Air pollution: मुंबईकरांचा घुसमटलेला श्वास कधी मोकळा होणार ?

हवेतील धुळीच्या प्रदूषणामुळे दमा, अस्थमा यांसारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे.

153
Air pollution: मुंबईकरांचा घुसमटलेला श्वास कधी मोकळा होणार ?
Air pollution: मुंबईकरांचा घुसमटलेला श्वास कधी मोकळा होणार ?

मुंबईची हवा सध्या प्रदूषित झाली आहे. (Air pollution) आधी देशाची राजधानी असलेले दिल्ली शहर प्रदूषित शहर बनलेच आहे, आता त्या रांगेत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराचाही समावेश झाला आहे. मुंबईतील दूषित हवेचा निर्देशांक एवढा वाढला आहे की, या हवेतील धुळीच्या प्रदूषणामुळे दमा, अस्थमा यांसारख्या आजारांनी तोंड वर काढले आहे. त्यासोबत सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजारही वाढू लागले आहेत. मुंबईकरांना शुद्ध हवा घेण्याची सोयच राहिलेली नाही. हवेतील दमटपणा आणि त्यातच हवेत मिसळणारा धूर आणि धूळ ! लोकांना ऑक्सिजन टँक सोबत घेऊन फिरण्याची तर वेळ येणार नाही ना, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे.

सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी-फेब्रुवारी या हिवाळ्याच्या काळात हवेतील दमटपणा वाढून लोकांना श्वास घेण्यास अडचणी येण्याचे प्रकार घडतच असतात. पण हा प्रकार यावर्षीचा आहे का ? दरवर्षी आपण याच समस्येला सामोरे जात असतो आणि प्रत्येक वर्षी वातावरणीय बदलावर चिंता व्यक्त करत असतो. पण पुढे काय ? ऋतू बदलला आणि हे दूषित हवेचे प्रमाण कमी झाले की, आपण सर्व विसरून जातो. यासाठी तात्पुरत्या नव्हे, तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. मुंबईचा विचार केल्यास प्रशासन प्रश्नांकडे गांभीर्याने पहात नसल्याचे दिसून येते. मुंबईत आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तशीच परिस्थिती सन २०१७ मध्येही निर्माण झाली होती. त्यामागे सन २०१२-१३ मध्येही असे घडले होते. रस्त्यावरील या वाढत्या धुळीच्या त्रासावर उपाय म्हणून तात्कालिन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी महापालिका प्रशासनाला काही सूचना केल्या. त्यानंतर निवडक रस्ते हे पाण्याने धुवून धुळीपासून होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. पुढे काय ? आज जेव्हा धुळीची समस्या पुन्हा निर्माण झाली, तेव्हा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सर्व प्राधिकरणांची बैठक घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मुंबईतील छोटे आणि मोठे रस्ते टँकरच्या पाण्याने धुण्याचे निर्देश दिले. त्यानुसार प्रशासनाने याची कार्यवाही सुरु केली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बंगालच्या उपसागरावरून येत असलेले बाष्प, संथावलेले वारे आणि आगीच्या दुर्घटना यांचा एकत्रित परिणाम म्हणून वातावरणात प्रदूषणकारी कणांचे प्रमाण वाढते. मुंबईची हवा ही जगभरातील सर्वांत प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या स्थानांवर पोहोचली आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सनुसार या वर्षीच्या जानेवारी ते फेब्रुवारी या दरम्यान मुंबईतील हवेतील प्रदूषण हे जगातील प्रदूषित शहरांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. वाहनांचा धूर, रस्ते आणि बांधकाम प्रकल्पांतून ही हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. हवेमुळे जरी हे प्रदूषण वाढत असले, तरी ज्या प्रकारे मुंबईत इमारत बांधकाम, रस्ते बांधकाम, मेट्रो रेल्वेची कामे, पूल, नाला रुंदीकरण, रेल्वे मार्गावरील कामे आदी प्रकारची बांधकामे सुरू आहेत त्यामुळेही धुळीचे प्रमाण वाढते. आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सुमारे ६ हजारांहून अधिक बांधकामे सुरु आहेत. या बांधकामांच्या ठिकाणी धुळीच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

बांधकामाच्या ठिकाणी पत्रे उभारून धुळीचे प्रमाण कमी होणार नाही. बांधकामांच्या साईटवरून जे ट्रक बाहेर येतात, त्या ट्रकचे टायर चिखलात किंवा ओल्या मातीत रुतून येतात. त्यामुळे रस्त्यांवर त्या टायरला चिकटलेली माती पसरते. तीच माती हवेसोबत उडून आसपासच्या परिसरात मिसळते. दक्षिण मुंबईतील एलफिन्स्टन रोड, लोअर परळ, ज्यास आपण आता अप्पर वरळी म्हणून ओळखतो, त्या भागांमध्ये सन २००६-०७ साली मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु होती. ती आज इंडिया बुल्स टॉवर, तसेच इतर नावाने कमर्शियल हब म्हणून ओळखली जातात. त्या ठिकाणी बांधकामाची माती वाहून नेणाऱ्या ट्रकमुळे रस्त्यावर टायरला चिकटलेली माती यायची. त्यामुळे स्थानिकांना धुळीचा त्रास होत असे. यावर आंदोलनही झाले होते. तात्पर्य हेच बांधकामामुळे होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाबाबत १८ वर्षांपूर्वी आवाज उठवला गेला होता. जर प्रशासनाने तेव्हापासून याबाबत सर्व बांधकामांच्या ठिकाणी कडक नियमावली करून त्यांची अंमलबजावणी केली असती, तर यापासून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण आपण कमी करू शकलो असतो.

(हेही वाचा – Dr. Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणाची दुसरी बाजू काय?)

शिवाजी पार्कमधील धुळीची समस्याही फार जुनी आहे. यावर कायमस्वरूपी पाण्याची फवारणी केली जावी, हाच एकमेव उपाय आहे. या मैदानाला हरित करण्याच्या नावाखाली यावर शेकडो ट्रक माल माती टाकण्यात आली. पुढे त्याची योग्य प्रकारे देखभालच न झाल्याने या मातीचा धुरळा हवेच्या लोटाबरोबरच उंचच उंच उडतो. लोकांच्या घरादारांपर्यंत पोहोचतो. जर माती काढणे शक्य नसेल, तर किमान दिवसातून ४-५ वेळा पाणी शिंपडले जावे. जेणेकरून त्या ठिकाणी फिरायला येणाऱ्यांना, तसेच स्थानिकांना त्रास होणार नाही.

केवळ धुळीमुळेच नव्हे, तर आगीपासून पसरणाऱ्या वायू प्रदूषणामुळे हवेतील निर्देशांक घटलेला आहे. आज आगीच्या घटनेबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. असे असूनही मुंबईत जे भंगारसामान झोपडपट्टी वस्त्यांमध्ये वायर किंवा अन्य प्लास्टिक जाळून त्यातील कॉपर आणि इतर वस्तू मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा जाळल्या जाणाऱ्या ठिकाणांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे.

स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार लाकडे जाळून केले जातात. पण त्यातील धूर हा उंच चिमणीद्वारे सोडला जात असला, तरी तरी तो हवेतच मिसळतो. महापालिका आवश्यक दक्षता घेत असली, तरी बेकरी व्यवसाय, सोने-चांदीपासून दागिने बनवणारे कारखाने, तसेच इतर कारखान्यांमध्ये लाकडे जाळून किंवा अन्य केमिकल्स जाळून केल्या जाणाऱ्या प्रकारांमुळे धुराचे प्रमाण अधिक वाढते. या कारखान्यांना केवळ या वर्षी कठोर नियमावली करून उपयोग नाही, तर कायमस्वरूपी उपाययोजना करायला हवी. काही प्रमाणात या वाढत्या प्रदूषणातील टक्केवारी कमी करता येईल.

दिवाळीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात फटाके फोडतो. फटाके फोडत आनंद लुटतांना दमा आणि अस्थमा असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक, रुग्ण यांचीही काळजी घेण्याची गरज आहे. फटाके फोडल्यामुळे केवळ ध्वनीप्रदूषणच होत नाही, तर त्यातील धुरामुळेही मोठ्या प्रमाणात घशाचे आजार उद्भवतात. हे एकप्रकारचे वायू प्रदूषणच आहे. त्यामुळे वातावरणातील दूषित हवेचा निर्देशांक वाढलेला असल्याने यंदाच्या दिवाळीत कमीत कमी आवाजाचे आणि कमी धूर होईल, अशाप्रकारे फटाके फोडणे योग्य ठरेल. दिवाळीत प्रदूषण टाळण्यासाठी फटाके न फोडण्याचा विचार जर प्रत्येक सूज्ञ आणि जबाबदार नागरिकाने केल्यास प्रदूषण नियंत्रणात आणण्यात आपलाही हातभार लागल्याचे समाधान मिळेल.

(हेही वाचा – Dr. Dabholkar Murder Case : दाभोलकर हत्या प्रकरणाची दुसरी बाजू काय?)

न्यायालयाने फटाके वाजवण्यावर निर्बंध आणून सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत वाजवण्यास परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे पालन जनता किती करेल आणि या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी पोलिस यंत्रणा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी किती घेतील, हा प्रश्न आहे. मी तर म्हणेन बंदी घालण्यापेक्षा समाजानेच फटाके न वाजवण्याचा निर्धार पक्का करायला हवा. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि या सणात फटाक्यांची आतषबाजी करण्यापेक्षा विद्युत रोषणाई करून हा सण साजरा करायला हवा. सन २०१८ मध्ये मुंबईकरांनी फटाके कमी प्रमाणात फोडले होते. त्यामुळे दिवाळीच्या काळातील प्रदूषण कमी झाले होते. त्यानंतरच्या म्हणजे २०१९ च्या दिवाळीत कानठळ्या बसवणारे फटाके वाजवले गेले नाहीत. त्यामुळे मागील १५ वर्षांतील शांत दिवाळीची नोंद झाली होती. खरंतर २०१० पर्यंत मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्याचे प्रमाण बरेच असायचे. त्या वेळी १४५ डेसिबलपर्यंत आवाजाचे फटाके फोडले जायचे. त्यानंतर हे प्रमाण ११२ डेसिबलपर्यंत नोंदवले गेले आहे. त्यामुळे फटाक्यांच्या माध्यमातून आवाजाच्या आणि वायूच्या प्रदूषणाचेही प्रमाण कमी करू शकतो. हे आपल्या हाती आहे. महापालिका प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे. एक सुजाण नागरिक म्हणून आपणही आपले कर्तव्य पार पाडत यंदा फटाके न फोडण्याचा पक्का निर्धार करूया. मग तुम्ही फोडणार का फटाके?

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.