कामा रुग्णालयामधील रेडिओथेरपी केंद्रातील यंत्रे मागील वर्षभरापासून बंद असल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविण्यात येते. यामुळे रुग्णांचे हाल होत होते, त्यामुळे आता कामा रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचार (Treatment Of Cancer) घेणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारचे मुंबईतील कामा रुग्णालय महिला, बाल आणि प्रसूतीसाठी ओळखले जाते. कामा रुग्णालयामध्ये स्तन कर्करोगाने ग्रस्त महिलांवर उपचार केले जातात. या रुग्णांना केमोथेरपी व रेडिओथेरपी उपचार देण्याची सुविधाही रुग्णालयात होती. कामा रुग्णालयामध्ये २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांमध्ये १३ हजार ७९७ महिलांवर रेडिओथेरपी उपचार करण्यात आले होते. २०२० मध्ये ५ हजार ३५८, २०२१ मध्ये ६ हजार ४०७ महिलांवर उपचार करण्यात आले होते. मात्र मे २०२२ मध्ये रेडिओथेरपी यंत्र बंद पडल्याने या वर्षात अवघ्या २ हजार ३२ रुग्णांवर रेडिओथेरपी पद्धतीने उपचार करण्यात आले होते. कामा रुग्णालयामध्ये दरवर्षी साधारणपणे साडेपाच हजार रुग्णांवर रेडिओथेरपी करण्यात येत होती. मात्र रुग्णालयातील यंत्र बंद पडल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना रेडिओथेरपीसाठी अन्य रुग्णालयामध्ये जावे लागत होते. या समस्येवर उपाययोजना म्हणून रुग्णालयातील रेडियोथेरपी केंद्रांसाठी यंत्रे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारने ३८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे पुढील ६ महिन्यांमध्ये कामा रुग्णालयामध्ये पुन्हा रेडिओथेरपी उपचार पद्धती सुरू करण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीला वेगवान बाऊन्सर भीतीदायक वाटतो की यॉर्कर? )
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामा रुग्णालयामध्ये रेडियोथेरपी यंत्र उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ६ महिन्यांमध्ये कामा रुग्णालयातील रेडिओथेरपी केंद्र सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community