रामायण ही मालिका खूप गाजली. आदिपुरुष या चित्रपटाला लोकांनी नाकारले. तेव्हा पुन्हा एकदा रामानंद सागर यांच्या रामायणाची चर्चा सुरू झाली. यातील पात्रांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यात प्रमुख नाव दारा सिंह यांचं घेतलं जातं. दारा सिंह हे जगप्रसिद्ध फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. त्यांनी माजी वर्ल्ड चॅम्पियन जॉर्ज गार्डियंकाचा पराभव करून १९५९ मध्ये कॉमनवेल्थ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती. १९६८ मध्ये अमेरिकेच्या विश्वविजेत्या लाऊ थेजला पराभूत करून फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये विश्वविजेतेपद काबीज केले होते. वयाच्या ५५ व्या वर्षापर्यंत ते कुस्ती खेळत होते आणि आपल्या सुमारे पाचशे सामन्यांपैकी एकाही सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारलेला नाही.
त्यांचे खरे नाव दीदार सिंग रंधावा असे होते. दारा सिंह यांनी त्यांच्या करिअरमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. १९५२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘संगदिल’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. मुमताज सोबत दारा सिंहची जोडी चांगलीच जमली होती. दारा सिंह यांनी मुमताजसोबत अनेक हिट चित्रपट दिले. दारा सिंह यांनी मुमताजसोबत किंगकॉंगनंतर जवळपास १६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. हे चित्रपट बी ग्रेडचे असायचे आणि दारा सिंगला प्रत्येक चित्रपटासाठी ४ लाख रुपये मिळायचे. आताच्या बीग्रेड चित्रपटांची तुलना तेव्हाच्या बी ग्रेड चित्रपटांशी करता येत नाही. त्याकाळी बी ग्रेड चित्रपट खूप चांगल्या पद्धतीने तयार केले जायचे.
दारा सिंह यांना हनुमानाच्या भूमिकेमुळे प्रचंड प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे दारा सिंह यांनी हनुमंताची भूमिका केली तेव्हा ते ६० वर्षांचे होते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल हनुमानाच्या भूमिकेसाठी रामानंद सागर यांच्या डोळ्यांसमोर दारा सिंह हेच अभिनेते आले. मात्र हनुमानाची भूमिका त्यांनी याआधी देखील निभावली होती. १९७६ मधील बजरंगबली या चित्रपटात त्यांनी हनुमानाची भूमिका स्वीकारली होती. कदाचित यामुळे रामानंद सागर यांना दारा सिंह यांची आठवण झाली असावी.
(हेही वाचा – Anjali Damania : भुजबळांनी जागा हडपून बंगला बांधला; अंजली दमानियांचा गंभीर आरोप)
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते २००३ ते २००९ दरम्यान राज्यसभेचे सदस्य देखील होते. ७ जुलै २०१२ रोजी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात भरती केले गेले. मात्र डॉक्टरांनी आपले हात वर केले. मग त्यांना मुंबईतील ’दारा व्हिला’ मध्ये म्हणजे त्यांच्या घरी ठेवण्यात आले. १२ जुलै २०१२ रोजी सकाळी ७.३० वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community