Diwali 2023: दीपावलीला फटाके फोडताना अशी घ्या काळजी !

कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत.

106
Diwali 2023: दीपावलीला फटाके फोडताना अशी घ्या काळजी !
Diwali 2023: दीपावलीला फटाके फोडताना अशी घ्या काळजी !

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगणे आवश्यक असून विशेषतः फटाके फोडताना लहान मुलांची अधिक काळजी घेण्याचे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, यंदाच्या दीपावलीत (Diwali 2023) रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडावेत. आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तात्काळ क्रमांक १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरवर्षी अतिशय उत्साहात आपण सारेजण दीपावली सण साजरा करतो. या मंगलमय प्रसंगी दीपोत्सव साजरा करीत असतांना फटाक्यांची आतषबाजी, दिव्यांची सजावट तसेच विद्युत रोषणाई केली जाते. काहीवेळा उत्साहाच्या भरात नकळत आगीच्या दुर्घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यामुळे आगीच्या दुर्घटना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्याकरिता योग्य काळजी घेतल्यास दीपावली सणाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. दीपावली सणामध्‍ये रात्री ८ ते १० या कालावधीतच फटाके फोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्देशांचे सर्व मुंबईकरांनी पालन करावे, तसेच कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या मुंबई अग्निशमन दलाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

(हेही वाचा – Diwali 2023 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस , काय आहे या दिवसाचे महत्व जाणून घ्या .)

फटाके फोडताना घ्यावयाची काळजी

  • फटाके फोडताना सुती कपडे परिधान करावेत.
  • फटाके मुलांपासून लांब ठेवावेत व फोडतांना मोठ्या व्यक्तिंनी सोबत रहावे.
  • फटाके फोडताना नेहमी पादत्राणे वापरावीत.
  • फटाके लावताना पाण्याने भरलेली बादली जवळ ठेवावी व भाजल्यास तात्काळ भाजलेल्या ठिकाणी भरपूर स्वच्छ पाणी ओतावे.
  • फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा.

फटाके फोडताना पुढील बाबी टाळाव्यात

  • इमारतीच्या आत व जिन्यावर फटाके फोडू नयेत.
  • फटाके पेटवण्यासाठी आगकाडी अथवा लायटरचा वापर टाळावा.
  •  झाडे, ओव्हरहेड विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत.
  • खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या / दिवे लावू नयेत.
  • विजेच्या तारा, गॅस पाईपलाईन किंवा वाहनतळाच्‍या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
  • इमारतीला रोशणाई करतांना विद्युत तारांची जोडणी ओव्हरलोड करू नये, सैल जोडणी टाळावी.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.