माहिमधील गोपी टँक मंडईच्या पुनर्विकासाचा प्रकल्प रद्द केल्यानंतर याचा पुनर्विकास महापालिकेने स्वत: करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही या मंडईची साधी दुरुस्तीही केली जात नाही. त्यामुळे या मंडईतील गाळेधारकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून या मंडईतील दुरावस्था दुर करण्यासाठी महापालिकेने आता या मंडईचा विकास करतानाच याची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गोपी टँक मंडईची उंची वाढवली जाणार असून त्याबरोबरच आगार बाजार येथील मंडईचीही उंची वाढवण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.
माहिम येथील गोपी टँक मार्केटच्या पुनर्विकासाला देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे. सन २००९ मध्ये गोपी टँक मार्केटच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली होती. परंतु विकासकांकडून पुनर्विकास प्रकल्पाबाबबत कोणतीही हालचाल न केल्यामुळे अखेर या प्रकल्पाची मान्यता रद्द करून महापालिकेने या मंडईचा पुनर्विकास स्वत: करण्याचा निर्णय घेतला. या मंडईच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी मेसर्स ओंकार रिअटल्स डेव्हलपर्स यांची विकासक आणि दाभोळकर एँड दाभोळकर यांची वास्तूविशारद म्हणून नेमणूक झाली होती. परंतु विकासकाने या मंडईची देखभालही न केल्याने प्रथम २०११- १२मध्ये प्रथम एक ते दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतरही विकासकाने दुर्लक्ष केल्याने त्यांची मान्यता रद करण्यात आली होती.
(हेही वाचा Muslim : श्री कानिफनाथ मंदिरात पुजारी-भाविकांना मारहाण करणे धर्मांधांची ‘मोगलाई’च; मास्टरमाइंड शोधा)
त्यानंतर मागील वर्षी काही प्रमाणात किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु या मार्केटचा पुनर्विकास प्रकल्पाची मान्यता रद्द करण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्वत:ही याची प्रक्रिया राबवली जात नसून याची दुरुस्तीही केली जात नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शहराच्या पालकमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारीनुसार त्यांनी या मंडईची पाहणी करून या मंडईची दुरुस्ती करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. या मंडईची छताची उंची कमी असून यामुळे मासे विक्री करणाऱ्या महिलांना पुरेशी खेळती हवा नसल्याने त्रास होतो. त्यामुळे या छताची उंची वाढवून त्यावर छप्पर टाकले जावे,अशाप्रकारची कामे त्वरीत करण्याचे निर्देश शहराच्या पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिल्यानंतर बाजार विभाग आणि जी उत्तर विभागाच्यावतीने या मंडईच्या दु रुस्तीची कामे हाती घेण्यात येत आहे.
गोपी टँक मंडईत वायू विजन व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून छपराची उंची वाढवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहे. त्याबरोबरच दादर आगार बाजारमधील मंडईची दुरुस्ती सोबत त्याचीही उंची वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, गोपी टँक मंडईमध्ये कोळी भगिनींसह विविध प्रकारचे व्यवसाय करणारे सुमारे चारशे परवानाधारक गाळेधारक आहेत. या मासे विक्रीच्या मंडईच्या परिसरात पावसाळी पाणी वाहून नेण्याची पर्जन्य जलवाहिनी नसल्याने मासळी बाजारातील पाणी वाहून जाण्याऐवजी तिथेच जमा होते. याबाबत वारंवार तक्रार करूनही महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नसल्याची तक्रारी मासे विक्री करणाऱ्या महिलांनी केली आहे. माशांवर वारंवार पाणी शिंपडावे लागते, त्यामुळे या भागातील पाण्याचा निचरा ही मोठी समस्या असून त्यामुळे मंडईची उंची वाढवतानाच प्रशासनाने या भागातील पाण्याचा निचरा आणि स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास योग्य ठरेल,असे येथील गाळेधारकांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community