ऋजुता लुकतुके
रविवारी चिन्नास्वामी मैदानावर (Ind vs Ned) भारतीय फलंदाजांनी दिवाळीची जोरदार फटाकेबाजी केली. निर्धारित ५० षटकांत भारतीय संघाने ४ बाद ४१० अशी धावसंख्या उभी केली ती शुभमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अर्धशतकं आणि के एल राहुल तसंच श्रेयस अय्यरची तडाखेबंद शतकं यांच्या जोरावर.
त्यानंतर भारतीय संघाने नेदरलँड्सला (Ind vs Ned) २५० धावसंख्येवर बाद केलं. स्पर्धेतला नववा विजयही साकारला. विश्वचषकाच्या एकाच सामन्यात पहिल्या पाच फलंदाजांनी किमान ५० धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती. याशिवाय आणखीही अनेक फलंदाजीचे विक्रम या सामन्यांत मोडीत निघाले.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यातल्या काही विक्रमांचे धनी ठरलेत. फलंदाजीचे नवीन रचले गेलेले विक्रम पाहूया…
-
रोहित शर्माने एका कॅलेंडर वर्षात यंदा ६० षटकार ठोकले आहेत. असं करताना आफ्रिकन फलंदाज एबी डिव्हिलिअर्सचा ५८ षटकारांचा विक्रम रविवारी त्याने मोडला.
-
याशिवाय एका विश्वचषक स्पर्धेत कर्णधारपद भूषवताना सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज होण्याचा मान आता रोहितने मिळवलाय. या विश्वचषकात त्याने २४ षटकार ठोकले आहेत. यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचा इयन मॉर्गनच्या नावावर होता. त्याने २२ षटकार ठोकले होते
-
शुभमन गिल आणि रोहित शर्मा या भारतीय सलामीवीर जोडीने या कॅलेंडर वर्षांत ५ वेळा शतकी सलामी दिली आहे. एका वर्षांत सर्वाधिक शतकी भागिदारी रचण्याचा विक्रम आता त्यांच्या नावावर आहे
-
रोहित शर्माने एका विश्वचषक स्पर्धेत कर्णधारपदी असताना भारतातर्फे सर्वाधिक धावा केल्या आहेत. यापूर्वी २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत सौरव गांगुलीने ४६० धावा केल्या होत्या. तर रोहितने या विश्वचषकात आतापर्यंत ५०३ धावा केल्या आहेत.
(हेही वाचा-Chhatrapati Sambhaji nagar : फटाक्यांमुळे १० ठिकाणी आगीच्या घटना, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही)
-
रोहितने दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये ५०० च्या वर धावा केल्या आहेत. या बाबतीत आता तो सचिन तेंडुलकरच्या बरोबरीला आला आहे. तर रोहीतने एक पाऊल पुढे टाकताना सलग दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये ही कामगिरी केली आहे
-
विराट कोहलीने नेदरलँड्स विरुद्ध ५१ धावा केल्या. त्याचबरोबर या स्पर्धेतील आतापर्यंतचा तो सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेतील त्याचं हे सातवं अर्धशतक होतं. पण, एकूण विश्वचषकातील त्याचं हे २० वं अर्धशतक होतं. आणि या बाबतीत तो सचिन तेंडुलकर (२१ अर्धशतकं) पेक्षा फक्त एका अर्धशतकाने मागे आहे
-
विराट कोहलीने एकाच विश्वचषक स्पर्धेत सात वेळा अर्धशतक ठोकलं आहे. आणि या बाबतीत सचिन तेंडुलकर आणि बांगलादेशचा शकीब अल हसन यांच्या बरोबरीला तो आला आहे.
-
भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांनी किमान अर्धशतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे
-
श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांनी चौथ्या गड्यासाठी २०८ धावांची (Ind vs Ned) भागिदारी केली. चौथ्या किंवा त्याखालील जोडीसाठी भारतातर्फे ही सर्वाधिक भागिदारी आहे. या आधीचा विक्रम सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. २०१५ मध्ये त्यांनी १९६ धावांची भागिदारी केली होती.