Dombivli Diwali celebration : फडके रोड वरची दिवाळी पहाट म्हणजे तरुणाईचा सण

गेल्या 50 वर्षांपासून फडके रोड वर दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी डोंबिवलीतील केवळ तरुणांईच नव्हे तर सर्व पिढ्या येथे आवर्जून जमतात.

209

श्रुती नानल

डोंबिवली (Dombivli) चा फडके रोडची (Phadke Road) महती ही साता समुद्रा पार पोहचलेली आहे. गेल्या 50 वर्षांपासून फडके रोड वर दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी डोंबिवलीतील केवळ तरुणांईच नव्हे तर सर्व पिढ्या येथे आवर्जून जमतात. भले अनेक लोक सध्या डोंबिवली सोडून दुसरीकडे राहायला गेले असले तरी यादिवशी जणू काही नेम असल्या सारखे भेटतातच. दिवाळी पहाट म्हणजे फडके रोड असेच काहीसे समीकरण होऊन बसले आहे.(Dombivli Diwali celebration)

तरुणांकडून सणोत्सव साजरा करण्याची पद्धत बदलताना दिसून येते. अपवाद डोंबिवलीच्या फडके रोडचा.  डोंबिवलीच्या फडके रोडवर साजरी होणारी दिवाळी पहाट आणि गुढी पाडव्याला निघणारी शोभा यात्रा आजही अनेकांच्या आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय ठरते.  फडके रोड प्रकाशझोतात कधी पासून आला, याचा सर्व इतिहासदेखील तितकाच इंटरेस्टिंग आहे.

काही दशकांपूर्वी फडके रोडवर दिवाळी कशी साजरी केली जायची ?

दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे फडके रोडवर जमून शुभेच्छा देण्याची पद्धत जाणत्या ग्रामस्थांनी डोंबिवलीत सुरू केली. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण फडके रोडवर भेटू असे प्रत्यक्ष भेटीत यापूर्वी स्थानिक रहिवासी, नोकरदार, व्यावसायिक एकमेकांना सांगायचे. महिला, पुरुष तरुण, तरुणी त्यावेळी दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी फडके रोडवर एकत्र येत होते. या एकत्रीकरणातून मित्रांचे गट तयार होऊ लागले. (Dombivli Diwali celebration)

दिवाळी च्या दिवशी लागायच्या बैलांच्या झुंजी

डोंबिवलीतील काही जमीन मालकांकडे शेती, गाई, बैल होते. ते दिवाळीच्या दिवशी गाई, बैल सजवून गणपती मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत बैलांच्या झुंजी लावण्यासाठी आखाड्यावर येत असत. दिवाळीच्या काळात सजविलेले गाई, बैल पाहण्याचे ठिकाण म्हणून फडके रोड परिसर ओळखला जात होता. फडके रोडवर येणाऱ्यांमध्ये जुने जाणते आबासाहेब पटवारी, ह. शं. कांत, बापूसाहेब जपे, ॲड. श्रीकांत गडकरी, भालचंद्र लोहकरे, नकुल पाटील, धाट गुरुजी, जगन्नाथ पाटील अशा अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींचा सहभाग होता.

(हेही वाचा :PM Narendra Modi यांनी लिहिलेल्या ‘या’ गाण्याला मिळाले ग्रॅमी नामांकन)

कशी झाली तरुणाई फडके रोड कडे आकर्षित

डोंबिवलीत गावात एकमेव फडके रस्ता खडी-डांबराचा तयार झाला होता. बाकी रस्ते कच्च्या पायवाटेचे. यामुळे गावात सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा असला की तो सुस्थित असलेल्या फडके रस्त्यावर घेतला जायचा. हळूहळू राजकीय कार्यक्रम, सभा, बैठका या रस्त्यावर होऊ लागल्या. मंदिराकडे जाणारा रस्ता तयार झाल्याने या रस्त्यावरील वर्दळ वाढली. दिवाळीच्या दिवशी ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून फडके रस्त्यावर ग्रामस्थ येत होते. या निमित्ताने स्थानिक, विविध प्रांतांमधून नोकरी, व्यवसायासाठी आलेले नागरिक एकमेकांना भेटू लागले. महिला, पुरुष, लहान मुलांची वर्दळ दिवाळीच्या दिवशी फडके रस्त्यावर असायची. यानंतर तरुणाई सणोत्सवासाठी एकत्र येऊ लागले. यातून अनेक तरुण – तरुणींची घट्ट मैत्री जुळली. तर काहींच्या रेशीमगाठीदेखील जुळल्या. सध्या डोंबिवलीकरांची तिसरी, चौथी पीढी दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी येते. दिवाळीच्या दिवशी फडके रस्त्यावर जमायचे, गणपतीचे दर्शन घ्यायचे अशी परंपराच आता झाली आहे.

दिवाळी पहाटची तयारी

दिवाळी पहाटसाठी डोंबिवलीतील फडके रोडवर जायाचे म्हणजे तरुण, तरुणी, हौशी कुटुंबिय १५ दिवसांपासून अगोदर कामाला लागतात. नवीन पेहराव, नवा मोबाइल, देखणी महागडी पादत्राणे याचे कौतुक मित्र-मैत्रिणींकडून होईल याची काळजी घेतली जाते. काही प्राणीप्रेमी आपले पाळीव श्वान पारंपरिक पेहरावात घेऊन येतात. बदलापूर, ठाणे, पनवेल, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी परिसरातून तरुण, तरुणी दुचाकी, नव्या चार चाकीने फडके रोडवर येतात. पहाटे पाच वाजल्यापासून ते कडक उन चढेपर्यंत रंगीबेरंगी पेहरातील फडके रोड तरुणाईने बहरलेला असतो. वर्षभराचे रागरुसवे फडके रोडवर सोडून काही जण आपली नवी वाटचाल सुरू करतात. (Diwali Pahat)

संध्या शिरसाठ म्हणतात की,
आम्ही गेली 12 वर्षे इकडे आवर्जून जमतोच आता आम्ही सगळ्या वेगवेगळीकडे राहायला गेलो आहोत पण दिवाळी पहाट साजरी करायला आम्ही इकडेच जमतो. त्याशिवाय दिवाळी साजरी झाल्या सारखी वाटत नाही.

मी माझ्या बायकोला लग्नाची मागणी याच रस्त्यावर घातली- मंदार दीक्षित
फडके रोड वरची दिवाळी पहाट माझ्या कायम लक्षात राहणारी आहे. इथल्या वातावरणात एक वेगळाच उत्साह आहे. मी माझ्या बायकोला लग्नाची मागणी दिवाळीच्या पहिल्या दिवशीच इकडेच घातली. लग्नाला 7 वर्ष झाली तरी आम्ही आमच्या संपूर्ण ग्रुप ला आवर्जून भेटायला येतो. आणि प्रत्येक वेळी माझ्या या लग्नाच्या प्रपोझ चा विषया वर चर्चा होतेच. त्यामुळे हा रोड आणि हा दिवस आमच्या साठी खास आहे.

सुधाकर वाघ काका म्हणतात हा तर आमच्या भेटण्याचा अड्डा

आमची 1972 च्या बॅचचा स. वा जोशी शाळेचा ग्रुप आहे. दिवाळी पहाट त्याला तर जमतोच मात्र एरवी सुद्धा भेटायचं ठरलं तरी हाच रोड आणि इकडच्या टपरी वरील चहा प्यायल्या शिवाय आमची मिटिंग पूर्णच होत नाही. त्यामुळे हे आमच्या भेटीचे नेहमीचेच ठिकाण आहे. असे सुधाकर वाघ यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.