Skin Donation: अवयवदानाप्रमाणे त्वचादान आणि त्वचापेढी वाढवण्याची गरज !

भारतात आज त्वचादानाच्या संकल्पनेबद्दल फारशी जागृती नाही.

147
Skin Donation: अवयवदानाप्रमाणे त्वचादान आणि त्वचापेढी वाढवण्याची गरज !
Skin Donation: अवयवदानाप्रमाणे त्वचादान आणि त्वचापेढी वाढवण्याची गरज !

त्वचा…असंख्य सूक्ष्म छिद्रे (small pores) असणारा, अतिशय संवदेनशील असलेला शरीराचा भाग. शरीराचे तापमान नियमित करणे, संवेदनांची जाणीव करणे आणि रोगांचा प्रतिक्रार करणे…असे विविध प्रकारे ‘त्वचा’ शरीराचे रक्षण करत असते. त्वचेचे सौंदर्य जपण्याकरिता नाना तऱ्हेची सौंदर्य प्रसाधने, घरगुती आयुर्वेदिक उपचार, विविध प्रकारचे ब्यूटि प्रोडक्ट्स वापरले जातात. त्वचेचा पोत जसा असेल, त्यावरूनही व्यक्तिचे आरोग्य कसे आहे याचे निदान होऊ शकते, अशा प्रकारे शरीराचा हा महत्त्वपूर्ण अवयव मृत्यूनंतर रुग्णांना (Skin Donation) दान केल्यामुळे रुग्णांसाठी ‘जीवनदायी’ ठरू शकते. शिव रुग्णालयातील भाजलेल्या रुग्णांच्या (Burns Department) विभागात कार्यरत असणाऱ्या डॉ. माधवी गोरे यांनी ‘त्वचारोपण’ या विषयावर संशोधन करून साधारण २५ वर्षांपूर्वी पहिली त्वचापेढी (skin bank) सुरू केली.

अवयवदानाप्रमाणे त्वचादानही अत्यावश्यक आहे. भारतात दरवर्षी ६० ते ७० लाखांहून अधिक संख्या ही विविध घटनेत भाजून जखमी होणाऱ्यांची आहे, तर योग्य उपचारांअभावी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दीड लाखांच्या आसपास आहे. भाजलेल्या रुग्णाच्या जखमांमधून प्रथिनांचा ऱ्हास झाल्यामुळे रुग्णाचे स्नायू दुबळे होऊन, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यातून जंतूसंसर्ग वाढून मृत्यू ओढवू शकतो. योग्य वेळी योग्य उपचार केल्यास भाजलेला रुग्ण त्वचारोपण केल्यास सामान्य जीवन जगू शकतो. रुग्ण बरा होण्यासाठी भाजल्यामुळे मृत झालेली त्वचा त्वरित काढून त्या जागी स्वत्वचारोपणाचा उपचार केला जातो, मात्र ४० टक्क्यांहून अधिक त्वचा भाजली असल्यास स्वत्वचारोपण अपुरे ठरते. याकरिता मरणोत्तर केलेल्या त्वचादानाची गरज भासते.

लायन्स क्लब, रोटरी क्लब या संस्थांनी त्वचापेढ्यांसाठी पुढाकार घ्यावा !
त्वचापेढ्यांची संख्या भारतभरात अत्यंत कमी आहे. लायन्स क्लब, रोटरी क्लबसारख्या संस्थांनी त्वचापेढ्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्हा रुग्णालयात काही ठिकाणी तरी त्वचापेढ्या सुरू करायला हव्यात. त्वचापेढ्यांसाठी खर्चही जास्त असतो. दोन ते तीन जणांनी त्वचादान केलं तर एका व्यक्तिचा जीव वाचू शकतो. त्वचा काढणाऱ्या तज्ञांचीही आपल्याकडे कमतरता आहे. बऱ्याच जणांना त्वचादान होऊ शकतं, याविषयी माहितीच नसते. मुंबई, कल्याण, ठाणे, नवी मुंबई अशा शहरांमध्ये वर्षाला साधारण दीड हजार तरी त्वचादान होणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे त्वचापेढ्यांची विदारक स्थिती सध्या भारतात आहे, अशी माहिती अवयवदानाबाबत कार्य करणारे श्रीपाद आगाशे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितली.

(हेही वाचा – ICC on Afghanistan : अफगाणिस्तानच्या क्रिकेट विश्वचषकातील सहभागावर आयओसी निर्णय घेईल)

त्वचादानाचे प्रमाण अत्यल्प…
मुंबईत २०२२ या वर्षांत १७५ त्वचादान झाले, तर २०२१ वर्षांत १६० त्वचादान झाले. २०२० या वर्षांत फक्त ६४ इतके त्वचादान झाले. २०१४ वर्षांत सर्वाधिक म्हणजे २९२ इतके त्वचादान झाले होते. ही आकडेवारी मागणीच्या तुलनेत केवळ एक ते दोन टक्केच आहे.

त्वचादानाबाबत गैरसमज
– त्वचा दान का केली जाते, त्याचा उपयोग कसा होता, याविषयी सर्वसामान्यांमध्येही आजही पुरेशी जाणीवजागृती नाही. त्वचादानाचे महत्त्व समजून घेतले तर त्याबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतात.
– भारतात आज त्वचादानाच्या संकल्पनेबद्दल फारशी जागृती नाही त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांतील विविध त्वचापेढ्यांशी संलग्न असणारे डॉक्टर्स त्यादृष्टीने प्रचार प्रसाराचे काम करतात.
– बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की, संपूर्ण शरीराची त्वचा काढली जाते, मात्र असे नसून शरीरावरील पूर्ण त्वचा काढली जात नाही. फक्त मनगटावरील सपाट भाग, मांड्या आणि पाठीच्या थोड्या भागावरील त्वचेचा सगळ्यात वरचा पातळ पापुद्रा घेतला जातो.

त्वचादानाचे महत्त्व
– जखम लवकर भरून येते. वेदना सुसह्य होतात. त्यामुळे त्वचेतील वा त्वचेला लागून असलेल्या पेशी, नसा यांनाही संरक्षण मिळते.
– खूप जास्त प्रमाणात खोलवर भाजलेली त्वचा आणि लवकर भरून न निघणाऱ्या जखमा यांच्या उपचारासाठी मानवी त्वचांपासून बनवलेले वापरता येण्याजोगे अलोग्राफ्स हा सर्वोत्तम उपाय मानला जातो. अशा जळण्याच्या केसेसमध्ये मानवी त्वचेपासून मिळवलेले अलोग्राफ्स तांत्रिक संरक्षण मिळवून देतात. त्यामुळे दुखणे लवकर बरे करून मृत्यू आणि व्यंगाचे प्रमाण कमी होते.

प्रमुख त्वचापेढ्या आणि संकेतस्थळ
– लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शीव
– आरसीबीएन त्वचापेढी, नवी मुंबई
– रोटरी सूर्या हॉस्पिटल त्वचापेढी, पुणे
– रोटरी वेदांत त्वचा संकलन केंद्र, नाशिक
– मसिना हॉस्पिटल, भायखळा, मुंबई
– आरसीबीएन स्किन बँक नॅशनल बर्नस सेंटर सेक्टर -१३, ऐरोली.
हेल्पलाईन क्रमांक ९१-२२-२७७९३३३३
www.skindonation.in या संकेतस्थळाद्वारे संपर्क करू शकता.

(हेही वाचा – Organ Donor : देशातील सार्वजनिक रुग्णालयातून अवयव दाते मिळण्यासाठी सक्षम यंत्रणेची गरज – डॉक्टरांचे मत )

त्वचादानासाठी महत्त्वाचे नियम…
– त्वचादानाकरिता रक्तगट, वयोगट, लिंग, त्वचेचा रंग असे बंधन नसते. १८ वर्षांनंतर कोणतीही व्यक्ती त्वचादान करू शकतो, मात्र एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि सी, एसटीडी एस, सेप्टिसिमिया म्हणजेच न्यूमोनिया, टीबी तसेच त्वचेचा कर्करोग असणारे त्वचादान करू शकत नाहीत. त्वचेमार्फत एखाद्या रोगाचे संक्रमण होणार नाही याबाबत काळजी घेऊन कोणीही त्वचादान करता येते.त्वचादानाकरिता रुग्ण आणि दात्याचा रक्तगट जुळण्याची गरज नाही.
– त्वचा दान केल्यानंतर मायनस डिग्रीला डीप फ्रिझ करून ठेवली जाते. अशी त्वचा ४ ते ५ वर्षांपर्यंत राहू शकते, पण इतके वर्ष त्वचा ठेवण्याची गरजच नसते, कारण त्वचेचे दान केल्यानंतर तिची आवश्यकता भासते.
– मृत्यूनंतर ६ तासांत त्वचादान करता येते. मृत व्यक्तिने आधी फॉर्म भरला नसेल किंवा कोठेही नोंदणी केलेली नसेल तरीही मृत्यूनंतर जवळच्या त्वचापेढीत दूरध्वनीद्वारे संपर्क केल्यास त्वचादान होऊ शकते. फॅमिली डॉक्टर किंवा रुग्णालयाचे मृत्यू प्रमाणपत्र तयार असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्वचादान करता येत नाही.
-जिवंतपणी त्वचादान करता येत नाही.

आवश्यकता कोणाला?
– दिवाळीतील फटाकेबाजी, इमारत, वाहन आणि घरांना लागणाऱ्या आगी, विविध प्रकारचे स्फोट, सिगारेटसमुळे लागणाऱ्या आगी, अंगावर गरम तेल, गरम पाणी सांडणे.
– बेड सोअर्सवरील उपचार, रस्त्यावरील अपघात, अतिरेकी गुन्हेगारी हल्ले, शस्त्रास्त्रांचे वार, संसर्गजन्य जखमांचीही त्वचारोपणाची मोठ्या प्रमाणात गरज भासते.

लागणारा वेळ ?
त्वचादान घेण्यासाठी साधारण पाऊण तास वेळ लागतो. व्यक्तिच्या मृत्यूनंतर २ ते ३ व्यक्तिंची टिम तास दोन तासांत पोहोचते. त्वचा घेतल्यावर बँडेज केले जाते. त्यामुळे रक्तस्राव आणि विद्रुपता येत नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.