Australia in Final : दक्षिण आफ्रिका पुन्हा चोक; ३ गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत भारतासोबत

154

विश्वचषक स्पर्धेचा कोलकात्यात झालेला दुसरा उपान्त्य सामनाही शेवटच्या टप्प्यापर्यत रंगला. आणि अखेर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला ३ गडी राखून हरवत अंतिम फेरीत (Australia in Final) धडक दिली. आता रविवारी १९ नोव्हेंबरला त्यांचा मुकाबला विश्वचषकासाठी होईल तो भारताशी.

कोलकात्यात आज फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीने सामन्यात जान आणली. आफ्रिकन संघाला पहिली फलंदाजी करत २१२ धावाच करता आल्या. आणि उत्तरादाखल हे आव्हान पार करतानाही ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आले. त्यांनीही ७ गडी गमावले. आणि २१४ धावा करण्यासाठी ४७.२ षटकं घेतली.

आफ्रिकन कर्णधार बवुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण, जोस हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांच्या भेदक गोलंदाजीमुळे आफ्रिकेची अवस्था ४ बाद २४ अशी झाली होती. बवुमा (०), क्विंटन डी कॉक (३), व्हॅन देअर ड्युसेन (६) आणि एडर मार्करम (१०) असे आघाडीचे आणि फॉर्ममध्ये असलेले फलंदाज झटपट बाद झाले. पण, डेव्हिड मिलरने ११६ चेंडूंत १०३ धावा करत डाव सावरला. आणि त्यामुळे आफ्रिकन संघ निदान २०० चा टप्पा ओलांडू शकला.

ऑस्ट्रेलियाच्या हेझलवूड आणि स्टार्क या आघाडीच्या गोलंदाजांनी खेळपट्टीकडून सुरुवातीला मिळालेल्या मदतीचा पूर्ण फायदा उचलला. स्टार्कने ३४ धावांत ३ बळी घेतले. तर पॅट कमिन्सनेही ५१ धावा देत ३ गडी बाद केले.  हेझलवूड आणि ट्रेव्हिस हेड यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले.

(हेही वाचा Aus vs SA Semi Final : विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर २१३ धावांचं आव्हान)

२१३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली होती. ट्रेव्हिस हेड (६२) आणि डेव्हिड वॉर्नर (२९) यांनी ६० धावांची वेगवान सलामी करून दिली. पण, तोपर्यंत ईडनगार्डन्सची खेळपट्टी वळू लागली होती. आणि त्याचा फायदा उचलत आफ्रिकन कर्णधार बवुमाने दोन्ही बाजूने केशव महाराज आणि शाम्सी अशी फिरकी जोडगोळी आणली.

ही चाल यशस्वी ठरली. आणि ऑस्ट्रेलियाची मधली फळी ठरावीक अंतराने बाद होत गेली. संघाच्या १७४ धावा झाल्या असताना शेवटचा तज्ज फलंदाज स्टिव्ह स्मिथ बाद झाला आणि आफ्रिकेसाठी काही काळ विजयाची कवाडं उघडली होती. नंतर कोएटझीनेच जम बसलेल्या इंग्लिसलाही २८ धावांवर क्लीनबोल्ड केलं.  पण, शेवटी मिचेल स्टार्कने कर्णधार  पॅट कमिन्सला साथ देत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. मिचेल स्टार्क १६ तर कमिन्स १४ धावांवर नाबाद राहिले.

कोअट्झी आणि शाम्सी यांनी दोन – दोन गडी बाद केले

ऑस्ट्रेलियाची ही नववी उपान्त्य फेरी होती. आणि यात त्यांनी पाचदा ही स्पर्धा जिंकलीय. तर दोन वेळा ते उपविजेते ठरले आहेत. याउलट दक्षिण आफ्रिकेवरील चोकर्सचा शिक्का इथंही कायम राहिला. त्यांची ही पाचवी उपान्त्य फेरी होती. पण, त्यांना एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. आताही त्यांनी दिलेली जोरदार लढत अपयशीच ठरली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.