- नमिता वारणकर
‘दरवर्षी आपण दिवाळीला फराळ करतो. आपले शेजारी, नातेवाईक, विविध ठिकाणची मित्रमंडळी यांना वाटतो. त्याचप्रमाणे फराळाचा डबा मी अहोरात्र, ऊन-वारा, थंडी, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता भारतवासियांच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या माझ्या सैनिक बंधूंना पाठवते. फराळाचा डबा भरताना त्यात फक्त करंजी, लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळी…असे पदार्थ नसतात, तर त्यासोबत माझ्या प्रेम, आशीर्वाद, शुभेच्छाही त्यांच्यापर्यंत पोहोचतात. एका सैनिकाची ‘आई’ म्हणून फराळाच्या डब्यासोबत शुभाशीर्वादाची भावनाही प्रत्येक सैनिकाच्या मनापर्यंत नक्कीच पोहोचते…’… अशा भावपूर्ण शब्दांत आपलं मनोगत व्यक्त केलंय सुनीता केणी यांनी.
गेल्या ९ वर्षांपासून आपल्या देशवीरांसाठी त्या फराळ पाठवत आहेत. (Diwali 2023) त्यांच्या या उपक्रमाला अगदी सहज कशी सुरुवात झाली. याविषयी त्या सांगतात, ‘माझा मुलगा सैन्य दलात आहे. एक वर्ष आमची आणि त्याची भेट झाली नव्हती. त्यामुळे आम्हीच त्याला सीमेवर जाऊन भेटून फराळ देण्याचा विचार केला. तेव्हा त्याच्याकडून कळलं की, पालकांना भेटायला येण्याची परवानगी नसते शिवाय तो असेही म्हणाला की, फराळ मी एकटाच कसा खाऊ? इथे आमच्याबरोबर अनेक सैनिक आहेत. सगळेच कुटुंबापासून लांब राहतात. त्यामुळे आम्ही जे खातो ते सगळ्यांना वाटून खातो. तेव्हा मी त्याला म्हणाले की, तिथे जेवढे सैनिक असतील त्या सगळ्यांसाठी फराळ घेऊन येते. हा संवाद दूरध्वनीद्वारे सुरू होता. त्याला भेटायला जाताना आम्ही एकूण साडेबाराशे फराळाचे खोके घेऊन गेलो, अशी अनपेक्षितपणे सीमेवर फराळ देण्याची सुरुवात झाली. फराळ पाठवण्याची तयारी १५ दिवस आधीपासून सुरू केली. घरी ४ आचारी बोलावून त्यांच्याकडून फराळ बनवून घेतला. त्याचं पॅकिंग करणं याकरिता आमच्या सगळ्याच मित्रमंडळींनी आनंदाने मदत केली. सायंकाळी ऑफिसमधून आल्यावरही अनेक जण फराळाची पाकिटं भरायला यायचे. सगळ्यांना यातून खूप आनंद मिळाला. फराळ पाठवल्यानंतर शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळींना कळल्यावर त्यांनीही या उपक्रमासाठी मदत करायचे ठरवले. अशा प्रकारे अनपेक्षित सुरू झालेला हा उपक्रम गेल्या ९ वर्षांपासून सुरू आहे.
सैनिकांना फराळ पाठवण्यासाठी अधिकारी आणि सैन्य दलातील इतर ठिकाणांहून परवानगी घ्यावी लागते. यासाठी १ ते २ महिने आधी सैनिकांना पत्र पाठवून ‘आम्हाला फराळ पाठवायचा आहे. तुम्ही स्वीकाराल का?’, असं विचारून त्यांची परवानगी घेतली जाते. त्यांचं उत्तर आलं की, फराळ तयार करायला सुरुवात होते. दरवर्षी कमी जास्त प्रमाणात काश्मीर-पाकिस्तान, अरुणाचल प्रदेश, गुवाहाटी, आसाम, तामोरी, मेघालय, बांगलादेश… अशा विविध ठिकाणी सीमेवर एकूण ७१ ठिकाणी सुनिता केणी सैनिकदादांसाठी फराळ पाठवतात. साधारण ८ ते १० हजार फराळाचे डबे पाठवण्यात येतात. नाना साठे प्रतिष्ठान, भारत विकास परिषद संस्थेचे पनवेल येथील श्री आणि सौ. कानिटकर, हिंदु नववर्ष स्वागत समिती, आनंदवन मित्र मंडळ, आव्हान पालक संघ… अशा विविध संस्थांचा या कार्यात हातभार लागू लागला. दरवर्षी एका नवीन संस्थेसोबत त्या जोडल्या जातात. अशा अनेक संस्था पुढे आल्या, तर आपण अनेक सैनिकांपर्यंत फराळ पाठवू शकतो. कुटुंबियांची भेट घेणे आणि कुरियर पाठवण्याला परवानगी नाही. त्यामुळे ज्यांची मुलं सैन्य दलात सेवा करतात. अशा कुटुंबियांचा या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग आहे, कारण त्यांना वैयक्तिकरित्या सैन्यात फराळ पाठवता येणे शक्य नसते. त्यामुळे या उपक्रमाअंतर्गत फराळ पाठवणे सोपे होते.
सैनिकांसोबत बंध…
सुरुवातीला आम्ही प्रत्यक्ष सैनिकांना फराळ नेऊन द्यायचे. तेव्हा सैनिकांची भेट व्हायची. विविध विषयांवर चर्चा व्हायची. त्यांच्या अडचणी कळायच्या. तेव्हापासून फराळासोबत एखादं गिफ्ट पाठवण्याची संकल्पना सुचली. त्यांना जे आवश्यक आहे, ते पाठवण्याचा विचार केला जातो. सैनिकांच्या खिशात मावेल अशी पॉकेट डायरी, सनस्क्रीन लोशन अशा भेटवस्तूही आम्ही त्यांना देतो. लेह-लडाखला तापमान -२० आणि सियाचीनला तर -५० असंही असतं. त्यावेळी आम्ही एसपीएफ ६० असलेल्या सनस्क्रिन लोशनच्या अडीच हजार बाटल्या कोरोनाकाळापासून पाठवायला सुरुवात केली. गेल्यावर्षी कुपवाडाला आम्ही सैनिकांना राखी बांधायला गेलो होतो. त्यांना राख्या पाठवल्या जातात, पण बांधणारं कोणी नसतं, म्हणून आम्ही प्रत्यक्ष जाऊन राखी बांधायचं ठरवलं. तेव्हा जाताना त्यांच्या मुलांसाठी गोष्टीची पुस्तक नेली होती. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. बऱ्याच जणांनी सांगितलं, ‘खूप आनंद झाला. इथे आम्हाला करमणुकीची साधनं फारच कमी आहेत. त्यामुळे पुस्तकांची आवश्यकता असते.’ याकरिता यावर्षी मराठी भाषेतील गोष्टींची पुस्तके पाठवली, कारण जिथे मराठा रेजिमेंट आहे, तिथे मराठी भाषिक सैनिक बरेच आहेत. गोष्टीच्या पुस्तकांचे बॉक्स, राखी बांधणे, दिवाळी फराळ या सर्व गोष्टींमुळे सैन्य दलाबरोबर आमचा बंधच तयार झाला, अशी माहिती केणी देतात.
(हेही वाचा –6 Wickets in 6 Balls : क्लब क्रिकेट स्तरावर एका गोलंदाजाचे ६ चेंडूत ६ बळी )
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाकडून मदत
सैनिकांना फराळ पाठवणं ही एक मोठी प्रक्रिया आहे. याविषयी कृतज्ञतेची भावना करताना सुनिता केणी सांगतात, विविध फराळ विक्रेत्यांकडून फराळाचे सँम्पल्स मागवणे, प्रत्यक्ष तयार करून घेणे, कोणत्या कॅटरर्सकडे ऑर्डर द्यायची, सँम्पल्स मागवून त्याची चव घेणे, फराळाची गुणवत्ता कशी, तो कुठे तयार केला जातो. ज्यांनी तयार केलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात, अशा कॅटरर्सना आम्ही ऑर्डर देऊन तो पदार्थ बनवून घेतो. आम्ही एका वेळी ५ वेगवेगळ्या कॅटरर्सकडे ऑर्डर देतो. साधारण १० ते १२ जणांची टिम माझ्याबरोबर काम करत असते. बॉक्सेस स्वत: पॅक करतो शिवाय ८ ते १० हजार बॉक्सचं पॅकिंग करण्यासाठी मोठी जागा लागते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी किंवा पाडव्यापर्यंत तो त्यांच्यापर्यंत पोहचावा यासाठी गेल्या ३ वर्षांपासून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारका’त फराळाच्या बॉक्सचं पॅकिंग होतं. यासाठी स्मारकातून विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली जातेच शिवाय आम्हाला येणाऱ्या अडचणीही सोडवल्या जातात. अनेक सदस्य, पदाधिकारी सैनिकांना फराळ देण्यासाठी मदत करतात. ६० ते ७० वयोगटातल्या भगिनी एकत्र येऊन अतिशय प्रेमाने फराळाचे डबे भरतात. यावर्षी स्वातंत्र्यवीर स्मारकाकडून सैनिकांच्या मुलांसाठी गोष्टीची पुस्तकेही भेट म्हणून देण्यात आली.
सैनिकांना फराळ पाठवला नाही, तर…
फराळासाठी देणगी किंवा डोनेशन द्या म्हणून कोणालाही आवाहन केले जात नाही. सैनिक आपल्या कुटुंबातीलच सदस्य आहेत, या भावनेने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फराळ दिला जातो. दरवर्षी एक महिला फक्त एका सैनिकाच्या फराळाच्या डब्याचे पैसे आणि ग्रिटिंग्ज देतात. ‘मी सैनिकांना फराळ पाठवला नाही, तर मला फराळ खावासा वाटणार नाही’ ही प्रेमाची भावना त्या महिलेच्या मनात आहे, असे सांगताना सुनीता केणी म्हणतात, कुटुंबियांसोबतही राहणाऱ्या काही सैनिकांना त्यांच्या मुलांना फराळ खायला मिळाला, याचाही एक वेगळाच आनंद मिळतो. काही सैनिकांच्या डोळ्यातले अश्रू पाहून भारावून जायला होते तसेच दिवसरात्र देश रक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांना भेटायला गेल्यावर त्यांनाही आपली ‘सपोर्ट सिस्टिम’ हवी असते, ही जाणीव प्रकर्षाने मनाला झाली. फराळ देण्याच्या निमित्ताने सैन्य दलात सेवा बजावणाऱ्या सैनिकांचं जीवन जवळून अनुभवता आलं. कुटुंबियांना मागे सोडून ते अहोरात्र परिश्रम घेत असतात. सुखसोयीची विशेष साधने नसल्यामुळे तिथे त्यांच्यासोबत राहणे सगळ्यांनाच जमते असे नाही. अशा वातावरणातही सगळ्या सेनाधिकाऱ्यांच्या पत्नी एकमेकींच्या सहाय्याने राहतात. त्यांच्या भावनांची जाण आपण ठेवली, तर प्रत्येकाच्याच मनात सैनिकांप्रती प्रेम, आदर आणि देशभक्ती जागृत होईल.