- दीपक कैतके
विधानसभेच्या निवडणुका 2019ला झाल्यानंतर राजकीय फटाके (Fire Crackers) लगातार वाजत आहेत. अडीच वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना भाजपद्वारा राजकीय आरोप प्रत्यारोपांचे फटाके वाजवले जात होते .आता सत्ता परिवर्तनानंतर शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर रोज सकाळी-सकाळी फटाके वाजतात. त्याचे उत्तर-प्रत्युत्तर करताना सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र दूरच राहतात. त्यातच भर की काय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सामील होताच राष्ट्रवादीद्वारे देखील राजकीय फटाके फुटू लागले आहेत.
कोणी दिलसे तर कोणी मनसे फटाके फोडतात…
फटाके (Fire Crackers) अनेक प्रकारचे असतात. काही फटाके आवाज करणारे असतात, तर काही नुसतेच शोभेचे असतात. काही खालच्याखाली म्हणजे जमिनीवर वाजवायचे असतात, तर काही फटाके आभाळात उडवायचे असतात. त्यातही विशेष प्रांतातले काही फटाके जास्त प्रसिद्ध असतात. निवडणुकीच्या रिंगणात कोणते फटाके कसे वाजतात, त्यांची कामगिरी कशी असते, कोणते फटाके दुसऱ्या फटाक्यांना पडद्याआडून उडण्याची मदत करतात, हेही या निमित्तानं दिसून येते. ‘मनसे’ नावाचा एक फटाका (Fire Crackers) आहे. प्रत्येक निवडणुकीत या फटाक्याचा आवाज काहीतरी वेगळाच असतो. या फटाक्याचं वैशिष्ट्यं म्हणजे तो कायम इतरांना मदत करीत असतो. खळखळखट्याक असं या फटाक्याचं आणखी एक वैशिष्ट्य. प्रत्येक हंगामात जशी पिकावर टोळझाड येत असते. तशी या पक्षाची निवडणुकीत अगोदर टोलझाड येत असते. या फटाक्याचा वापर अन्य फटाके स्वतःचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी करत असतात. त्याप्रमाणे शिवसेनेत देखील दोन गट झाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यामध्ये मागील वर्षभरापासून फटाके फुटत आहेत. याचाच एक अध्याय दसरा मेळाव्याच्या निमित्ताने देखील राज्यातील जनतेला पहावयास मिळाला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांची उणीधुनी काढत हे फटाके फडफड करत होते हे अवघ्या महाराष्ट्राने देखील जवळून पाहिले आहे.
(हेही वाचा Shivsena : उद्धव ठाकरे ‘त्या’ शाखेपर्यंत पोहोचलेच नाहीत; कारण…)
‘राष्ट्रवादी’ नावाचा फटका जोरात फुटतो…
यावर्षी जुलै महिन्यातच सत्तेमध्ये सामील झालेले राष्ट्रवादीचे बडे नेते अजित पवार हे समर्थक आमदारांसह सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट बनले आणि त्यानंतर हे फटाके चांगलेच फुटू लागले आहेत. या फटाक्यांमध्ये काही निष्ठावंत फटाके (Fire Crackers) देखील जोरात फुटून आपला आवाज कसा जोरदार निघतो आणि आपणच कसे निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात झाला. परंतु पवार कुटुंबामध्ये कोण कोणाचे आणि कोण कोणाचे नाही हे समजण्यात हे निष्ठावंत फटाके मात्र काहीसे फुसके दिसून येतात. ज्याप्रमाणे शिवसेना नेते संजय राऊत हे सकाळी सकाळी जसे फटाके लावून मजा पाहतात तसे मात्र राष्ट्रवादीत फारसे दिसत नाही. संजय राऊत यांनी लावलेल्या फटाक्यानंतर उत्तरा दाखल सत्ताधारी शिंदे गट, भाजप उत्तरे देत असताना वेगवेगळे फटाके फोडताना दिसून येतात. मात्र राष्ट्रवादी यापासून स्वतःला अलिप्त ठेवून मजा पाहण्याचा कार्यक्रम करत असल्याचे दिसून येते.
मर्द ना मर्दांचे फटाके…
आज देखील ठाण्यातील मुंब्रा येथील शिवसेनेच्या एका शाखेवर बुलडोझर चालल्यानंतर मर्द नामर्दांचे फटाके जोरदार पद्धतीने उठताना दिसत आहेत. तसे हे मर्द नामर्दांचे फटाके (Fire Crackers) वेळोवेळी उठताना दिसले आहेत. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दिवाळीची कधीच गरज पडली नाही.
नेते फटाके वाजवतात आणि कार्यकर्ते आपसात भिडतात…
राजकीय नेते आपला फायदा पाहत विविध प्रकारचे फटाके (Fire Crackers) फोडत असतात, आरोप-प्रत्यारोप करीत असतात, त्यानंतर याला सत्य मानत कार्यकर्ते मात्र आपसात भिडत राहतात आणि राजकीय पुढारी कौटुंबिक संबंध सांभाळत दिवाळीच्या निमित्ताने का होईना उघडपणे एकत्र आलेले दिसून येतात. कार्यकर्ते कित्येक वेळा नातेसंबंध आणि भावकी बाजूला ठेवून पक्षासाठी एकमेकांची डोकी फोडताना देखील पाहायला मिळालेली आहेत. त्यामुळेच राजकारण आणि व्यक्तिगत संबंध सांभाळतच आपण आपले राजकारण करीत या राजकीय फटाक्यांच्या दुनियेत रमले पाहिजे असेच म्हणावे लागेल.
Join Our WhatsApp Community