राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे राज्य शासनाने राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लावून देखील नागरिक आणि वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून येत आहेत. वाहनांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांनी वाहनांवर स्टिकर लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून रस्त्यावर स्टिकर असणाऱ्या वाहनांनाच परवानगी दिली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
स्टिकर नसणाऱ्या वाहनांना अडवण्यात येणार!
मुंबईत लॉकडाऊनमध्येही मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी वाढत आहे. नाकाबंदीत पोलिसांना वाहने तपासताना वाहतूक कोंडी होऊन अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तसेच रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे. याच्यावर उपाय म्हणून मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी ‘स्टिकर’ची उपाययोजना आणली असून स्टिकर असणाऱ्या वाहनांना अडवण्यात येणार नसल्याचे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.
(हेही वाचा : मुंबई ते दुबई ड्रग्स कनेक्शन उघड!)
पोलिस नाकाबंदी ठिकाणीही मोफत मिळतील स्टिकर!
लाल, हिरवा आणि पिवळा असे तीन रंगाचे स्टिकर असणार आहे. या स्टिकरची साईज अंदाजे सहा इंच असली पाहिजेत, हे स्टिकर वाहनांच्या मागे आणि पुढे दिसतील, असे लावावे लागणार आहे. हे स्टिकर स्वत: आपल्या वाहनांवर बसवावीत, अथवा पोलिस नाकाबंदी या ठिकाणी ते मोफत देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त यांनी जारी केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
कसे असतील स्टिकर!
लाल स्टिकर – वैद्यकीय सेवेतील कर्माचारी, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि वैदयकीय साधने तसेच प्राणवायू पुरवठा करणाऱ्या वाहनांसाठी असणार आहे.
हिरवे स्टिकर – भाजीपाला, डेअरी,बेकरी पदार्थ इत्या खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या वाहनांसाठी असणार आहेत.
पिवळे स्टिकर – अत्यावश्यक सेवेतील पोलीस, मनपा, रेल्वे, बेस्ट, प्रसारमाध्यमातील कर्मचारी आणि पत्रकार यांच्यासाठी असणार आहेत.