दिवाळी हा दिव्यांचा…अंधारावर मात करून प्रकाशाकडे नेणारा सण. या दिवसांत पहाटे उठणं, अभ्यंगस्नान, रांगोळी, दिव्यांची आरास, विद्युत रोषणाई या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व असतं तसंच महत्त्व यावेळी घरोघरी बनवल्या जाणाऱ्या फराळालासुद्धा असतं. वसुबारस, धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा आणि भाऊबिज…या सणांनी दिवाळी प्रत्येकासाठी आगळावेगळा आनंद घेऊन येते. शंकरपाळी, लाडू, चकली, करंजी, अनारसे…विविध प्रकारचे तिखट-गोड पदार्थ या सणाला महाराष्ट्राच्या प्रत्येक घरांत केले जातात. फराळाची भेट एकमेकांना देणं यातून आनंदाचीच देवाणघेवाण होत असते. महाराष्ट्रात प्रत्येक राज्यात दिवाळीनिमित्त वैशिष्ट्यपूर्ण फराळाचे पदार्थ तयार केले जातात. त्यांची नावे आणि बनवण्याची अनोखी पद्धत जाणून घेऊया –
बिहारी मालपुवा
साहित्य : कणिक एक कप, केळ एक, ओल खोबरं अर्धा कप, मिक्स ड्रायफ्रूट्स दोन चमचे, बडीशेप एक चमचा, वेलची पावडर दीड चमचा, दूध एक कप, तूप परतण्यासाठी.
पाकासाठी : साखर एक कप, पाणी तीन चतुर्थांश कप, वेलची पावडर अर्धा चमचा.
कृती : कणिक, केळ, खोबरं, वेलची पावडर, बडीशेप, ड्रायफ्रूट्स सर्व एकत्र करायचं. त्यात दूध घालून बॅटर तयार करा. एक तास झाकून ठेवा. ते थोडं फरमेंट होतं. एका पॅनमध्ये साखर आणि पाणी उकळून एक तारी पाक तयार करा. बाजूला ठेवा. एका नॉनस्टिक पॅनवर तेल घालून मालपुवा करून दोन्ही बाजूनं फ्राय करून घ्या. पाकात घालून ते बाहेर काढा आणि सर्व्ह करा.
तामिळनाडूचा मुरुक्कू
साहित्य : तांदूळ पीठ चार कप, उडीद डाळीचं पीठ दोन कप, मीठ तीन चमचे, तेल पाव कप, जिरा दोन चमचे, हिंग पाव चमचा, खसखस तीन चमचे, पाणी पाच कप.
कृती : सर्वप्रथम पाणी उकळा. त्यात तेल, मीठ, हिंग, खसखस घालून तांदूळ पिठी आणि उडद डाळीचं पीठ घालून नीट एकत्र करा. दहा मिनिटं बंद करून ठेवा. पीठ नीट मळून त्याचा जाड शेवेसारखा आकार करून तळा.
राजस्थानची मिठी मटरी
राजस्थानमध्ये छोटी दिवाळी आणी बडी दिवाळी साजरी केली जाते. म्हणजे नरक चतुर्दशी ही छोटी दिवाळी आणि पाडवा, भाऊबीज ही बडी दिवाळी. प्रत्येकाच्या घरी काही खास गोड आणि नमकीन पदार्थ केले जातात.
साहित्य : मैदा २५० ग्रॅम, साखर २५० ग्रॅम, तूप ५० ग्रॅम, पाणी एक कप, मटरी तळायला तूप.
कृती : सर्वप्रथम मैदा, तूप, थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या. त्याचे छोटे चपटे गोळे करून तेलात किंवा तूपात तळून बाजूला ठेवा. एका कढईमध्ये साखर आणि पाणी घालून एक तारी पाक करा. पाक थोडा गार झाला, की तळलेली मटरी पाकात घाला. २० मिनिटांनी बाहेर काढा. वरून पिस्ता, बदाम घालून सजवा.
(हेही वाचा – Ayodhya Diwali 2023 : दिपोत्सवाचे फोटो शेअर करत पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा! )
बंगालमधली चेन्ना पायेश
बंगालमध्ये मुख्य दिवाळी ही लक्ष्मी पूजनच्या दिवशी साजरी केली जाते. तिथं काली पूजा असं म्हटलं जातं. त्या दिवशी खास देवीची पूजा केली जाते. पारंपरिक पदार्थ केले जातात. रोषणाईही खास असते. तिथं हा खिरीचा प्रकार खूप लोकप्रिय आहे.
साहित्य : दूध अर्धा लीटर, कंडेन्स्ड मिल्क २०० ग्रॅम, साखर दोन चमचे, काजू आणि बदाम प्रत्येकी दोन चमचे, बेदाणे दोन चमचे, चेन्ना (पनीर) २५० ग्रॅम.
कृती : एका कढईमध्ये पाणी आणि साखर एकत्र करून शिजवा. गॅस बंद करून त्यात स्मॅश केलेलं पनीर म्हणजे चेन्ना घालून नीट एकत्र करा. एका कढईमध्ये दूध उकळा. त्यात कंडेन्स मिल्क घालून गरम करा. त्यात चेन्नाचं मिश्रण घालून परत दोन ते तीन शिजवा. वरून बदाम, काजू, बेदाणे घालून सर्व्ह करा.
गोव्यातील आगळावेगळा दिवाळी फराळ
तांदळाचे ‘फोव’ आणि ‘अंबाड्याचे करम’दिवाळीच्या दिवशी करण्याची पद्धत आहे. या पदार्थांशिवाय तेथे दिवाळी साजरी होत नाही, असे म्हणतात. पूर्वी घराघरांत फोव बनवण्याचं ‘लाटं’ असायचं. शेणानं सारवलेल्या जमिनीत खड्डा खणून त्यात जाड आकाराचं लाकूड बसवलं जायचं. त्याच्या खाली उकडलेल्या तांदळाचे दाणे ठेवून घरातील बायका याला पायाने जोर देऊन त्याचे पोहे बनवायच्या. दिवाळी आणि पोहे यांचं नातं आजही जपलं गेलंय. रोसातले फोव, ताकातले फोव, दह्यात कालवलेले, दुधातले फोव, पाकातले फोव, फोंवा खीर, फोवा चिवडो, बटाटा फोव, तिखशे फोव…असे पदार्थ दिवाळीनिमित्त बनवले जातात.किमान पाच प्रकारचे फोव घराघरांत नरक चतुर्दशीला बनवले जातात. शिवाय यासोबत वाटाण्याची उसळ आणि ‘आंबाड्याचे करम’ बनवतात.आंबाड्याचे करम हा पदार्थ फारच आगळावेगळा. अशा प्रकारे वेगवेगळ्या चवीचे …पारंपरिक संस्कृती आणि प्रथेप्रमाणे आपल्याकडे राज्यभरात पदार्थांमध्ये वैविध्य आढळते. या पदार्थांचा सुवास आणि एकमेकांना वाटून खाल्ल्याने दिवाळी साजरी करण्यातला उत्साह द्विगुणीत होतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community