गृहमंत्री म्हणाले पोलिसांवरचा दबाव खपवून घेणार नाही!

हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून, त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करुन घेऊ, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

124

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाच्या चौकशीनंतर काल रात्रीपासून सुरु असलेला राजकीय ड्रामा काही निवळण्याची चिन्हं दिसत नाहीत. यातच आता गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून, त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करुन घेऊ, असे देखील ते म्हणाले.

काय म्हणाले गृहमंत्री?

पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलिस स्टेशनमध्ये बोलावलं असता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचे अन्य सहाकारी त्या ठिकाणी पोहोचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, या व्यक्तीला का व कशासाठी बोलावलं गेलं आहे. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलवू शकतात, त्यादृष्टीने त्यांना बोलवण्यात आले होते. पण पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला, हा एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढंच सांगू इच्छितो अशाप्रकारे पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.

(हेही वाचाः हा सरकारचा निव्वळ कृतघ्नपणा… दरेकरांचा घणाघात!)

चौकशीचे आदेश

या प्रकरणी कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा जो साठा आहे तो नेमका कुठे जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता. या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे. अशी देखील माहिती आहे की, केवळ एवढाच साठा नसून यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. अशी देखील यावेळी गृहमंत्र्यांनी माहिती दिली.

‘आप’नेही घेतली उडी

एकीकडे या सर्व प्रकरणावरुन ठाकरे सरकार विरुद्ध भाजपा असा वाद रंगला असताना, या वादात आता आम आदमी पार्टीने देखील उडी घेतली आहे. आपकडून सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करण्यात येत आहे. सदर कृत्य एखाद्या सामान्य माणसाने केलं असतं तर त्याला भारतीय दंड संविधानाअंतर्गत येणाऱ्या सेक्शन 353 च्या आधाराखाली तुरुंगात डांबण्याच्या शिक्षेची तरतूद आहे, याकडेही आप ने लक्ष वेधलं आहे. भाजपने रेमडेसिवीरच्या केलेल्या साठ्यासंदर्भात आणि कायदा तोडून बेकायदेशीर चॅरिटी करण्याचे प्रयत्न केल्याच्या संदर्भात भाजपविरोधात कारवाई करण्याची मागणी आपनं केली आहे.

(हेही वाचाः ही आहे मुंबई पोलिसांची स्टिकर स्ट्रॅटेजी…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.