Chhath Puja 2023: आधुनिक काळात छठ पूजा कशी साजरी केली जाते? वाचा सविस्तर…

सुख, समृद्धी आणि निरोगी आरोग्यासाठी सूर्यदेवाची उपासना केली जाते.

141
Chhath Puja 2023: आधुनिक काळात छठ पूजा कशी साजरी केली जाते? वाचा सविस्तर...
Chhath Puja 2023: आधुनिक काळात छठ पूजा कशी साजरी केली जाते? वाचा सविस्तर...

दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला ‘छठ पूजा’ (Chhath Puja 2023) केली जाते. प्रत्यक्षात ही पूजा शुक्ल महिन्याच्या चतुर्थीपासूनच सुरू होते. उत्तर प्रदेशातील बिहार, युपी, झारखंडमध्ये या पूजेला विशेष महत्त्व आहे. ऋग्वेदात छठ पूजेच्या विधीचा उल्लेख आहे. ही एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छठ व्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात. सूर्याला अर्घ्य अर्पण करतात सप्तमीला उपवास सोडतात. हल्ली या व्रताला उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. भारतातल्या विविध भागांतील लोकं छठ पूजेत सहभागी होतात. सौभाग्य, समृद्धी, मुलांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी केलेले हे चार दिवसांचे व्रत का करावे, शुभ मुहूर्त, त्याची फलनिष्पत्ती, यावर्षी हा उत्सव केव्हापासून सुरू होतो आणि या पूजेचा इतिहास याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया…

सर्वप्रथम बिहारमधून या उत्सवाला सुरुवात झाली असली, तरी हल्ली भारत आणि नेपाळच्या काही भागांत छठ पूजा उत्सव साजरा केला जातो. पुरातन काळात ऋषी-मुनी सूर्याची उपासना करीत तसेच ऋग्वेदात छठ पूजेच्या विधीचा उल्लेख आढळतो. त्यामध्ये या पूजेनिमित्त सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल सांगितले आहे. भगवान श्रीराम आणि सीता दोघेही वनवासातून परतल्यानंतर त्यांनी कार्तिक पक्षाच्या शुक्ल पक्षात छठ पूजा करून सूर्याची उपासना केली. तेव्हापासून दरवर्षी श्रद्धा भक्तीने छठ पूजा साजरी होऊ लागली, अशी लोककथा सांगितली जाते.

पौराणिक कथेनुसार, सूर्य देवतेचा आरोग्याशी संबंध आहे. सूर्यकिरणांच्या शरीरावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. सुख, समृद्धी आणि निरोगी आरोग्यासाठी सूर्यदेवाची उपासना केली जाते. ४ दिवस चालणाऱ्या या उत्सवात ३६ तासांचा उपवास केला जातो. या चार दिवसांचे महत्त्वही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

(हेही वाचा – Dharavi Rehabilitation Project : रेल्वे भूसंपादनासाठी दिलेले ५०० कोटी रुपये ‘म्हाडा’ला परत)

पहिला दिवस: नहे खा
कार्तिक शुक्ल चतुर्थीचा पहिला दिवस ‘नाहे खा’ म्हणून साजरा केला जातो. गुरुवारी, ३१ ऑक्टोबरला छठ पूजेचा पहिला दिवस आहे. या दिवशी सर्वप्रथम घराची साफसफाई करून छठ पूजेच्या व्रताची सुरुवात करावी. शाकाहारी अन्नपदार्थ ग्रहण करून उपवास करावा. भोपळा, मसूर आणि तांदूळ, हरभऱ्याची डाळ हे अन्नपदार्थ या उपवासात खाल्ले तरी चालतात.

दुसरा दिवस: खरना आणि लोहंडा
खरना किंवा लोहंडा म्हणून दुसरा दिवस ओळखला जातो. परिसरातील लोकांना या दिवशी देवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि प्रसाद ग्रहण करण्यासाठी आमंत्रण दिले जाते. या दिवशी दिवसभर निर्जल उपवास करून सायंकाळी भोजन करावे. प्रसाद म्हणून उसाच्या रसापासून बनवलेली तांदळाची खीर दुधासोबत दिली जाते. मीठ आणि साखर खाणे या दिवशी वर्ज्य आहे.

तिसरा दिवस: संध्या अर्घ्य
तिसऱ्या दिवशी छठ पूजेचा प्रसाद घरीच बनवावा. या दिवसाला ‘संध्या अर्घ्य’ म्हणतात. सायंकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण केले जाते. यामध्ये मिठाई आणि फळांचाही समावेश असतो. जसजसा सूर्य मावळतो तसतसे भक्तिगीतांच्या सुमधुर गायन करून छठ व्रत कथेचे पठण, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यामुळे या दिवशी वातावरण भक्तीने भारलेले असते.

चौथा दिवस: उषा अर्घ्य आणि पारण
चौथ्या दिवशी पहाटेच्या भक्त उगवत्या सूर्याला अर्घ्य देतात. याकरिता नदीच्या काठावर किंवा जिथे वाहते जलस्रोत आहेत तिथे श्रद्धेने प्रार्थना करतात. छठ देवता आणि सूर्याकडून उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी आशीर्वाद मागतात. आध्यात्मिक प्रवासाच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून आले आणि गूळ खाऊन चौथ्या दिवशी उपवास सोडला जातो.

छठ पूजेचा वैशिष्ट्यपूर्ण प्रसाद…
– छठ पूजेदरम्यान बनवला जाणारा ‘थेकुआ’ हा पारंपरिक पदार्थ या पूजेचे मुख्य आकर्षण आहे. गव्हाचे पीठ, सुके खोबरे, साखरेचा पाक आणि तुपापासून हा पदार्थ तयार केला जातो. हा पारंपरिक पदार्थ आहे असून अत्यंत स्वादिष्ट असतो. या पदार्थामुळे छठ पूजेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण हा पदार्थ प्रसाद म्हणून वाटला जातो.

– आणखी एक आवडता पदार्थ म्हणजे ‘रसिया खीर’. तांदूळ, दूध आणि साखरेपासून खीर तयार केली जाते. प्रसादाच्या ताटात सुकामेवा, नारळाचे ताजे तुकडे, पिकलेली केळी आणि दाभ लिंबू असे पदार्थ ठेवले जातात.

– उसाचे तुकडे करून प्रसाद म्हणून वाटले जातात. उसाला हे जीवनातील समृद्धी आणि गोडव्याचे प्रतीक मानले जाते. तांदळापासून तयार केलेल लाडू हा या पूजेतील दैवी प्रसाराचा भाग मानला जातो. छठ पूजेवेळी दिला जाणारा प्रसादातील प्रत्येक पदार्थ हा केवळ खाद्यपदार्थ नसून उत्सवातील समृद्धता, सांस्कृतिक आणि पारंपरिक समृद्धीचं प्रतीक आहे.

यावर्षी छठ पूजा कधी आहे?
दिवस १: नाहाये खाय 17 नोव्हेंबर, शुक्रवार
दिवस २: खारणा 18 नोव्हेंबर, शनिवार
दिवस ३: संध्या अर्घ्य 19 नोव्हेंबर, रविवार
चौथा दिवस ४: उषा अर्घ्य आणि पारण 20 नोव्हेंबर, सोमवार

आधुनिक काळातील छठ पूजा
छठ पूजा वर्षातून दोनदा साजरी केली जाते. चैत्र महिन्यात ‘चैती छठ’ आणि कार्तिक महिन्यात छठ पूजेनिमित्त मोठा उत्सव साजरा केला जातो. पुरुष आणि स्त्रिया दोघेही उपवास करू शकतात, मात्र पारंपरिक दृष्टीने महिला हा उपवास करतात.

छठ पूजेची घाठ सजावट…
सूर्य आणि चंद्र यांचे प्रतीक दर्शवणारी पारंपरिक रांगोळी, शुभचिन्हे, दिवे, झेंडू, कमळ या फुलांची सजावट, आंब्याच्या पानांचे तोरण, स्ट्रिंग लाईट्स, पारंपरिक मिठाई, धूप या घटकांचा वापर करून सुशोभिकरण करून सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली जाते.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.