– जयेश मिस्त्री
सिंधुताई यांचा जन्म भारतातील महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यातील जंगलभागातील नवरगाव येथे १४ नोव्हेंबर १९४७ रोजी झाला. त्या काळी मुलगा आणि मुलगी यात भेदभाव केला जायचा. याला सिंधुताई सुद्धा बळी ठरली. मुलगी नको असताना मुलगीच जन्माला आली म्हणून घरच्यांनी तिचे नाव ‘चिंधी’ ठेवले. तिला शिक्षणही धड घेता आले नाही. चिंधीला रोज सकाळी गुरे राखायला पाठवायला जायचे. तिचं शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालं. वयाच्या ९ व्या वर्षी घरच्यांनी तिचे लग्न तिच्यापेक्षा २६ वर्षांनी मोठा असलेला ‘श्रीहरी सपकाळ’ याच्याशी लावून दिलं आणि ती चिंधीची ‘सिंधू’ झाली. (sindhutai sapkal information in marathi)
सासरी तिचे हालहाल झाले. तिला जंगलात लाकूडफाटा आणि शेण गोळा करायला जावे लागायचे. जंगलात मिळणारे कागदाचे तुकडे गोळा करून त्यावर लिहिलेला मजकूर सिंधू लपून छपून वाचण्याचा प्रयत्न करायची. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत तिची तीन बाळंतपणे झाली होती. त्याकाळी गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकडो असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडून जायचे. त्या बिचाऱ्या अर्धमेल्या होऊन जायच्या पण या कामाच्या बदल्यात त्यांना कुठलाही मोबदला किंवा मजुरी मिळत नसे. शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. त्यांच्याविरुद्ध सिंधूने बंड पुकारला आणि लढा सुरू केला. त्यावेळी ती चौथ्या वेळी गरोदर होती. तिच्या या लढ्यामुळे शेणाच्या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांचा हप्त्यावर गदा आली.
ती लढा जिंकली पण या लढ्याने तिचं आयुष्य उध्वस्त केलं. सिंधूच्या या धैर्यामुळे गावातील जमीनदार दमडाजी असरत संतापला होता. दमडाजी ने सिंधूच्या पोटातील मूल आपलेच असल्याचा कांगावा सुरू केला आणि तिच्या नवऱ्याच्या मनात तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण केला. संशयाने श्रीहरीच्या मनात पक्के घर केले होते. त्याने सिंधूला तिच्या गरोदरपणाचे पूर्ण दिवस भरलेले असताना बेदम मारले आणि ती अर्धमेल्या अवस्थेत असताना गुरांच्या लाथा लागून मरावी म्हणून तिला गोठ्यात आणून टाकले. तशा अवस्थेतच तिच्या बाळाचा जन्म झाला. तिला मुलगी झाली पण नवऱ्याने आणि सासरच्यांनी तिला बाहेर हाकलून दिले. अर्धमेल्या अवस्थेतच सिंधू माहेरी आली, पण माहेरच्यांनीही आसरा दिला नाही. सिंधू परभणी – नांदेड – मनमाड रेल्वे स्टेशन्सवर भीक मागत फिरायची. एक दिवस आयुष्याला कंटाळून तिने जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर गाडीखाली जीव देण्याचा प्रयत्न केला पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून ती परत माघारी फिरली. मग पुन्हा हिंडत फिरने आणि भीक मागणे सुरू झाले.
सिंधू दिवसभर भीक मागत फिरायची आणि रात्री स्टेशनवरच झोपायची. भीक म्हणून मिळालेले अन्न तिने कधी एकटीने खाल्ले नाही. ती स्टेशन वरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या अन्नाचा काला करायची आणि मग सगळे भिकारी एकत्र मिळून ते अन्न जेवायचे. त्या सर्व भिकाऱ्यांनीच तर २१ वर्षांच्या सिंधूला संरक्षण दिले होते. असे करता करता सिंधू त्या सर्व लेकरांची माय म्हणजेच ‘माई’ झाली होती. त्या भिकाऱ्यांमध्ये अनाथ मुलेही होती. त्यांना सांभाळणारे कोणीच नव्हते. अशा बेवारस मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळावी या हेतूने माईंनी आपली मुलगी ‘ममता’ हिच्या नावाने ‘ममता बालसदन संस्था’ १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावात सुरू केली. माईंनी आपली मुलगी ममता हिला ‘दगडूशेठ हलवाई संस्थेच्या’ माध्यमातून तिच्या शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि इतर बेवारस मुलांसाठी स्वतः आधारवृक्ष म्हणून उभ्या राहिल्या.
माईंच्या या संस्थेमध्ये अनाथ मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. त्यांचे अन्न, कपडे आणि इतरही सुविधा संस्थेकडूनच पुरविल्या जातात. आपले शिक्षण पूर्ण करून ही मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावीत यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर इथल्या मुलामुलींना योग्य वयात योग्य जोडीदार निवडून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्था स्वतः पाहते. अशी सुमारे एक हजार पन्नास मुले या संस्थेत राहिलेली आहेत.
बालनिकेतन संस्था, हडपसर, पुणे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा, अभिमान बाल भवन, वर्धा, गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा (गोपालन), ममता बाल सदन, सासवड, सप्तसिंधु महिला आधार, बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे (आंतरराष्ट्रीय पातळीवर) या संस्था सिंधुताईंनी स्थापन केल्या आहेत. माईंनी आपल्या संस्थांच्या प्रचार आणि कार्यासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने अनेक दौरे केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर माईंनी आपल्या वक्तव्याने आणि काव्याने तिथल्या लोकांना प्रभावित केले. परदेशी अनुदान मिल्ने सोपे जावे म्हणून त्यांनी ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’ संस्थेची स्थापना केली.
माईंच्या जीवनावर आधारित ‘मी सिंधूताई सपकाळ’ नावाचा मराठी चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिंधुताई म्हणजेच माईंची भूमिका अभिनेत्री तेजस्वी पंडित हिने अत्यंत उत्कृष्टपणे निभावली आहे. तसेच भार्गव फिल्म्स अँड प्रोडक्शनचा ‘अनाथांची यशोदा’ नावाचा अनुबोधपटही निघाला आहे. माईंना ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. न्यासाकडून कै. सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२), आय. टी. प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा ‘दत्तक माता’ पुरस्कार (१९९६), दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’ (२००८), महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०), प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५), डॉ. राममोहन त्रिपाठी पुरस्कार (२०१७), ‘पद्मश्री’ पुरस्कार (२०२१), पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ असे कितीतरी पुरस्कार आणि गौरव प्राप्त झाले आहेत.
Join Our WhatsApp Community