दिवाळीचा चौथा दिवस बलि प्रतिपदा म्हणजेच पाडवा हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे खूप महत्वाचा दिवस मानला जातो. हा सण मुळात, कृषीसंस्कृतीतून फुललेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजाला बहुजनांचा देव मानला जातो. गावातील लहान मुले एका हातात फुलबाजी धरुन ती गोलगोल फिरवत एक गाणे म्हणतात जे आपल्या सगळ्यांनाच चांगलेच परिचयाचे आहे. (Diwali Padwa)
‘दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी
गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या
लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा
दे माई खोबऱ्याची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी…’
पूर्वी गावाकडे घराघरातले गुराखी आपली गुरे रानात चारायला जायचे. तिथे त्या गुरांना बिबट्यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात काठी बाळगायचे. आपले गोधन वाचवण्यासाठी ते त्या बिबट्यांना काठीने हाणून पळवायचे. त्याचीच आठवण करून देणारे हे लोकगीत. हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. मुळात दिवाळी हा सणच शेतकऱ्यांचा आहे, याची आठवण या दिवसामुळेच येते.
शेतकरी घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुरांना ओवाळतो. त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते.
कोकणात वाटसरूंना ताक दिले जाते
कोकणात आज गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांना हिरसुणीचे (माडाच्या झावळांचे हीर काढून केलेली झाडू) हीर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूधहंडे केले जातात. येणाऱ्या जाणाऱ्यांना ताक दिले जाते.
मराठवाड्यात गाय-बैलांना मनोभावे ओवाळतात
मराठवाड्यात गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या (एक प्रकारचे गवत) दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर चंद्र-सूर्य रेखले जातात. येथेही शेणाच्या गवळणी तयार केल्या जातात. डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो.
(हेही वाचा : Rangoli : रांगोळीचे बदलते रंगरूप !)
ठाणे-रायगड भागात शेणाच्या गोळ्यांना बळीराजा म्हणून पूजतात
ठाणे-रायगड भागातील आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर तांदळाच्या पिठीपासून `कणे` (रांगोळी) काढले जातात. या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे फूल वाहिले जाते. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची आपल्या घरादारावर कायम कृपा राहावी, अशी यावेळी प्रार्थना केली जाते.
धनगर समाजात मेंढा-मेंढीचे लग्न लावतात
धनगर समाजात हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण. मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावलें जातें. मेंढ्यांच्या लेंड्यांपासून वाडा तयार करतात. वाडा म्हणजे अगदी अख्खे गाव वसवून त्यात घरे, घरातली माणसे, असा देखावा तयार करतात.