राज्यपाल आणि राज्य सरकार… एक राज्याचे घटनात्मक प्रमुख तर एक राज्याचे शासन करणारे प्रत्यक्ष सरकार. खरं तर राज्यपाल पदावरील व्यक्ती राज्यातील राजकारणापासून कायम अलिप्त असावी, अशी तरतूद आहे. म्हणून साधारणपणे बाहेरील राज्यातील व्यक्ती या पदावर निवडण्याची एक प्रथा आहे. असे असून सुद्धा महाराष्ट्रात राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर अनेकदा राजकीय टीका करण्यात आली. इतकंच नाही तर शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अनेक वेळा राज्यपालांवर निशाणा साधला. पण या मराठी नववर्षात राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील सुसंवादाने ‘गगनभरारी’ घेतल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
सुसंवाद सुरू?
आता ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद मिटताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे याआधी राज्यपालांना सरकारी विमान नाकरलेल्या ठाकरे सरकारने आता राज्यपालांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान दिले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद निवळत चालल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
(हेही वाचाः देशात युद्धसदृश परिस्थिती; संसदेचे तातडीने अधिवेशन बोलवा! संजय राऊतांची मागणी)
गुढीपाडव्याला राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊन, त्यांच्यातील संवाद पुन्हा सुरू केला होता. नूतन वर्षाभिनंदन… हे हिंदू नवे वर्ष आपणाकरता तसेच कुटुंबातील सर्वांकरता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असा मजकूर राज्यपालांच्या पत्रात होता. त्यामुळे नववर्षाचे शुभ संकेत पाडव्याच्याच शुभ मुहूर्तावर मिळाले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यपालांना विमान देऊन राज्यपालांच्या या संकेतांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे.
आजवर अनेकदा राज्यपाल व ठाकरे सरकार आमने-सामने
काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान नाकारले होते. त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरुन पुन्हा राजभवनावर जाण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मानापमान नाट्य रंगले होते. तर राज्यात मंदिर उघडण्यावरुन देखील राज्यपालांनी ठाकरे सरकारला खरमरीत पत्र लिहिले होते. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडी सरकारचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार होते. मात्र, तेव्हा राज्यपाल उत्तराखंडला निघून गेले होते. त्यामुळे राज्यपालांनी ही भेट सरळसरळ टाळल्याचे बोलले जात होते.
Join Our WhatsApp Community