बीकेसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकाच्या चौकशीवरून राजकारण चांगलेच तापले आहे. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करून अधिकारी यांना धमकावले प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे, तर दुसरीकडे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्याचे अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणी केंद्र शासनाविरुद्ध अफवा पसरवली, असा आरोप भातखळकर यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. रेमडीसीवीर इंजेक्शनवरून राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्याचे राजकारण केले जात आहे.
कंपनीचे संचालक राजेश डोकालिया यांची केलेली चौकशी!
राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णांना बेड मिळत नाही, कसे बसे बेड मिळाल्यावर रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे इंजेक्शन मिळत नाही. त्यात दीव दमन येथील ब्रूक फार्मा या कंपनीने रेमडेसिविर इंजेक्शनचा ६० हजार वायल्सचा साठा करून ठेवला असल्याच्या संशयावरून शनिवारी कांदिवली येथे राहणारे या कंपनीचे संचालक राजेश डोकालिया यांना बीकेसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आले होते. राजेश डोकालिया यांना पोलिस घेऊन गेल्याचे कळताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, पराग आळवणी हे बीकेसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दाखल झाले होते. त्यांनी पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन डोकालिया यांना का आणण्यात आले? याबाबत पोलिसांना जाब विचारला आणि डोकालिया यांना एफडीएने परवानगी दिल्याचे पत्र पोलिसांना दाखवण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा बोलावल्यास चौकशीसाठी पोलीस ठाण्यात यावा लागेल, या अटीवर त्यांना सोडण्यात आले होते.
(हेही वाचा : प्राणवायुच्या दैनंदिन पुरवठ्यावर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून होणार देखरेख)
दोन्ही बाजूच्या तक्रारींची चोकशी सुरू!
या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे, दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी सोमवारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह चार जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, पोलीस अधिकारी यांना धमकी देणे याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान रेमडेसिविरवरून केंद्र शासनाविरुद्ध अफवा पसरवल्या प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरुद्ध दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या दोन्ही तक्रारी प्रकरणी चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community