थोरामोठ्यांमध्ये आनंद, उत्साहाची वाढ करणारा हिंदु धर्मातील पारंपरिक आणि मोठा सण म्हणजे दिवाळी! दिवाळीत मुलांना शाळेला सुट्टी असते. नवीन कपड्यांची खरेदी, अभ्यंगस्नान, फराळ, घरातील स्वच्छता, फटाक्यांची आतिषबाजी…अशा अनेक गोष्टींबरोबर किल्ल्यांच्या प्रतिकृती आजही महाराष्ट्रात काही ठिकाणी साकारल्या जातात. पूर्वजांचा पराक्रम आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या या कलाकृतीत विविध पैलू दडलेले आहेत. विजयाचे प्रतीक, संघभावना, किल्ल्यांची ओळख, मराठी संस्कृती, वारसा, परंपरा, दुर्गभ्रमंती…अशा विविध घटकांद्वारे दिवाळीत ‘किल्ले बांधणे’ या कलाकृतीचा घेतलेला लेखाद्वारे घेतलेला आढावा.
घरात, अंगणात लाल माती आणि इतर वस्तूंचा वापर करून दिवाळीत किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारली जाते. (Diwali 2023) या किल्ल्यावर मावळ्यांच्या मूर्ती, किल्ल्यांप्रमाणे रंगरंगोटी करून किल्ल्याचा देखावा मुले साकारतात. किल्ले बनवण्यासाठी जय्यत तयारी केली जाते. महाराष्ट्रात यासाठी स्पर्धांचे आयोजनदेखील होते. महाराष्ट्रात अनेक दशकांपासून किल्ले बनवण्याची प्रथा आहे. घर हे समृद्धीचे प्रतीक असते. घरासमोर किल्ले बांधणे हे घराचे रक्षण करण्याचे आणि घरात असलेल्या धन-समृद्धीला टिकवून ठेवण्याचे प्रतीक मानले जाते.
(हेही वाचा – Diwali 2023: रांगोळीचा कॅन्व्हास झाला ग्लोबल!)
माती, शेण, दगड, पोतं, चिकट धान्याचं पीठ एकत्र करून किल्ला बनवतात. किल्ल्याची बांधणी झाल्यावर त्यावर डागडुजी केली जाते. गेरू आणि चुन्याचा वापर करून धान्यांनी नक्षीकाम केले जाते. किल्ल्यावर ध्वज लावतात. झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जाते. किल्यावर रोषणाई केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या मुर्त्या ठेवल्या जातात. किल्ला पूर्णपणे बांधल्यानंतर, मुले मातीपासून बनवलेल्या योद्धांच्या पुतळ्यांनी सजवतात. त्यांना मावळे म्हणतात. दिवाळीत हे मावळे बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे माती आणि पाण्याचे गुणोत्तर, मिश्रणाची सुसंगतता यासह सौंदर्यशास्त्राचासुद्धा विचार नकळतपणे मुलांकडून होतो.
इतिहासातील अनेक सुवर्ण क्षण, अनेक मोहिमा, आनंदाचे दुःखाचे क्षण, पराभव- विजय, पराक्रम, आक्रमण यांचे हे किल्ले साक्षीदार आहेत. मुघलांबरोबर झालेल्या युद्धात त्यांनी अनेक किल्ले काबीज केले. किल्ल्यांच्या इतिहासामुळे मुलांमध्ये सकारात्मकता निर्माण होते तसेच ‘किल्ले बांधणे’ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली देण्याचे प्रतीक मानले जाते.
(हेही वाचा – Diwali 2023 : आता बिनधास्त खा दिवाळी फराळ! )
प्रख्यात इतिहासकार निनाद बेडेकर दिवाळीत किल्ले बांधण्याविषयी सांगतात की, ‘महाराष्ट्रात दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा थेट ३०० वर्षांपासून चालत आली आहे. औरंगजेबाने जेव्हा १६८०नंतर दक्षिणेवर स्वारी केली त्यावेळी ५ ते ६ वर्षांमध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही सहज संपवली, पण शिवरायांच्या उभारलेल्या २६० किल्ल्यामुळे त्याला स्वराज्य घेणे जमले नाही. साल्हेरपासून जिंजीपर्यंत उभारलेले २६० गडांनी स्वराज्याचे रक्षण केले. त्यानंतर त्यावेळेपासून महाराष्ट्रामध्ये ही परंपरा चालू आहे.’
किल्ल्यातील ऐतिहासिक बांधकामाची ओळख…
अनेक मुले एकत्र येऊन किल्ला बांधतात त्यामुळे कल्पनाशक्तीला वाव, विचारांची देवाणघेवाण, ऐतिहासिक बांधकामाची ओळख तसेच सपाटीवरील किल्ला, पाण्यातला किल्ला, डोंगराचा किल्ला…किल्ल्यांच्या अशा विविध प्रतिकृती साकारल्या जातात.
कोणत्याही परिस्थितीत उभं कसं राहायचं याची शिकवण
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर पुत्रवत प्रेम केलं, ज्याचे गडकिल्ले त्याचे राज्य हे महाराजांनी जाणलं होतं, म्हणून त्यांनी अनेक किल्ले जिंकले. किल्ले हे संकटांशी कसं भिडायचं याचं प्रतीक आहे तसेच ते संरक्षक प्रदेशाचे, प्रजेचे. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता कोणत्याही परिस्थितीत उभं कसं राहायचं याची शिकवण देतात. या गडकिल्ल्यांमुळेच महाराष्ट्राचीच, नव्हे तर पुढे अखंड हिंदुस्थानची प्रजा निर्भयपणे, आनंदाने जगू लागली, शिवकाळात प्रजेला स्वातंत्र्य मिळाले होते तो एक सुवर्णकाळ होता. किल्ले हे संरक्षकतेचं प्रतीक आहे म्हणून दिवाळीला घराबाहेर किल्ले बनवण्याची प्रथा सुरू झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community