Gajanan Kirtikar : वेळीच तोंड आवरावे…रामदास कदमांना गजानन किर्तीकर यांचा इशारा !

137
Gajanan Kirtikar : वेळीच तोंड आवरावे...रामदास कदमांना गजानन किर्तीकर यांचा इशारा !
Gajanan Kirtikar : वेळीच तोंड आवरावे...रामदास कदमांना गजानन किर्तीकर यांचा इशारा !
आज काही वृत्‍तपत्रात माजी विरोधी पक्षनेते व माजी आमदार रामदास कदम यांनी माझ्यावर पक्ष गद्दारीचा संशय व्‍यक्‍त केला आहे. पण असे आरोप करण्यापूर्वी त्यांनी एक लक्षात घ्यावे की, ‘त्यांचाच गद्दारीचा इतिहास फार मोठा असून त्यांनी वेळीच तोंड आवरावे अन्यथा त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागेल,’ असा खणखणीत इशारा शिवसेना नेते व खा.गजानन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
आज काही वृत्तपत्रामाध्ये अचानक व अनपेक्षित पने मुलाखत देताना कदम यांनी माझ्यावर गद्दारीचे वायफळ आरोप केले खरे. परंतु ते नुसते वायफळ असून खरं तर मी १९९० साली ज्या वेळेस स्व.हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मला पहिल्यांदा जेंव्हा मालाड विधानसभेतून निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली त्‍याचवेळेला रामदास कदम हेही कोकणातून खेड मतदारसंघातून विधानसभेची  निवडणूक लढवत होते. त्याचवेळी त्यांनी माझ्या मालाड विधानसभा क्षेत्रातील कांदिवलीमधील सर्व कार्यकर्ते त्‍यांनी खेडला नेले होते. मला पाडण्‍यासाठी अथक प्रयत्‍न केले पण ते यशस्‍वी झाले नाहीत, वरून मी १० हजार मताधिक्‍याने विजयी झालो. हा सर्व घटनाक्रम मी त्याचवेळी स्व.बाळासाहेबांच्या कानीही घातला होता याची आठवणही त्यांनी बोलून दाखवली.
इतके कमी म्हणून की काय अगदी अलीकडे कदम यांना तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आमदारकीचे तिकीट नाकारले त्यावेळी संतापून याच रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची त्यांच्याच विधानसभा मतदार संघ खेड-भरणा नाका ते भोर-पुणे या प्रवासात पवारांच्याच गाडीत बसून राष्‍ट्रवादीत प्रवेश करण्‍याबाबत सविस्‍तर चर्चा करीत होते, हे त्‍यांनी विसरू नये आणि खेडमधील शिवसैनिक देखील हे विसरलेले नाहीत, असा गौप्यस्फोटही खा. किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी केला.
एवढेच कशाला कांदिवली पूर्व महानगरपालिकेच्‍या वॉर्डामधून त्‍यांचा सख्खा भाऊ सदानंद कदम शिवसेना पक्षातून निवडणूक लढत असताना, त्‍यांना निवडून आणू नका म्‍हणून सर्व कार्यकर्त्‍यांना हेच माजी आमदार रामदास कदम दमबाजी करीत होते. इतकेच नाही तर ज्यावेळी माजी खासदार व सेनेचे एक नेते अनंत गीते यांना देखील २०१४ च्‍या लोकसभा निवडणुकीत पाडण्‍यासाठी रामदास कदम यांनी भरपूर मेहनतही घेतली होती. परंतु कोकणातील निष्‍ठावान शिवसैनिक गीतेंच्‍या पाठीशी उभे राहिल्‍यामुळे प्रचंड मताधिक्‍याने ते विजयी झाले, याकडेही खा. किर्तीकर यांनी लक्ष वेधले.
आजमितीस त्‍यांचा मुलगा सिद्धेश कदम याला लोकसभा निवडणूक लढवण्‍याची इच्‍छा झाली आहे, म्‍हणून ते विविध मार्गांनी खोट्या बातम्‍या वृत्‍तपत्र व सोशल मिडीयावर प्रसारित करून पक्षातील वातावरण गढूळ करण्‍याचा निष्‍फळ प्रयत्‍न करीत आहेत. त्‍यांच्‍या या दबावतंत्राला शिवसेना मुख्‍य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थारा देणार नाहीत, अशी मला व सर्व शिवसैनिकांना खात्री आहे. त्‍यामुळेच वैफल्‍यग्रस्‍त झाल्‍यामुळे रामदास कदम आदळआपट करीत असून रामदास कदम माझ्याबद्दल पक्ष नेतृत्‍वाच्‍या मनात आणि जनतेच्‍या मनात हेतुपूर्वक संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. त्‍यांनी वेळीच हे बालिश व वायफळ प्रयत्‍न थांबवावेत,अन्यथा त्यांची कुंडलीच मला उघड करावी लागेल, असा खणखणीत इशाराही खा. किर्तीकर यांनी दिला. त्याचवेळी मी आताही आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षातूनच निवडणूक लढण्‍याचा निर्धार केलेला असून  यावेळेलाही मी साडेतीन लाख मताधिक्‍याने जिंकणारच, असा ठाम विश्वासही खा.किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी बोलून दाखवला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.