- हिंदुस्थान पोस्ट ब्युरो
लोकसभेआधीची रंगीत तालीम म्हणून लक्षवेधी ठरलेल्या राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक (GramPanchayat Election 2023) निकालातून महायुतीला दिलासादायक कौल मिळाला. विशेषतः अजित पवारांनी आपले महत्त्व भाजपश्रेष्ठींना पटवून दिले. त्याचवेळी ‘इंडी’ आघाडीवर या निकालांनी मोठा आघात केला असून, २०० चा आकडाही पार न करता आलेल्या ठाकरे आणि पवार गटाला आत्मचिंतनाचा संदेश दिला आहे. परिणामस्वरूप, ठाकरे-पवारांचे मेरिट घसरल्याचा फायदा घेत काँग्रेसने लोकसभेसाठी २७ जागांवर दावा ठोकण्याची तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या ग्रामीण भागातील विविध जिल्ह्यांत ही निवडणूक होत असल्याने त्याबाबत संपूर्ण राज्यभरात उत्सुकता लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सामना अनेक ठिकाणी शरद पवार यांच्याशी होता. त्यामुळे महायुतीत सामील झालेल्या अजित पवार यांच्या या निर्णयाला ग्रामीण भागातील जनता कौल देणार का? याबाबत उत्सुकता होती.
मात्र, पहिली लढाई अजित पवार यांनी जिंकली असून, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शरद पवार गटाला धोबीपछाड देत त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यांच्या गटाला ४१२ ग्रामपंचायतींवर विजय मिळाला. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही उद्धव ठाकरे यांना ‘पाणी पाजले’ आहे. शिवसेनेला २६३; तर उद्धव ठाकरे गटाला केवळ ११५ ग्रामपंचायती मिळाल्या. याउलट राज्यात नेतृत्त्वहीन दिसणाऱ्या काँग्रेसने २२२ पर्यंत मजल मारली.
त्यामुळे ठाकरे-पवारांचे मेरिट घसरल्याचा फायदा करून घेण्याची रणनीती काँग्रेसने आखली असून, लोकसभेला २७ जागांवर दावा केला जाणार आहे. येत्या काळात होणाऱ्या ‘इंडी’ आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याबाबतचा प्रस्ताव मांडतील. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेसला विरोध करण्याचे धाडस हे पक्ष करणार नाहीत, असा विश्वास ज्येष्ठ नेत्यांना आहे. परिणामी, २७ पैकी किमान २५ जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस आग्रही राहणार असल्याचे अंतर्गत सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जागावाटपावरून ‘इंडी’ आघाडीला पुन्हा सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: अरब नेते आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात बैठक, इस्त्रायलच्या कारवाईबाबत केले ‘हे’ वक्तव्य )
काँग्रेसला हव्यात ‘या’ जागा
– काँग्रेसकडून ज्या २७ जागांची मागणी केली जाणार आहे, त्यात विदर्भातील १५ जागांचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा, वाशिम आणि रामटेक या जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. पण आता या तिन्ही जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. अमरावतीच्या जागेवर शिवसेनेला २०१९ मध्ये पराभव पत्करावा लागला होता. तीही जागा काँग्रेसला हवी आहे.
– २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने चंद्रपूरची एकमेव जागा जिंकली होती, पण आता काँग्रेसने विदर्भातील सर्व जागांवर दावा केला आहे. दुसरीकडे बुलढाणा, अमरावती आणि वाशिमची जागा शिवसेनेला हवी आहे, तर प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या गटात गेल्यामुळे शरद पवार गट ही जागा लढविण्यास इच्छुक नाही.
– मराठवाड्यात लातूर, नांदेड, हिंगोलीसह संभाजीनगरच्या जागेवरही काँग्रेसचा दावा आहे, तर जालना लोकसभेच्या जागेवर सलग चार वेळा पराभव झाल्यामुळे ही जागा काँग्रेस सोडणार आहे. मात्र, संभाजीनगरच्या जागेवरील दावा सोडण्यास ठाकरे गटाने साफ नकार दिला आहे.
– उत्तर महाराष्ट्रात दिंडोरी आणि नाशिकपैकी एक जागा, शिर्डी, धुळे, नंदुरबार या जागांवर काँग्रेसचा दावा आहे. पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगलीसह कोल्हापूर आणि इचलकरंजी यापैकी एक जागा काँग्रेसला हवी आहे.
– माढाची जागा काँग्रेसला हवी आहे. मुंबईत दक्षिण मध्य, उत्तर मध्य, या जागांसह आता ईशान्य मुंबईच्या जागेवर काँग्रेसचा डोळा आहे. कोकणात भिवंडीची जागा काँग्रेस मागत आहे.