मुंबईतील सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांसाठी पाच कंत्राटदारांची निवड केल्यानंतर त्यापैकी शहर भागातील रस्ते कामांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. मात्र, या रस्ते कामांचे कंत्राट रद्द केल्याने महापालिका प्रशासन अडचणीत येण्याची दाट शक्यता असून या कंत्राटदाराने यावर्षी वाहतूक पोलिसांची एनओसी प्राप्त झाल्यानंतर १५ ते १६ रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे या सर्व खोदून ठेवलेल्या रस्त्यांची कामे लटकली जाणार असून अर्धवट खोदून ठेवलेल्या कामांना अन्य कंत्राटदार हात लावत नसतो. त्यामुळे जर या रस्त्यांचा विकास करण्यास अन्य कंत्राटदाराने स्वारस्य न दाखवल्यास किंवा न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यास या खोदून ठेवलेल्या रस्त्यांची कामे लांबणीवर पडली जाण्याची भीती वर्तवली जात आहे. (Road Cement Concreting)
महानगरपालिकेकडून हाती घेण्यात येणाऱ्या ३९७ किलोमीटर लांबीच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामे यंदा पाच भागात विभागून त्यांच्यासाठी स्वतंत्र कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम उपनगरांमधील ५१६ रस्ते कामांसाठी तीन कंत्राटदार, शहरांमधील २१२ रस्ते आणि ८५ तुटलेले सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भाग आदी कामांसाठी एक कंत्राटदार तसेच पूर्व उपनगरांमधील १८२ रस्त्यांच्या कामांसाठी एका कंत्राटदाराची नेमणूक केली. या सर्व ३९७ किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांसाठी ६०८० कोटी आणि विविध करांसह सुमारे ८३१९ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले. (Road Cement Concreting)
यामध्ये शहर भागांच्या रस्ते सिमेंटीकरणाच्या कामांसाठी रोड वे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली होती. परंतु कार्यादेश दिल्यापासून या कंपनीने काम न केल्याने अखेर या कामाचे कंत्राट रद्द करण्यात आले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी या रस्त्याचे कंत्राट रद्द करण्यात आले असून लवकरच शॉर्ट नोटिसवर निविदा मागवून त्वरित पात्र ठरणाऱ्या कंत्राटदारांची निवड करून कार्यादेश देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. (Road Cement Concreting)
परंतु या शहर भागातील निवड करण्यात आलेल्या रस्ते कंत्राट केवळ राजकीय दबावापोटीच रद्द केल्याचे बोलले जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२३ रोजी शहर भागातील २६ रस्त्यांच्या कामांना वाहतूक पोलिसांची एनओसी मिळाली होती, परंतु या कंत्राटदाराने मे महिन्यापर्यंत याकामाला हात लावला नव्हता. परंतु निश्चित वेळेत हे काम हाती न घेतल्याने ही परवानगी रद्दबाबत ठरली. परंतु ऑक्टोबरमध्ये शहरातील १५ रस्त्यांच्या कामांना एनओसी मिळाली. त्यानुसार दहा ऑक्टोबरपासून महापालिका ए, बी आणि एफ उत्तर विभागातील १५ रस्त्यांच्या कामांना सुरुवात केली. ही सर्व रस्त्यांची कामे हाती घेऊन त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. परंतु आता या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर महापालिकेने हे कंत्राटच रद्द केल्याने हाती घेतलेल्या या रस्त्यांची कामे लटकली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Road Cement Concreting)
(हेही वाचा – Rachin Ravindra Visited Native Place : भारतीय वंशाचा रचिन रवींद्रच्या आजीने जेव्हा त्याची दृष्ट काढली)
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंत्राटदाराला नोटीस बजावल्यानंतर सुनावणीकरता निमंत्रित केले होते. परंतु ज्या दिवशी महापालिकेत सुनावणी होती, त्याच दिवशी संबंधित कंत्राटदाराची जीएसटीसंदर्भातही सुनावणी असल्याने कंपनीचे प्रतिनिधी महापालिकेत उपस्थित राहू शकले नाही. परिणामी त्यांची सुनावणी होऊ शकली नाही आणि महापालिका प्रशासनाने त्यांची बाजू ऐकून न घेता एकतर्फी निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी जर कंत्राटदाराने न्यायलयात धाव घेतली तर महापालिकेची अडचण वाढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सन २०१४मध्ये रस्ते घोटाळ्याप्रकरणी ज्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकले होते, त्या संबंधित कंत्राटदारांकडून अर्धवट कामे करून घेण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणांतही या कंत्राटदाराने खोदून ठेवलेल्या रस्त्यांची कामे अन्य कंत्राटदार करुन देणे शक्य नसल्याने संबंधित कंत्राटदारांकडूनच करून घेत उर्वरीत कामे काढून घेण्याचा पर्याय असताना संपूर्ण कंत्राट रद्द करण्याच्या मुद्दयावर न्यायालयात प्रशासनाची बाब तोकडी पडण्याची शक्यतातही वर्तवली जात आहे. (Road Cement Concreting)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community