकीचे गणित बऱ्यापैकी बिघडविण्याच्या स्थितीत आहेत. अशात त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत आहे. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील जवळपास दोन डझन नेत्यांनी बंडाचे निशाण फडकविले आहेत. यांच्यावर नियंत्रण नाही मिळविले तर आपला खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव दोन्ही पक्षांसोबतच उमेदवारांना सुध्दा झाली आहे. (Rajasthan Assembly Elections)
अशात, कॉंग्रेस आणि भाजपने बंडखोरांचे मन वळविण्याचे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. बंडखोरांचा प्रभाव एवढा जास्त आहे की दोन्ही पक्षांनी त्यांना निवडणुकीत माघार घेण्यास राजी करण्याकरिता समित्या नेमल्या आहेत. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून त्यांची मनधरणी सुरू आहे. राज्यात सत्ता आली तर लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाईल, असे आमिष दोन्ही पक्षांकडून दाखविले जात आहे. या रामबाण औषधाचा गुण काही प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. मात्र, काही बंडखोर निवडणुकीतून माघार घेण्यास अजिबात तयार नाहीत. (Rajasthan Assembly Elections)
भाजपने बंडखोरांना शांत करण्यासाठी एक समिती बनविली आहे. यात केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, जलशक्ती मंत्री गजेंद्र शेखावत, प्रदेश प्रभारी अरुण सिंह, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांचा समावेश आहे. दुसरीकडे, सत्तधारी कॉंग्रेसला सुध्दा अशाप्रकारची समिती बनवावी लागली आहे. यात मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांचा समावेश आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दहा दिवसांपूर्वी समिती स्थापन करण्यात आली होती, मात्र या समितीला विशेष यश मिळाले नाही. (Rajasthan Assembly Elections)
भाजपचे बंडखोर
माजी आमदार जीवराम सांचोर मतदारसंघातून अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यांच्यामुळे भाजपचे उमेदवार आणि खासदार देवजी पटेल अडचणीत आले आहेत. चौधरी यांना माजी आमदार दानाराम यांचा पाठिंबा आहे. चित्तौडगडमधून माजी आमदार चंद्रभान आक्या हे भाजपचे उमेदवार नरपत सिंह राजवी यांचा खेळ बिघडवत आहेत. (Rajasthan Assembly Elections)
याशिवाय, शिवसेनेचे रवींद्रसिंग भाटी भाजपसाठी डोकेदुखी ठरले आहेत. सुतगडमध्ये माजी आमदार राजेंद्र भादू, दिडवानामध्ये युनूस खान, लाडपुरामध्ये माजी संसदीय सचिव भवानी सिंह राजावत, खंडेलामध्ये बंशीधर बजिया, झुंझुनूमध्ये राजेंद्र भांबू, फतेहपूरमध्ये मधुसूदन, शाहपुरामध्ये माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल आणि अनूपगडमध्ये सिमला बावरी भाजपच्या अधिकृत उमेदवारांचा खेळ बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. (Rajasthan Assembly Elections)
मात्र, माजी मंत्री राजपाल सिंह शेखावत यांनी झोटवाडामधून माघार घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी गुरुवारी आपले नाव मागे घेतले. चौहटनचे माजी आमदार तरुण राय कागा आणि माजी शिव आमदार जलमसिंह रावलोत यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या तिकीटवर दंड थोपटल्यामुळे भाजपच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. (Rajasthan Assembly Elections)
(हेही वाचा – Hardik Pandya Injury : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेलाही हार्दिक पांड्या मुकणार?)
काँग्रेसमधील बंडखोर
सरदारशहर मतदारसंघातून राजकरण चौधरी, मसुदामध्ये माजी संसदीय सचिव ब्रह्मदेव कुमावत, हिंडौनमध्ये ब्रिजेश जाटव, मनोहर पोलिस ठाण्यातून माजी आमदार कैलाश मीना, अजमेर दक्षिणमधून हेमंत भाटी, नगरमध्ये गोविंद शर्मा, शाहपुरामध्ये आमदार आलोक बेनिवाल, माजी मंत्री हबीर्बुर रहमान नागौरमधून आणि राजगड लक्ष्मणगडमधून आमदार जोहरीलाल मीणा यांनी बंडखोरी करीत कॉग्रेसच्या उमेदवारांविरूध्द दंड थोपटले आहे. (Rajasthan Assembly Elections)
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र सिंह यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोपही जोहरीलाल यांनी केला आहे. परंतु,काँग्रेसचे बंडखोर हेमंत भाटी यांनी अजमेर दक्षिणमधून आपले नाव मागे घेतले. (Rajasthan Assembly Elections)
बसपाच्या चार उमेदवारांची माघार
दरम्यान, बसपाच्या चार उमेदवारांनी गुरुवारी आपली नावे मागे घेतली आहेत. यापैकी सांगानेरचे उमेदवार रामलाल यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. हवामहलमधून तरुणा पाराशर, सिव्हिल लाइन्समधून अरुण चतुर्वेदी आणि आदर्श नगरमधून हसन राजा यांनी निवडणूक लढवण्यातून माघार घेतली आहे. (Rajasthan Assembly Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community